नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत धोरणामुळे संरक्षण उत्पादन क्षेत्रात देशाने मोठी मजल मारली आहे. एकेकाळी संरक्षण उत्पादनांचा आयातदार असणारा भारत आज मोठा निर्यातक बनला आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तवांग येथे विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन करताना केले.
संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी अरुणाचल प्रदेशातील फॉरवर्ड पोस्ट्सना भेट दिली आणि तेथील सशस्त्र दलांच्याल तयारीचा आढावा घेतला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) आघाडीवरील चौक्यांवर तैनात असलेल्या सैनिकांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत दसरा साजरा केला.
सध्याची जागतिक परिस्थिती पाहता देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याशिवाय पर्याय नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत धोरणाद्वारे संरक्षण उपकरणाचे स्वदेशातच उत्पादन करून लष्करी शक्ती मजबूत करण्यात येत आहे. त्यामुळे एकेकाळी लष्कराच्या अद्यतनीकरणासाठी परदेशी आयातीवर अवलंबून असलेला भारत आज स्वदेशातच अनेक प्रमुख शस्त्रास्त्रांचे उत्पादन करत आहे. परदेशी उद्योगांना त्यांचे तंत्रज्ञान सामायिक करणे आणि भारतात उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे २०१४ साली केवळ १ हजार कोटींची निर्यात करणारा भारत आज हजारो कोटी निर्यात करून जगातील प्रमुख संरक्षण उत्पादक देश बनला असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आसाममधील तेजपूर येथील भारतीय लष्कराच्या 4 कॉर्प्सच्या मुख्यालयालाही भेट दिली. यावेळी त्यांनी देशाच्या सुदूर पूर्व भागात तैनात केलेल्या सैन्याच्या तयारीचा आढावा घेतला. एलएसीच्या भारतीय बाजूने पायाभूत सुविधांचा विकास आणि आघाडीवर असलेल्या सैन्याच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी अत्याधुनिक लष्करी उपकरणे आणि तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल माहिती देण्यात आली. त्यांनी आव्हानात्मक परिस्थितीत कॉर्प्सच्या सर्व श्रेणींद्वारे प्रदान केलेल्या उत्कृष्ट कार्य आणि उपयुक्त सेवांचे कौतुक केले.