नवी दिल्ली : एखाद्या मुद्द्यावरून धादांत खोटे करून समाजाची दिशाभूल करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी आपले आजोबा आणि राज्यसभा सदस्य शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवले असून भारतीय लष्कराच्या अग्नीपथ योजनेबद्दल एक आठवड्यात दुसऱ्यांदा खोटे दावे केले आहेत.
सियाचिनमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराचे अग्नीवीर लक्ष्मण गवाते हे कर्तव्यावर असताना हुतात्मा झाले. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी दिशाभूल करणारा मजकूर आपल्या फेसबुक आणि एक्स या समाजमाध्यमांवरील खात्यांवरून प्रसारित केला होता. रोहित पवार म्हणाले की, गवाते हे अग्नीवीर असल्याने त्यांस निवृत्तीवेतन आणि सरकारी लाभ मिळणार नाहीत. त्यामुळे ‘अग्नीवीर’ ही देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांची अवहेलना करणारी योजना असल्याने त्यास विरोध करावा, अशी पोस्ट आमदार रोहित पवार यांनी केली होती. त्याविषयी रोहित पवार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते बोलण्यासाठी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
मात्र, रोहित पवार यांनी धादांत खोटी माहिती प्रसारित केल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय लष्कराने अधिकृतपणे माहिती देऊन अग्नीवीरांना वीरमरण आल्यास मिळणारे लाभ कोणते आहेत, हे स्पष्ट केले आहे. त्यानुसार, नॉन कंट्रिब्युटरी इन्शुरन्सचे ४८ लाख रूपये, सेवानिधीमध्ये अग्निवीराचे ३० टक्के योगदान, केंद्र सरकारचे समान योगदान आणि त्यावरील व्याजाची रक्कम, ४४ लाख रुपये सानुग्रह, मृत्यूच्या तारखेपासून चार वर्षे पूर्ण होईपर्यंत शिल्लक कालावधीचा देय (तात्काळ प्रकरणात १३ लाखांपेक्षा जास्त), आर्म्ड फोर्सेस बॅटल कॅज्युअल्टी फंडातून ८ लाख रूपये आणि आर्मी वाईव्ह्ज वेल्फेअर असोसिएशनतर्फे तत्काळ ३० हजार रुपये आर्थिक मदत अग्नीवीरांच्या वारसदारांना अटी व शर्तींनुसार प्राप्त होणार आहे. विशेष म्हणजे हे स्पष्टीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात येणाऱ्या चुकीच्या संदेशांना अनुसरून देण्यात आल्याचेही भारतीय लष्कराने म्हटले आहे.
वारसा शरद पवारांचा
समाजात दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्याची सवय रोहित पवार यांनी आपले आजोबा आणि राज्यसभा सदस्य शरद पवार यांच्याकडून घेतली आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. कारण, अशाप्रकारे दिशाभूल करणारे दावे करणे हे शरद पवारांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य राहिले आहे. यापूर्वीदेखील शरद पवार यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यास विरोध करताना ८ मार्च २०२० रोजी “आखाती देशात नोकरीच्या निमित्ताने जाणाऱ्या हिंदू, शीख, पारशी, ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि मुस्लिम यांची गटवारी करण्यात आली असून त्यातून भारतात परत येण्यापासून मुस्लिमांना प्रतिबंध केला आहे” असे सांगितले होते. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवरून दिशाभूल करण्याता शरद पवार यांचा वारसा आता रोहित पवार यांच्याकडे आल्याचे दिसून येते.