सध्या इस्रायल-‘हमास’मध्ये युद्ध पेटले असून, युद्धाच्या पहिल्या दिवसापासूनच अमेरिका इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहू यांची भेट घेत इस्रायलला शक्य ती मदत करण्याचे आश्वासनही दिले. गाझा पट्टीत मानवीय साहाय्याकरिता रस्ता देण्यावरही इस्रायलला त्यांनी राजी केले. या चर्चेनंतर हे युद्ध थंडावेल, असे वाटत होते. मात्र, तसे झाले नाही.
बायडन यांनी मायदेशी परतल्यानंतर देशाला संबोधित केले. यामध्ये त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि ‘हमास’ एकसारखेच असल्याचे सांगितले. त्यामुळे रशिया-अमेरिकेतील तणाव आणखी वाढणार असल्याचे निश्चित झाले. तसेच, इस्रायलवर हल्ला हा अमेरिकेवरील हल्ला समजला जाईल, असा इशाराही बायडन यांनी दिला. त्यामुळे परिस्थिती शांत होण्याऐवजी ती आणखीनच चिघळली. यामुळे बायडन नेमके युद्ध शांत करण्यासाठी इस्रायलला गेले होते की पेटवायला, असा प्रश्न उपस्थित होतो.
फेब्रुवारी २०२२ पासून युक्रेन-रशियात युद्धसंघर्ष सुरू आहे, तर ‘हमास’-इस्रायलमध्ये दि. ७ ऑक्टोबरपासून युद्ध भडकले. इस्रायल-‘हमास’ युद्धात अमेरिका सरसावल्यानंतर अमेरिकेचे युक्रेनवरील लक्ष हटेल व युक्रेनला मदत देणे बंद होईल, असे रशियाला वाटले. परंतु, बायडन यांनी ‘हमास’ आणि पुतीन एकसमान असल्याचे सांगत, अमेरिका दोन्ही आघाडीवर लक्ष ठेवून असल्याचा संदेश दिला. फक्त इस्रायलच नाही, तर युक्रेनलाही सहकार्य कायम राहील, असे अमेरिकेने स्पष्ट केले. युक्रेन आणि इस्रायल युद्ध लांबले, त्यामागे अमेरिकेचा मोठा हात आणि फायदा आहे. युद्धकाळात शस्त्रास्त्रांची आवश्यकता अधिक भासते. मदतीच्या नावाखाली शस्त्रविक्री करून अमेरिका आपली तिजोरी भरण्यात पटाईत आहेच.
इस्रायल, युक्रेन आणि अन्य देशांच्या आर्थिक मदतीसाठी अमेरिकेने १०० अब्ज डॉलरची घोषणा केली. यात ६० अब्ज डॉलर युक्रेनला आणि इस्रायलला १४ अब्ज डॉलर मदतीची घोषणा केली. दरवर्षी अमेरिका इस्रायलला तीन अब्ज डॉलर आर्थिक मदत म्हणून देते. आर्थिक मदतीत वाढ करून अमेरिका युक्रेन आणि इस्रायलसोबत उभा असून, मानवतेचा धर्म निभावत असल्याचे दाखविण्याचा हा प्रयत्न. मात्र, अमेरिकेला युद्ध थांबविणे किंवा शांतता प्रस्थापित करण्यात म्हणा कुठलेही स्वारस्य नाही. जिकडे जास्त फायदा, तिकडे अमेरिकेचा मोर्चा. अमेरिकेने इस्रायलला ‘आयर्न डोम इंटरसेप्टर मिसाईल’, मोठ्या प्रमाणावर गायडेड बॉम्ब पाठवले. दोन एअरक्राफ्ट कॅरिअर, एफ-१८ फायटर जेट, सी-१७, एफ-१५, एफ-१६ लढाऊ विमानेही दिली.
गुप्त माहिती, अन्न-औषधे, डॉक्टरांचे पथकही पाठविण्यात आले. ‘हमास’, ‘हिजबुल्ला’, इराण यांना या युद्धाचा फायदा होऊ नये, यासाठी अमेरिका धडपडत आहे. सगळी शस्त्रास्त्रे अमेरिका काही फुकटात देत नाही. याची किंमत एक ना एक दिवस अमेरिका इस्रायलकडून वसूल करेल, यात शंका नाही. युक्रेनमध्ये जसा शस्त्रास्त्रांचा बाजार अमेरिकेने भरवला, तसाच तो आता इस्रायलमध्ये भरवला जात आहे. यातून अमेरिकेचे मोठेपण अधोरेखित होते, शिवाय तिजोरीतही अब्जावधी डॉलर्सची भर पडते, ती वेगळी!
इस्रायल-‘हमास’ युद्धाने रशिया आणि अमेरिका पुन्हा समोरासमोर आले. रशियाने अमेरिकेवर युद्ध भडकावण्याचा आरोप केला असून, अमेरिका इस्रायलच्या बाजूने उभा राहिला आहे. २०२२ मध्येही अमेरिकेने युक्रेनची बाजू घेत शस्त्रास्त्रे पुरवली, यामुळे युद्ध लांबले. १९३९ ते १९४५ पर्यंत चाललेल्या दुसर्या महायुद्धावेळी हे दोन्ही देश आमनेसामने होते. यातून कोरियाची उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया अशी विभागणी झाली. तेव्हापासून दोन्ही देशांतील तणाव कायम आहे. शस्त्रास्त्रे खरेदीसाठी दोन्ही कोरियन देश अमेरिका आणि रशियावर अवलंबून असतात.
अमेरिका-रशिया शीतयुद्धाचे अफगाणिस्तान तर जीवतं उदाहरण. १९७०च्या दशकात अफगाणिस्तानमध्ये रशिया समर्थित सरकार होते, जे बरखास्त करण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला हाताशी धरून ‘तालिबान’ला जन्म दिला. १९९० मध्ये रशिया समर्थित सरकार बरखास्त करण्यात अमेरिका यशस्वी झाला. ज्याचा फटका पुढे जाऊन अमेरिकेलाही बसला. रशिया असो वा अमेरिका, या दोन्ही देशांना युद्धातून विध्वंस आणि त्यातून व्यापार आणि वर्चस्व प्रस्थापित करायचे असते, हेच यानिमित्ताने पुन्हा सिद्ध झाले!
७०५८५८९७६७