योग हा आरोग्य आणि मनःशांतीसाठी उपयुक्तच. तथापि, कर्करोगाशी लढा देणार्या व्यक्तीसाठी योगासने किती लाभकारक असतात, हे सिद्ध करणार्या डॉ. मनीषा सोनवणे यांच्याविषयी...
जळगावात राहत असताना वयाच्या सहाव्या वर्षांपासूनच योग करण्याची लागलेली गोडी डॉ. मनीषा यांना भविष्यात एका सत्कर्मापर्यंत नेईल, हे कधी स्वप्नातही वाटले नसेल. मात्र, चक्क हा गोडवा आनंदाच्या रुपात इतरांना वाटत, त्यांची ही वाटचाल आज सुरू आहे. “आता यामुळे असंख्य चेहर्यांवरचा आनंद बघून सुखावून जाते,” हे भावोद्गार आहेत पुण्यातील डॉ. मनीषा सोनवणे यांचे.
‘इन्स्टिट्यूट ऑफ योगिक सायन्स अॅण्ड कल्चरल सिनेसिस’ या पुण्यातील संस्थेच्या संचालक असलेल्या डॉ. मनीषा यांनी ’yoga the essence of life'’ या तत्त्वावर कार्य करीत आपले जीवन इतरांचे जगणे सुसह्य करण्यासाठी समर्पित केले आणि त्यांना जगण्यातील सुगंध काय असतो, याची प्रचिती दिली. ‘कोणत्याही आजारावर औषध नको, फक्त योग-आसन यांच्यावर विश्वास ठेवा,’ हे त्या इतक्या ठामपणे सांगतात की, डॉक्टर असूनदेखील ‘औषध घेऊ नका’ सांगणारी, ही व्यक्ती समाजासाठी अजबच म्हणावी, असे कुणालाही वाटेल. मात्र, डॉ. मनीषा यांनी हे कृतीतून सिद्ध केले आणि इतरांना आनंद दिला.
“सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही कर्करोग आणि योग यांविषयी सर्वांना मोफत माहिती देत आहोत. यातून कर्करोग बरा होईल, असं आमचं म्हणणंच नाही. परंतु, कर्करोगासोबत आनंदाने जगता येईल, हे मात्र नक्की.” हे डॉ. मनीषा यांचे वाक्य आज कितीतरी अशा लोकांना दुःख, वेदनेपासून दूर नेत आहे. शरीरात असलेला ‘कॅन्सर’ म्हणजेच ‘कर्करोग’ योगाभ्यासाच्या साहाय्याने सुसह्य कसा करता येईल, या प्रश्नाचे उत्तर नक्कीच कठीण आहे. मात्र, डॉ. मनीषा यांनी त्याचे उत्तर सकारात्मक कृतीतून दिले आहे.
“साधारणतः कर्करोगाच्या रुग्णांना थकवा, नैराश्य, चिंता, आत्मविश्वासाचा अभाव आणि भावनिक ताण यांमुळे त्रास होतो. त्यामुळे यावरील त्यांचे जे वैद्यकीय उपचार सुरू असतात, त्यासोबत योगाभ्यासामध्ये सांगितलेल्या काही गोष्टी जर करता आल्या, तर हा कर्करोग सुसह्य होऊ शकतो,” असे डॉ. मनीषा सांगतात. कर्करोगाच्या रुग्णांना शारीरिक, मानसिक, भावनिक आधाराची सर्वाधिक गरज असते. योगशास्त्रामुळे कर्करोगाच्या रुग्णांमध्ये नकारात्मकता दूर होण्यास, लक्षणे कमी होण्यास मदत होते. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे जर दिनचर्येचे पालन केले, तर नक्कीच त्याचा छान फायदा होतो, हे त्यांना आलेल्या अनुभवातून सिद्ध होते.
योगाभ्यासामुळे या आजारातून अनेक फायदे मिळू शकतात, हे संशोधनात सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे, अशा रुग्णांसाठी त्या मोफत योग शिकवितात. नियमित योगासनांचा सराव केल्याने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. तणाव कमी करणे, रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा मजबूत करणे, शरीर डिटॉक्स करणे, शरीरातील ग्रंथींचे संतुलन वाढणे, चांगली झोप येण्यासही मदत होणे, ओमकार थेरपी केल्याने मन शांत व्हायला मदत होते. त्यामुळे चिंता, नैराश्य यांवर मात करायला मदत होणे, त्याचप्रमाणे ‘केमोथेरपी’च्या असंख्य प्रतिकूल परिणामांचा सामना करण्यास मदत होते, हेदेखील डॉ. मनीषा सोनवणे आवर्जून सांगतात.
मेडिकल, डॉक्टर आणि योगशिक्षिका असलेल्या मनीषा यांना कळलेच नाही की, आपल्याला ही जादूची छडी मिळाली. त्यांना फक्त योगाचे आसन सांगणे सुरू केले आणि जवळपास प्रत्येक आजार हळूहळू बरा होऊ लागला. विश्वास असो अथवा नसो, पुण्यातील डॉ. मनीषा ही किमया सहज साध्य करताहेत. दहा वर्षांच्या या प्रयोगांतून त्यांनी स्वतःपुरते एक तंत्र विकसित केलंय, (Disease Wise) आजारांनुसार योगासने. मग काय, पुण्यातल्या पाषाणच्या योग क्रेंदामध्ये औषधे न देता, हा प्रयोग यशस्वी होत असल्याचे त्या अभिमानाने सांगतात.
”मधुमेह, हृदयाचे आजार, रक्तदाब, गुडघेदुखी, कंबरदुखी, सायटिका, फ्रोझन शोल्डर, अतिचिंता, तणाव, नैराश्य, पीसीओडी, महिलांचे इतर आजार यांवर एकही गोळी न देता केवळ ठरावीक योगासने घेऊन हे आजार बरे होतात, यावर कुणाचाच विश्वास बसत नाही. पण, हे १०० टक्के खरे असल्याचे त्या ठामपणे सांगतात. योगासन उपचारापूर्वीचे अहवाल आणि योगासन उपचारानंतरचे अहवाल यांत जमीन-अस्मानाचा फरक दिसून येऊ लागला. यामुळे सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे रुग्णाच्या चेहर्यावर रोगमुक्त झाल्याचे समाधान दिसू लागले.
आपल्या या प्राचीन योगशास्त्राला अनुसरून आपण आपली जीवनशैली ठेवली, तर कदाचित कोणत्याही शस्त्रक्रियेची भीती भविष्यात उरणार नाही! जुनाट सर्दी, दमा, वजन वाढवणं किंवा कमी करणं, थायरॉईड हे फक्त योगासनाने शक्य आहे का? तर होय, शक्य आहे. हे त्यांचे ठाम उत्तर. यामागे शास्त्रीय कारणं आहेत, असेही त्या म्हणतात. त्यामुळे हे आजार फक्त आणि फक्त योग्य पद्धतीने करवून घेतलेल्या योगासनांनी बरे होतात, हे त्यांनी स्पष्ट केले.
गोळ्या-औषधे घेऊन स्वतःच्या शरीराला प्रयोगशाळा बनवू नये, एक आजार बरा करण्यासाठी इतर दहा आजार मागे लावून घेऊन नये, हे ठामपणे सांगणार्या डॉ. मनीषा यांची कार्यकुशलता अनेकांचे वेदनादायी जीवन सुसह्य करीत आहे. त्यांच्या या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.
(अधिक माहितीसाठी संपर्क- ८३०८३१५४९४)
अतुल तांदळीकर