वादाचे दांभिक स्वरूप

    25-Oct-2023   
Total Views |
Hypocritical nature of argument

वादविवाद बाजूला सारून आपले हित कशात आहे, याचा विचार केला, तर वाद टाळून संवाद करणे साधता येते. त्यासाठी आपल्या अहंकाराला मुरड घालून आपल्या अंतःकरणात डोकावून हित पाहावे लागते. ती एक कला आहे. समर्थ अशा कलेत निष्णात आहेत. त्यामुळे समर्थांचा उपदेश ऐकण्याबरोबर ती कलाही आपण समर्थांकडून शिकून घ्यावी.

आपली देहबुद्धी कमी करून तिला आत्मबुद्धीकडे वळवावी, असे समर्थांनी पुढे श्लोक क्र. 163 मध्ये स्पष्ट केले आहे. स्वामी त्या श्लोकात सांगतात की, ’देहेबुधी ते आत्मबुद्धी करावी।’ मनाचे श्लोक वाचीत असताना हे लक्षात येते की, स्वामी वरचेवर देहबुद्धी सोडण्याचा सल्ला देत असतात. स्वामी हेही सांगतात की, जे सत्य आहे, ते मी तुमच्या हितार्थ सांगत आहे. श्रोत्यांनी आपल्या हिताचा विचार करून समर्थांचा उपदेश अमलात आणायचा की नाही, हे ठरवावे. तसं पाहिलं, तर सर्व संत देहबुद्धी कमी करण्याचा व अहंकार नाहीसा करण्याचा उपदेश आपल्या वाङ्मयातून, कीर्तनांतून, प्रवचनांतून करीत असतात. पण, हे सारे उपदेश वर्षानुवर्षे ऐकूनही आपल्यासारख्या सामान्य माणसांवर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही. आपण आहे तसेच आहोत. आपण पुष्कळ सद्विचार ऐकतो, पण ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करीत नाही, त्याचा आळस करतो. त्यामुळे आपली देहबुद्धी काही कमी होत नाही. आपण देहबुद्धीत वावरत असल्याने अहंकार, अनेक प्रकारचे अवगुण आणि विकार यांना बरोबर घेऊन जगत असतो. देहबुद्धीमुळे मी सुंदर, मी ताकदवान, मी श्रेष्ठ, माझ्यासारखा ज्ञानी हुशार दुसरा कोणी नाही, अशा अहंकारात आणि भ्रमात माणूस वावरत असतो. सर्व प्रकारचा अहंकार वाढत चालल्यावर आपले श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी माणसाची वाद घालण्याकडे प्रवृत्ती होते, अशा माणसांना वादासाठी क्षुल्लक कारणही पुरेसे असते.


वाद घालण्याची त्यांना हौस असते. या वाद घालण्याच्या सवयीमुळे ते कसे फसत जातात, हे बघण्यासारखे आहे. हे लोक वादविवादात जिंकले तर त्यामुळे त्यांचा अहंकार अधिक तीव्र होतो. आणखी वाद घालून आपण जिंकतच जावे, असे वाटू लागते व माणसे पूर्णपणे अहंकाराच्या आहारी जाऊन आपले नुकसान करून घेतात. बरं, ही माणसे वादात हरली, तर त्यांंच्या अहंकाराला ठेच लागल्याने त्यांच्या ठिकाणी द्वेष, मत्सर, तिरस्कार इत्यादी दोषांची निर्मिती होते आणि मन त्या विकारांच्या आहारी जाऊन काही वेळा ते तीव्र नैराश्याची शिकार होतात. एकंदरीत काय, वादविवादात तुम्ही जिंकलात काय, हरलात काय, त्याचे दुष्परिणाम भोगल्यावाचून सुटका नसते. म्हणून स्वामी वाद टाळून संवाद साधावा, असे मागील चार-पाच श्लोकांतून सांगत आले आहेत. आपणही ते ऐकत आलो आहोत. पण, ना आपली देहबुद्धी कमी झाली, अहंकार कमी झाला, ना आपण शुष्कवाद करणे सोडून दिले. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन समर्थ पुढील श्लोकात सांगत आहेत की, हे सांगण्यात आणि ऐकण्यात आपला जन्म गेला, पण त्याचा वाद घालण्यावर काहीही परिणाम झाला नाही, तो आहे, तसाच राहिला. स्वामी सांगतात,

जनीं सांगता ऐकतां जन्म गेला।
परी वाद वेवाद तैसा चि ठेला।
उठे संशयो वाद हा दंभधारी।
तुटे वाद संवाद तो हितकारी ॥ 112॥

