स्वत: शिकणारी, इतरांना शिक्षित करणारी सरस्वती आणि स्वत:च्या कुटुंबासह तमाम गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करुन देणारी लक्ष्मी म्हणजे माधुरी कदम. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा हा लेख...
आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी, समाजात स्वतःची ओळख प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती झटत असते. जिद्द, मेहनत, चिकाटी आणि विश्वास हे गुण ज्या व्यक्तीमध्ये, ती व्यक्ती आपापल्या क्षेत्रात यशस्वी होतेच. अशाच एका स्त्रीची आजची कहाणी, जिने स्वत:सह इतरांच्या क्षमतांनाही अमर्याद करुन सामूहिक समाजकार्याचा एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला. त्यांच्यातील कामाची आवड त्यांना अजूनही स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे समाजकार्यातून स्वतःला सिद्ध करणार्या माधुरी कदम यांचा प्रवास या लेखातून जाणून घेऊया.
कोकणातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या माधुरी लहानपणापासूनच हुशार होत्या. त्यामुळे त्यांना आई-वडिलांनी खूप शिकण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांचे संपूर्ण शिक्षण कोकणातच झाले असून ‘स्थापत्य अभियंता’ या विषयात त्यांनी पदविकापर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कोकणातच ‘आयटीआय’ विभागात ‘इन्स्पेक्टर’ म्हणून तीन वर्ष काम केले. १९९५ साली लग्न झाल्यानंतर त्या कल्याणमध्ये सासरी स्थायिक झाल्या. लग्नानंतर एकत्र कुटुंबाच्या जबाबदारीमुळे त्यांना पुढे नोकरी सोडावी लागली. मात्र, त्यांच्यातील काम करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून त्यांनी घरगुती शिकवण्या घेण्यास सुरुवात केली. या शिकवण्यांच्या माध्यमातून त्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवत होत्या आणि त्यातून पैसे कमवून संसाराला हातभार लावत होत्या. कुटुंबानेही त्यांना याकामी वेळोवेळी प्रोत्साहन दिले.
शिकवण्यांसोबतच माधुरी यांनी गृहोद्योगाचा श्रीगणेशा केला. पुरणपोळी, दिवाळीचा फराळ असे पदार्थ त्या घरच्या घरी तयार करायच्या आणि त्याची विक्री हॉटेल किंवा किरकोळ बाजारात करत. हळूहळू त्यांच्या खाद्यापदार्थांना मागणी वाढल्यामुळे त्यांनी स्थानिक महिलांनादेखील त्यांच्या उद्योगात आवर्जून सहभागी करून घेतले. यामुळे इतर महिलांनासुद्धा रोजगाराच्या संधी आणि तेही घराजवळ उपलब्ध झाल्या. माधुरी यांच्या या गृहोद्योगात त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील हातभार लावला. आजही महिला बचतगटाच्या माध्यमातून २५ महिला फराळ विकून आपल्या घरसंसाराला हातभार लावत आहेत.
माधुरी कदम यांचे पती मेकॅनिकल इंजिनिअर होते. २००७ मध्ये त्यांनी नोकरी करताना ‘ओम साईराज मोटर ट्रेनिंग स्कूल’ची स्थापना केली केली. परंतु, स्वतःचा व्यवसाय आणि नोकरी या दोन्हींमध्ये पतीची तारांबळ होत असल्याचे माधुरी यांना जाणवले. मग काय त्यांनी स्वतः देखील गाडी चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. आपल्याला गाडी चालवता येते, हा आत्मविश्वास कमावल्यानंतर माधुरी यांनी ट्रेनिंग स्कूलमध्ये दाखल होणार्यांना गाडी शिकवायला सुरुवात केली. अशाप्रकारे एका यशस्वी नवर्यामागे एक हुशार स्त्रीही तितक्याच ताकदीने उभी राहू शकते, हे माधुरी यांनी सिद्ध केले.
सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक वादळ यावे आणि क्षणार्धात सर्व काही संपून जावे, असा प्रकार माधुरी यांच्या आयुष्यात घडला. २०२१ साली त्यांचे पती अनंत कदम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आजपर्यंतच्या त्यांच्या प्रवासात त्यांना पतीचा खूप मोठा आधार होता. परंतु, अचानक निर्माण झालेल्या या पोकळीमुळे माधुरी यांना या दु:खातून सावरायला काही काळ जावा लागला. परंतु, मुलांचे शिक्षण, कुटुंबाची जबाबदारी पूर्णतः माधुरी यांच्यावर आल्यामुळे त्यांनी फार वेळ न दवडता, मोटर ट्रेनिंग स्कूलचा व्यवसाय पुन्हा तितक्याच ताकदीने सुरू ठेवला.
महिलांना प्रवासात कोणावरही अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये, म्हणून त्यांनीही दुचाकी, चारचाकी वाहने स्वतः चालवावी, असे माधुरी यांचे मत. म्हणूनच मग यासाठी आपल्याला काय करता येईल, याच विचारातून प्रेरित होऊन त्यांनी महिलांना गाडी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. २००७ ते २०२३ या प्रदीर्घ कालावधीत त्यांच्या ट्रेनिंग स्कूलमधून तब्बल २५ हजार महिला व पुरुषांनी प्रशिक्षण घेतले आहे. २००७ साली कल्याणमध्ये सुरू केलेल्या या व्यवसायाच्या प्रगतीची साक्ष म्हणजे आज ‘ओम साईराज मोटर ट्रेनिंग स्कूल’च्या कल्याणमध्ये दोन आणि ठाणे शहरात एक अशा तीन शाखा आहेत. तसेच या ट्रेनिंग स्कूलच्या माध्यमातून १५ कुटुंबीयांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. यासोबतच महिला बचतगटाच्या माध्यमातून २५ महिला फराळ विकून पैसे कमवत आहेत. यासोबतच तर इंग्रजी माध्यमात शिकणार्या मुलांसाठी माधुरीताई इंग्रजी विषयाची शिकवणीदेखील घेतात.
तसेच माधुरी कदम यांचे सामाजिक क्षेत्रात देखील मोलाचे योगदान. कोरोना काळात त्यांनी अनेक गरजूंना मदत केली. ‘अन्नदान हेच श्रेष्ठदान’ या उक्तीप्रमाणे त्यांनी अनेकांना या काळात अन्नधान्याचे वाटप केले. तसेच रस्त्यावर राहणार्या अनेक बेघरांना त्यांनी मायेचे छत्र देऊन आधार दिला. भविष्यात ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी वृद्धाश्रम सुरू करण्याचा माधुरी यांचा मानस आहे. त्यांचा हा समाजोन्नतीचा प्रवास असाच सुरू राहावा, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
श्रेयश खरात