दंगलीच्या ज्वालामुखीवर युरोप

    22-Oct-2023
Total Views | 178
Editorial on Former jihadists found working in Swedish schools

एका स्वीडिश अहवालानुसार, ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेतून परत आलेल्या दहशतवाद्यांकडून स्वीडनला धोका निर्माण झाला आहे. या दहशतवादी संघटनेतून परत आलेले सदस्य सहजपणे रोजगार मिळवण्यात यशस्वी होत असून पुन्हा इराक, सीरियामध्ये जाताना आढळून आले आहेत. त्यातच इस्रायल-‘हमास’ युद्धामुळे युरोप पेटले असून हा संघर्ष आणखीन उफाळण्याचीच शक्यता जास्त!

एका नुकत्याच जाहीर झालेल्या स्वीडिश अहवालानुसार, ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया’ (इसिस) या दहशतवादी संघटनेतून परतलेल्या दहशतवाद्यांकडून देशाला मोठा धोका निर्माण झाला आहे. एका दहशतवाद्याने दोघा स्वीडिश फुटबॉल चाहत्यांना गोळ्या घालून ठार केले. त्याने स्वतःला ‘मुजाहिद्दीन’ म्हणून घोषितही केले. ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेतून नॉर्डिक राष्ट्रात परतलेल्या सुमारे ४० टक्क्यांपेक्षाही अधिक दहशतवादी समाजात मिसळून गेले असून, ते सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची धक्कादायक बाब या अहवालातून उघडकीस आली आहे.

‘इसिस’मध्ये सहभागी होण्यासाठी स्वीडन सोडून गेलेली एक महिला आता परतली असून, ती एका शाळेमध्ये काम करते. मध्य-पूर्वेत केलेल्या गुन्ह्यांसाठी तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या अहवालात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, दहशतवादी संघटनेतून परत आलेल्या ८३ पैकी २१ जणांना रोजगारही मिळाला, तर चक्क २४ जणांना सरकारी नोकरीही मिळाली. पोलिसांनी वेळोवेळी इशारा दिला होता की, जे ‘इसिस’मध्ये सहभागी झालेले होते, त्यांना कोणीही कामावर घेऊ नये. कारण, ते कट्टरपंथी असल्याने पुन्हा दहशतवादाच्या मार्गावर वळू शकतात. तसेच इतरांनाही रोजगार मिळवून देण्यासाठी मदत करू शकतात. तथापि, स्वीडनमध्ये सर्वाधिक ‘इसिस’चे सदस्य सहजपणे नोकरी-व्यवसाय करत असल्याचे दिसून येते.

‘इसिस’सोबतच अन्य दहशतवादी संघटनांच्या मार्फत कट्टरपंथीय रोजगार मिळवण्यात यशस्वी होताना दिसून येतात. शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक संघटना, व्यवस्थापन आदी क्षेत्रांत ते उजळमाथ्याने कार्यरत आहेत. ‘इसिस’साठी काम करून परत आलेल्या सदस्य धर्म तसेच वैचारिक बाबतीत अधिक कट्टर होतो. म्हणूनच ते पुन्हा दहशतवादाकडे वळण्याची शक्यताच जास्त. यासाठीच दहशतवादी संघटनेच्या भरती आणि प्रचारावर मर्यादा आणण्याची गरज तीव्र झाली आहे. गरज भासल्यास हे सर्व सदस्य सीरिया तसेच इराकमध्ये जात असल्याचे देखील निदर्शनास आले आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून या सर्वांना एक संधी देण्यात यावी, अशी भावना तेथे व्यक्त केली जात असली, तरी अशी संधी देणे समाजाला धोकादायकच. जिहादमुळे संपूर्ण जगालाच धोका निर्माण झाला असून, भारत त्याचा गेली अनेक दशके बळी ठरला आहे. आता स्वीडनसह युरोपीय देशांनाही याच समस्येने ग्रासलेले दिसते.

इस्रायल-‘हमास’ संघर्षानंतर युरोपला त्याच्या झळा बसल्या आहेत. दहशतवादी संघटना ‘हमास’च्या समर्थनार्थ युरोपमध्ये हजारोंच्या संख्येने निघणारे मोर्चे वांशिक हिंसाचाराला चालना देणारेच ठरले. शिक्षण क्षेत्रात काम करत असलेल्या या ‘इसिस’ सदस्यांमुळे लहान मुलेही त्यांच्या नकळत जिहादी होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना रोखण्यासाठी त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर नजर ठेवण्याचे काम सुरक्षा यंत्रणांना करावेच लागेल. या सदस्यांना कोणताही धोका नसला, तरी त्यांच्यापासून संपूर्ण प्रदेशाचीच शांतता धोक्यात आली आहे, हे नक्की!

