अंधत्व असूनही जिद्दीने आत्मसात केलेल्या इलेक्ट्रॉनिकविश्वातल्या तंत्राचे धडे इतर अंधबांधवांना देत, त्यांना स्वावलंबित्वाची दूरदृष्टी प्रदान करणार्या सागर पाटील यांची ही प्रेरणादायी कहाणी...
'इच्छा तिथे मार्ग’ ही उक्ती सार्थ ठरविणारे, पूर्णपणे अंध असूनही केवळ जिद्दीच्या जोरावर इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील आपली आवड जोपासणारे आणि आज शेकडो अंधांना याबाबतचे प्रशिक्षण देऊन स्वयंपूर्णतेची दृष्टी देणारे मुंबईतील दहिसरचे सागर पाटील. लहानपणापासूनच सागर यांना मोतिबिंदूचा त्रास होता. त्यानंतर डोळ्याला झालेल्या इजेमुळे त्यांना पूर्ण अंधत्व आले. बालपणीच आलेल्या अंधत्वामुळे सागर यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेण्यामध्येच अनेक अडचणी पार करत, त्यांनी शिक्षण घेतले. वरळीमध्ये अंधांसाठी असलेल्या ‘हॅपी होम’मध्ये दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर माटुंग्याच्या रुईया महाविद्यालयात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. मराठी साहित्य विषयात पदवी पूर्ण करून पुढे मुंबई विद्यापीठात त्यांनी याच विषयात पदव्युत्तर पदवीही घेतली. महाविद्यालयीन जीवनातदेखील नेतृत्वगुण असणार्या सागर यांनी विद्यालयाच्या ‘एनएसएस’ विभागामार्फत चालवल्या जाणार्या ‘सेल्फ व्हिजन सेंटर’मध्ये ही काम केले. महाविद्यालयीन जीवनात संगणकाचे ज्ञान त्यांनी अवगत करून घेतले. ऐन नाटकामध्ये बंद पडलेला संगणक त्यांनी दहा मिनिटांत दुरुस्त करून बंद झालेला नाटकाचा प्रयोग पुन्हा सुरू केल्याचा किस्सा ते सांगतात.
लहानपणापासूनच त्यांना इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा, यंत्रांचा भारी नाद. पण, अंध असल्यामुळे त्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण घेता आले नाही. अनेक प्रयत्न करूनही, हे शिक्षण त्यांना घेता आले नाही. पण, तरीही त्यांनी जिद्द न सोडता, इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील आपली आवड जीवंत ठेवली. अंध असूनही इलेक्ट्रॉनिक यंत्रांची हाताळणी करत करत, स्वतःच शिकत मोठे झालेल्या सागर यांनी ‘आयडियल इनोव्हेटिव्ह ग्रुप’ ही अंधांसाठीची संस्था स्थापन केली. 2014 साली स्थापन केलेल्या या संस्थेमार्फत अनेकविध उपक्रम राबविले जातात, त्याचबरोबर अंधांना इलेक्ट्रॉनिक विषयातील ज्ञानही दिले जाते. सागर या संस्थेत इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन म्हणून काम करत असून, अधिकृत पदवी नसतानाही, ते अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आजवर त्यांनी 250हून अधिक विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक विषयातील प्रशिक्षण दिले आहे. ऑनलाईन मार्गदर्शनाचा लाभ घेत संगणकातील सॉफ्टवेअर-हार्डवेअरविषयी त्यांनी माहिती करुन घेतली.
इलेक्ट्रॉनिक विषयातील स्वयंशिक्षणाच्या जोरावर सागर यांनी टाकाऊ वस्तूंपासून अंधांसाठी उपयुक्त असलेले एक यंत्रही विकसित केले. ‘आयडियल इनोव्हेटिव्ह ग्रुप’ या संस्थेत प्रशिक्षणाबरोबर एलईडी लाईट्स, दिव्यांग मुलांना मूलभूत संगणकीय शिक्षण, मशरूम शेती अशा अनेक कौशल्यपूर्ण रोजगार देणार्या गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर 2017 मध्ये ‘आयआयजी एज्युकेशन अॅण्ड डेव्हलपमेंट ट्रस्ट’ची त्यांनी स्थापना केली. अनेक ठिकाणी कामांचा अनुभव घेत आपल्या विद्यार्थ्यांनाही त्याची जोड देत शिकवणार्या सागर यांना त्यांच्या कामासाठी अनेक पुरस्करांनी गौरविण्यात आले आहे. ‘पुढचं पाऊल ट्रस्ट’मार्फत ‘पाऊलखुणा पुरस्कार’, रामनारायण रुईया महाविद्यालयाचा ‘द शिल्ड ऑफ ऑनर’, ‘ब्लाईंड पर्सन असोसिएशन’चा ‘पद्मश्री डॉ. राजेंद्र व्यास मेमोरियल पुरस्कार’ (2019) अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. एडईडी, सोलारच्या वस्तू, त्याचबरोबर दृष्टिहिनांनी बनवलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, रोजगार प्रशिक्षण कार्यशाळा असे अनेक उपक्रम राबविण्यात येतात.अंध, दिव्यांग व्यक्तींना स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी करण्याच्या दृष्टिकोनातूनही प्रशिक्षित केले जाते. येथे प्रशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही प्रयत्न केले जात असून, त्यांना विविध क्रीडा स्पर्धा, संगणकीय कामे, इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्याची कामेही दिली जातात. आपल्या आयुष्यात अंधार असताना सौरऊर्जेची यंत्र बनवून लोकांना प्रकाश देणार्या सागर यांची जिद्द वाखाणण्याजोगीच!
इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर काम करण्याची उपजत आवड असणार्या सागर यांचे आणखी एक उत्तुंग स्वप्न आहे. नेत्रहीन असलेल्या सागर यांनी ‘शॉक प्रूफ इंडिया’चे स्वप्न पाहिले आहे. ‘शॉक प्रूफ इंडिया’ हे स्वप्न सत्यात येण्यासाठी सागर प्रयत्नशील आहेत. भारतात शॉक लागून कामगार किंवा सामान्य माणसांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. या घटनांना आळा घालण्यासाठी व्यवस्थित यंत्र तयार करण्याचे काम सागर करत असून शॉक बसून कुणाचाही मृत्यू ओढवू नये, हा मानस ठेवूनच त्यांनी ‘शॉक प्रूफ इंडिया’चे स्वप्न पाहिले आहे. आपलं स्वतःचं संपूर्ण घर सौरऊर्जेवर चालविणारे सागर, दैनंदिन वापराची अनेक उपकरणे स्वतः बनवणारे सागर अत्यंत साधं आयुष्य जगतात. शेकडो अंधांना स्वयंपूर्ण करणारे, दूरदृष्टीने डोळस स्वप्न पाहणारे आणि नेत्रहीन आहे, मात्र, दृष्टिहीन नाही, हे सिद्ध करणार्या सागर पाटील यांचा हा प्रवास म्हणजे प्रत्येकासाठी एक मूर्तिमंत उदाहरणच. आपल्या कार्याने सर्वांनाच अचंबित करणार्या सागर पाटील यांचा प्रवास खरोखरंच दृष्टी असणार्यांनादेखील दृष्टिकोन देणाराच ठरेल, यात शंका नाही. ‘तिमिरातून तेजाकडे’ चाललेल्या सागर यांच्या या तेजस्वी प्रवासाला दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या मनस्वी शुभेच्छा!
-समृद्धी ढमाले