गणितज्ज्ञ, सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकी जपणार्या त्याचबरोबर देश-विदेशात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणार्या डॉ. निता पाटील यांनी संघर्षावर मात करीत यशोशिखर गाठले त्यांच्याविषयी...
वाणिज्य आणि व्यवस्थापन या विषयात डॉक्टरेट केलेल्या डॉ. महेश पाटील यांनी ठाण्यात ‘सहयोग प्रतिष्ठान’ची २००५ मध्ये मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी अहोरात्र मेहनत करून ही संस्था नावारुपाला आणण्याचे काम करत असतानाच ‘कोविड’ कालावधीत दि. २८ एप्रिल, २०२१ रोजी त्यांचे निधन झाले. एकीकडे संस्थेच्या व्याप वाढत असतानाच दुसरीकडे जोडीदाराचे निधन झाल्यामुळे महेश पाटील यांनी लावलेल्या वृक्षाचे वटवृक्षात रुपांतर करण्याचे काम त्यांच्या सौभाग्यवती डॉ. नीता पाटील यांनी केले. त्याच सहयोग शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या संस्थापिका, ‘लेक वुड्स कॅफे आणि सहयोग हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या संचालिका व सहयोगमंत्रा टूर्सच्या सर्वेसर्वा आहेत. त्यांनी या कंपनीमार्फत आजवर हजारो जणांना देश-विदेशातील संस्कृतीचे दर्शन घडविले.
सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या जळगावसारख्या ग्रामीण जिल्ह्यातून गणित विषयात डॉ. नीता पाटील यांनी शिक्षण पूर्ण करून त्याच विषयात डॉक्टरेटही केली. तसे पाहिले तर गणित विषयात रुची असणार्यांची संख्या फारच कमी त्यातही डॉक्टरेट करणे महाकठीण अशातच डॉ. नीता यांनी आपल्या लहानग्या मुलीला सांभाळत डॉक्टरेट पूर्ण केली. एकीकडे कुटुंब, दुसरीकडे डॉक्टरेटचा अभ्यासक्रम आणि तिसरीकडे ‘सहयोग प्रतिष्ठान’ या शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या संस्थापिका असल्यामुळे त्यासाठी योगदान एकाचवेळी अनेक आघाड्यांवर लढत डॉ. नीता यांनी सर्वच ठिकाणी यश संपादन केले. ‘सहयोग प्रतिष्ठान’मध्ये त्या सध्या सचिव आहेत. ही संस्था मुंबई विद्यापीठ, तसेच ‘महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल एक्सामिनेशन’ यांच्याशी संलग्न असून २० विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात.
डॉ. महेश पाटील यांचे ‘कोविड’च्या काळात निधन झाल्यानंतर त्यांनी सुरू केलेली संस्था नावारुपाला आणण्यासाठी डॉ. नीता आटोकाट प्रयत्न करीत आहेत. ‘कोविड’चे संकट असतानाच त्यांच्या ट्रॅव्हल कंपनीचे व्यवसाय ठप्प झाले. ज्यांनी बुकिंग केले होते त्यांचे पैसे वाहनचालकांना दिले होते. ‘कोविड’मुळे संकट आलेले असतानाच त्यांना आर्थिक फटका बसूनही त्यांनी पर्यटकांचे पैसे परत केले. बिकट परिस्थितीत न डगमगता त्यांनी मोठ्या धैर्याने आलेल्या परिस्थितीशी सामना करत संस्थेच्या वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यामुळेच आजघडीला सहयोगचे नाव सर्वदूर घेतले जात आहे.
त्यांच्या संस्थेत सध्या हॉटेल मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम, कॉमर्स अॅण्ड मॅनेजमेंट, इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी, पॅरामेडिकलशी संबधित विविध २० अभ्यासक्रम घेतले जातात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर त्यांचा भर असतो. त्यासाठी विविध कार्यशाळा, सेमिनार, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना विविध इंडस्ट्रीजमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविले जाते. डॉ. नीता या ‘सहयोग हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या संचालिका म्हणूनही कार्यरत आहेत. त्याअंतर्गत त्या ‘सहयोगमंत्रा टूर्स’ या कंपनीमार्फत पर्यटकांना देश-विदेशतील संस्कृतीचे दर्शन घडविले जाते.
शिक्षण, पर्यटनासोबतच स्वच्छंद वातावरणात सकस आहाराची पर्वणी डॉ. नीता यांनी खवय्यांना दिली आहे. ठाण्यात ब्राह्मण सभेला लागूनच असलेल्या लेक वुड्स कॅफेच्याही त्या संचालिका असून ओपन एअर कॅफेमध्ये ठाणेकर खवय्यांना भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो.
ट्रॅव्हल अॅण्ड टूरिझममध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा, मास्टर्स इन ट्रॅव्हल अॅण्ड टूरिझम, एमबीए इन एअरलाईन्स अॅण्ड एअरपोर्ट मॅनेजमेंट तसेच व्यवसाय प्रशासन व कॉम्पुटर सायन्समधील पदवी शिक्षण असे चौफेर शिक्षण डॉ. नीा यांनी घेतले असून जोशी बेडेकर ठाणे कॉलेज, मिठीभाई मोतीराम कॉलेज वांद्रे अशा नामांकित संस्थांमध्ये प्राध्यापिका म्हणून त्यांनी विद्यादानाचे काम केले आहे. सहयोग कॉलेजमध्ये त्यांनी २००७ पासून आजवर प्रभारी प्राचार्या म्हणून कार्यभार सांभाळला आहे. दिवसभरातील धावपळीतून मोकळा वेळ असेल त्यावेळी विरंगुळा म्हणून डॉ. नीता युट्यूबरवर अध्यात्मिक व प्रेरणादायी व्हिडिओज पाहतात.
सहयोगमंत्रा ट्रॅव्हल आणि सहयोग कॉलेज या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर होत असून या उपक्रमांची ख्यातील देश-विदेशात सर्वत्र व्हावी, यासाठी डॉ. नीता धडपड करीत असतात. तसेच आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रातही कर्तृत्व गाजवावे, अशी त्यांची तीव्र इच्छा आहे. सामाजिक बांधिलकी जपणार्या डॉ. नीता पाटील आजच्या युगातील नवदुर्गा असून त्यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!