वादविवाद बाजूला सारून आपले हित कशात आहे, याचा विचार केला, तर वाद टाळून संवाद करणे साधता येते. त्यासाठी आपल्या अहंकाराला मुरड घालून आपल्या अंतःकरणात डोकावून हित पाहावे लागते. ती एक कला आहे. समर्थ अशा कलेत निष्णात आहेत. त्यामुळे समर्थांचा उपदेश ऐकण्याबरोबर ती कलाही आपण समर्थांकडून शिकून घ्यावी. ती भौतिक आणि पारमार्थिक लाभासाठी उपयुक्त आहे. अनेक वादांचे मूळ अहंकार, स्वार्थ या अवगुणात आणि द्वेष, मत्सर, तिरस्कार या विकारात आहे. याचा नीट विचार केला, तर वाद नियंत्रणात आणता येतात. देव, धर्म, अध्यात्म, उपासना हे वादाच्या निर्मूलनाचा विचार करतात. देव, परमेश्वर हा सर्वशक्तिमान, ज्ञानी, सर्वश्रेष्ठ आहे, हे समजल्यावर आपल्या बुद्धीच्या अपुरेपणाची, विचारांच्या क्षुद्रत्वाची जाणीव झाल्याने झाल्याने वाद संपुष्टात यायला हवेत. पण, तसे होत नाही, आपला देव धर्म, आपल्या परंपरा यांचा विलक्षण अभिमान बाळगल्याने देव, धर्मातही वाद काही कमी नाहीत. मान्यताप्राप्त देव, धर्म, नीतिशास्त्र, धार्मिक रीतिरिवाज यात असंख्य मतमतांतरे आहेत. प्रत्येकाला आपलेच मत अथवा आपण स्वीकारलेली मतप्रणाली श्रेष्ठ आहे, असे वाटू लागते.


 याविषयी ऐकण्यात आणि सांगण्यात आपला सारा जन्म निघून गेला, तरी निश्चयात्मक विचारापर्यंत न पोहोचल्याने त्यासंबंधीचे वाद तसेच आहेत. ते कमी झाल्याचे दिसत नाही. अध्यात्म, देवधर्म, रीतिपरंपरा या विषयांवर बोलणारे खूप आहेत. ते ऐकणारे श्रोतेही काही कमी नाहीत. थोडेसे वक्तृत्व, लोकांना स्पष्ट विचार न सांगता संभ्रमित करून हे लोक आपले महत्त्व वाढवतात व वाद वाढवतात. अशांचे संभाषण आपण जन्मभर ऐकले तरी निश्चित मत न कळल्याने वाद काही कमी होत नाहीत. असे वेगवेगळे धार्मिक गट, पंथ, परंपरावादी तयार होउन आपापसात भांडत राहतात. जो तो आपल्या गटाच्या पंथश्रेष्ठत्वासाठी अहंकारी बनून दुसर्‍या गटाला दुय्यम, निकृष्ट समजत असतो. दुसर्‍या बाजूच्या, त्यांच्या विचारांचा, श्रद्धांचा अजिबात विचार न करणारे हे अर्थातच हटवादी बनतात. ‘मीच खरा, मलाच काय ते सत्य गवले आहे,’ अशा भ्रमात ही मंडळी वावरत असतात. यासाठी स्वामींचे निरीक्षण आहे की, ‘जनी सांगता ऐकता जन्म गेला। परी वाद वेवाद तैसा चि ठेला।’ जन्मभर सांगून ऐकून परिणाम शून्य! वृथा अहंकारामुळे वादविवाद काही संपले नाहीत.

प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. त्याची श्रद्धास्थाने, उपासना पद्धती या भिन्न असतात. प्रत्येकाची जीवनमूल्ये, नीतिविषयक कल्पना वेगळ्या असतात. हे एकदा मान्य केल्यावर माणसाने दुसर्‍याच्या विचाराचा कल्पनांचा आदर केल्यास वाद होणार नाहीत. पण, आचारविचार त्यातील श्रेष्ठत्वाचा आग्रह, अहंकारी वृत्ती यातून वादचा जन्म होतो. त्यात पंथाभिमानाची भर पडल्यास वाद विकोपाला जातात. वादामुळे हेकटपणा वाढतो, संशय वाढतात. वर्षानुवर्षे इतके तत्त्वज्ञान सांगून झाले, ऐकून झाले, पण हे वाद काही संपत नाहीत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, या दांभिक विद्वानांनी स्वत:चे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यात व दुसर्‍याच्या विचारांना दांभिक, खोटे ठरवण्यात आपले बुद्धिकौशल्य वापरल्याने लोकांची संभ्रमावस्था जशीच्या तशी राहून हे वादविवाद वर्षानुवर्षे ‘जैसे थे’ आहेत. असे शुष्क वादविवाद हे ढोंगीपणाचे लक्षण असून माणसाने आपल्या हितसाठी त्यांच्या नादी लागू नये. वैचारिक मतभेद हे संवादाने सोडवले, तर वादाचे निर्मूलन होते. हे माणसाच्या सांसारिक आणि पारमार्थिक हिताचे आहे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..