रशिया-युक्रेननंतर आता इस्रायल आणि ‘हमास’ यांच्यात युद्धाची ठिणगी पडली आहे. इस्रायलला डिवचल्यानंतर नेमके कोणते परिणाम होऊ शकतात, याची पुरेपूर कल्पना असतानाही ‘हमास’ने दहशतवादाचा मार्ग पत्करला आणि आपला संहार स्वतःच्या हातानेओढवून घेतला. मग काय इस्रायलनेही ‘हमास’ला जोरदार प्रत्युत्तर देत थेट गाझा पट्टीत प्रवेश केला. इस्रायलला आता अमेरिकेचाही पाठिंबा आहे, तर ‘हमास’ला अरब राष्ट्रांसहित रशिया आणि चीननेही पाठिंबा जाहीर केला. युद्धासाठी उद्युक्त करणार्या ‘हमास’ला इस्रायलने सळो की पळो करून सोडल्यानंतर ‘हमास’कडून आता भावनिक कार्ड खेळण्यास सुरुवात झाली.
रुग्णालयावर हल्ला केल्याचा बागुलबुवा उभा करत त्यात ५०० लोकांचा मृत्यू झाल्याचा आव ‘हमास’ने आणला. परंतु, चौकशीनंतर प्रत्यक्षात रुग्णालयावर इस्रायलने हल्ला केला नसल्याचे स्पष्ट झाले. सर्वांत आधी आगीत हात टाकायचा आणि मग हात पोळलाम्हणून बोंब मारायची, असा हा ‘हमास’चा रडीचा डाव. अनेक परदेशीवृत्तवाहिन्या असो वा मग वृत्तसंस्था, गाझामधील लोकं कशी बेघर झाली, तिथे कसा हाहाकार माजला, याचीच दृश्ये दाखविणय्त गुंग आहेत. गाझाचे अश्रू खरेही असतील. मात्र, इस्रायलचे अश्रू म्हणून खोटे कसे ठरु शकतात? इस्रायलींच्या दुःखाला, अश्रूंना कोणतीही किंमत नाही, असे हे एकतर्फी वार्तांकन कशासाठी? दि. ७ ऑक्टोबरला सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेला. या युद्धात आता ‘हिजबुल्ला’, लेबेनॉन, सीरिया असे अनेक देश, संघटना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या ‘हमास’च्या बाजूने उभे आहेत.
इस्रायल-‘हमास’ युद्धात आतापर्यंत सुमारे दोन लाखांहून अधिक इस्रायली नागरिक विस्थापित झाले आहेत. यापैकी बहुसंख्य लोकांना दक्षिण आणि उत्तरेकडील गाझा आणि लेबेनॉन सीमेजवळील १०५ समुदायांनी बाहेर काढले असून, अनेक इस्रायली नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी राहती घरे स्वतःहून सोडली. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली आहे. इस्रायली राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे गाझा पट्टीपासून चार किलोमीटरपर्यंतच्या २५ समुदायांतून आणि आणखी २८ समुदायांतून दोन किलोमीटरपर्यंत स्थलांतरित होण्याचे आदेश दिलेल्या सुमारे १ लाख, २० हजार विस्थापित इस्रायलींना मदत पोहोचवली जात आहे.
लेबेनॉन सीमेजवळील अनेक इस्रायली नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात राज्य-अनुदानित अतिथीगृहांमध्ये जागा देण्यात आली आहे. उत्तरेकडील सीमेवर हल्ले वाढत असताना किरियत शमोना शहरातून सुमारे २३ हजार इस्रायली नागरिकांना बाहेर काढले जात आहे. लेबेनॉन सीमेजवळील आणखी १४ शहरे रिकामी केली जाणार असून, यामुळे आणखी ११ हजार रहिवासी बेघर होणार आहेत. अनेक इस्रायलींनी उत्तर आणि दक्षिण सीमेजवळील त्यांची घरे आधीच रिकामी केली आहेत. दरम्यान, देशभरातील हॉटेलच्या खोल्या आधीच बुक झालेल्या आहेत. तसेच, अनेक हॉटेल्स बंद आहेत,त्यामुळे गाझा आणि लेबेनॉन सीमेजवळील या इस्रायली विस्थापितांसाठीही जगणे अवघड होऊन बसले आहे. कित्येक मुलांच्या पालकांचाही या संघर्षात दुर्देवी अंत झाला. त्यात ‘हमास’ने अद्याप अनेक इस्रायलींचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवले आहे.
‘हमास’चे दुःख, तेथील बेघर झालेलेलोक यांना सगळीकडे सहानुभूती दाखवण्याचे काम सुरू आहे. मात्र, ‘हमास’ने छेडलेल्या या युद्धामुळे तब्बल दोन लाखांहून अधिक इस्रायली नागरिकांनादेखील बेघर व्हावे लागले. अनेक देशांमध्ये ‘हमास’च्या, पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मोर्चे, निदर्शने निघाले. मात्र, इस्रायली विस्थापितांसाठी फारसे कुणीही काहीही बोलायला तयार नाही. इस्रायली नागरिकांना विस्थापित करणार्या ‘हमास’च्या पापांची शिक्षा इस्रायल सरकार त्यांना देत आहेच. ‘हमास’ला नष्ट करण्याच्या इराद्याने नेतान्याहू सरकार गाझा पट्टीत घुसले. मात्र, त्यावरही अनेकांनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली. पण, इस्रायलच्या नागरिकांना सहानुभूतीदेखील नको. मात्र, दहशतवादी ‘हमास’ला मानवतेच्या चश्म्यातून जगभरातून मिळणारे समर्थन ही नक्कीच चिंतेची बाब म्हणावी लागेल.
७०५८५८९७६७