आफ्रिकेतील सिंहांच्या वर्तनावर हवामान बदलाचा परिणाम झाल्याचे अलीकडील काळात झालेल्या अभ्यासात समोर आले आहे. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाच्या अभ्यासात हे वास्तव नमूद करण्यात आले आहे. नुकतेच या विषयीचे संशोधन जर्नल ‘कम्युनिकेशन्स बायोलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले. सिंह हे मानवी वस्तीपासून दूर राहणेच पसंत करतात, असे या अभ्यासात समोर आले. सिंहांच्या अधिवासाचे विभागीकरण झाल्यामुळे त्यांना अन्नाच्या शोधात, त्यांचा अधिवास सोडावा लागतो आणि मानवी वस्तीजवळ यावे लागते. या निष्कर्षातून असे समोर येते की, सिंहांचे अधिवास आकुंचन पावत आहेत आणि अन्न स्रोत दुर्मीळ झाल्याने मानव-सिंह संघर्षाची शक्यता वाढीस लागली आहे.
आफ्रिकेतील 31 विविध ठिकाणी झालेल्या 23 अभ्यासांमध्ये अनेक रंजक बाबी समोर आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या एका समूहाने, या निरीक्षणांचा अभ्यास करून एक अहवाल तयार केला आहे. यानुसार सिंह मूलतः रात्री शिकार करतात. त्यांच्या निष्कर्षातून असे दिसून आले आहे की, सिंह जाणूनबुजून जास्त मानवी प्रभाव असलेल्या भागांपासून दूर राहणेच पसंत करतात. मोठ्या प्रमाणात पशुधन असलेल्या भागांमध्ये, हे वर्तन अधिक स्पष्टपणे दिसून येते. अभ्यासातील सर्वात संबंधित बाबींपैकी एक म्हणजे सध्याच्या सिंहांच्या अधिवासापैकी जवळपास अर्धा भाग संरक्षित क्षेत्राच्या बाहेर आहे. परिणामी, सिंहांना मानवी अधिवासातून मार्गक्रमण करण्यास भाग पाडले जाते. यातून मानव-प्राणी संघर्षाची शक्यता आणखी वाढते.
‘यू-एम इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल चेंज बायोलॉजी’मधील ‘पोस्टडॉक्टरल रिसर्च फेलो’ आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक किर्बी मिल्स यांनी वन्यजीव-मानवी त्रासाला कसा प्रतिसाद देतात, हे समजून घेण्याच्या महत्त्वावर भर दिला आहे. मिल्स यांनी नमूद केले की, निसर्गावरील आणि प्राण्यांच्या अधिवासावरील मानवी क्रियाकलापांचा प्रभाव समजून घेणे, ही मानव आणि वन्यजीव सहअस्तित्व प्रस्थापित करण्याची पहिली पायरी आहे. सिंहाच्या अधिवासांवर मानवी प्रभाव, या संशोधनात अभ्यासला गेला आहे. सोबतच पर्यावरणीय बदलांच्या विस्ताराचे व्यापक परिणाम, या संशोधनातून अधोरेखित करण्यात आले आहेत. सिंहांसाठी जीवनावश्यक घटकांची संख्या कमी झाल्याने मानव-सिंह संघर्षाचा धोका वाढतो. मानवी संघर्ष टाळण्यासाठी सिंह रात्रीची शिकार करू लागले आहेत. मानवी उपस्थितीशी जुळवून घेण्याच्या सिंहांच्या या प्रयत्नावर हा अभ्यास प्रकाश टाकतो.
अन्नसाखळीत सिंह हे सर्वोच्च शिकारी आहेत आणि त्यांच्या वागणुकीतील बदलांमुळे शाकाहारी प्राण्यांच्या संख्येवर आणि वनस्पतींवर मोठा परिणाम होऊ शकतो. शिकारी-शिकार नात्याचे नाजूक संतुलन बिघडून संपूर्ण परिसंस्थेवर त्याचा परिणाम होतो. संभाव्यतः अनपेक्षित मार्गांनी पूर्ण लॅण्डस्केप बदलू शकतो. संशोधनात असेही दिसून आले आहे की, जेव्हा मानवी उपस्थिती कमी असते, तेव्हा सिंहांना शिकार मिळण्याची शक्यता असते. हे सूचित करते की, जेव्हा शिकार कमी प्रमाणात उपलब्ध असते किंवा त्यांच्या अधिवासाची विभागणी होते, तेव्हा सिंह मानवांपासून दूर राहण्याची शक्यता कमी असते.
मिशिगन विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात आजच्या बदलत्या जगात मानव आणि सिंह यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्यावर प्रकाश टाकला आहे. मानवी वर्चस्व असलेल्या लॅण्डस्केपमध्ये एकत्र राहण्यासाठी सिंह त्यांचे वर्तन अनुकूल करतात. याचा सिंहांवर परिणाम होतोच; सोबतच संपूर्ण परिसंस्थेवर दूरगामी परिणामही होतो. यावर उपाय म्हणून स्थानिक समुदायांना संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये सामावून घेऊन, सक्षम करण्याची आणि त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे. यामध्ये सिंह राहत असलेल्या संरक्षित क्षेत्रांसाठी पुरेसा निधी आणि व्यवस्थापन क्षमता समर्पित करणे आणि शांततापूर्ण सहअस्तित्वासाठी धोरणे विकसित करणे समाविष्ट आहे.
सिंहांसारख्या मोठ्या मांसाहारी प्राण्यांच्या यशस्वी संवर्धनासाठी बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे. यातून मानव आणि वन्यजीव यांच्या सहअस्तित्वाला प्राधान्य दिले पाहिजे. हवामान बदल हे एक जागतिक आव्हान आहे, ज्याचा परिणाम केवळ मानवांवरच नाही, तर वन्यजीवांवरही होतो. हा अभ्यास वन्यजीव संरक्षणाच्या प्रयत्नांमध्ये हवामान बदलाकडे अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित करतो.