इस्रायलने गाझा पट्टीवर कारवाई सुरू केल्यानंतर दहा लाखांहून अधिक पॅलेस्टिनी बेघर झाले. त्यांच्या समर्थनार्थ इंग्लंडसह संपूर्ण युरोपमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर एकत्र आले. लंडनमध्ये हजारो पॅलेस्टिनी समर्थक एकत्र येत इस्रायलने हवाई हल्ले थांबवावेत आणि नाकाबंदी हटवावी, अशी मागणी करताना दिसून आले. पोलिसांनी ‘हमास’ तसेच अन्य कोणत्याही प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ भूमिका घेतली, तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगूनही हे हजारो आंदोलक एकत्र आले, हे चिंताजनक असून संपूर्ण युरोपमध्ये तणाव वाढत असल्याचे हे द्योतक म्हणावे लागेल.

पॅरिस, बर्लिन, रोम, माद्रिद यांसारख्या शहरांमध्ये हे आंदोलक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. ‘युरोपीय महासंघा’तील फ्रान्स आणि जर्मनी या दोन देशांमध्ये ज्यू तसेच मुस्लीम बहुसंख्येने आहेत. तेथे सर्वाधिक तणाव वाढलेला दिसतो. फ्रान्सचे गृहमंत्री क्षी गेराल्ड डार्मनिन यांनी म्हटले आहे की, पॅलेस्टिनी समर्थकांच्या निदर्शनांवर बंदी ही घातलीच पाहिजे. त्यामुळे सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था धोक्यात येत आहे. तेथे निदर्शनांवर बंदी घातली असून, हजारो निदर्शकांना अटकही करण्यात आली आहे. पॅरिसमधील जगप्रसिद्ध लुव्र संग्रहालयही बंद ठेवावे लागत आहे.

लंडन येथे तर तब्बल एक लाख समर्थक एकत्र आले. इंग्लंडची काळजी वाढवणारी, ही संख्या. इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी स्वतः इस्रायलला भेट देत इस्रायलला पाठिंबा दिला आहे, हे महत्त्वाचे. त्यामुळे युरोपमध्ये केव्हाही वांशिक दंगलींचा विस्फोट होऊ शकतो. सर्वाधिक मुस्लीम निर्वासितांना युरोपमध्ये आश्रय मिळतो. म्हणूनच दहशतवादी संघटनांचे म्होरके, हस्तक युरोपमध्ये अगदी सहज मिसळून जातात. त्याचवेळी युरोपमधील देशांना मानवाधिकारांचे पालन करणे बंधनकारक आहे. तसेच ‘हमास’ला सर्वात जास्त निधी युरोपमधूनच दिला जातो. जे दहशतवादी युरोपमध्ये स्थिरस्थावर झाले आहेत, ते हा निधी पुरवतात. त्या निधीतूनच ही दहशतवादी संघटना इस्रायलवर दहशतवादी हल्ले करते, ते आता जगजाहीर.

‘हमास’ने कोणतेही नियम न पाळता इस्रायलवर जो आजपर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला, त्याबद्दल कोणी अवाक्षरही उच्चारत नाही. मात्र, इस्रायलने युद्धाचे सर्व नियम पाळावेत, अशी अपेक्षा जगभरातील नेते, मानवाधिकार संघटना व्यक्त करत आहेत, हा विरोधाभास. दहशतवादी सर्व नियम पायदळी तुडवत चिमुरड्या मुलांची क्रूर हत्या घडवून आणते, त्यांची गोळ्यांनी चाळण करते, बाळांना जीवंत जाळते. मात्र, इस्रायलने या राक्षसी दहशतवाद्यांचा अन्नपाणीपुरवठा बंद करायचा नाही, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. तथाकथित मानवाधिकारांनी इस्रायलच्या निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहेच; त्याशिवाय आता संपूर्ण युरोपला दंगलीच्या ज्वालामुखीवर उभे केले आहे. इस्रायल-‘हमास’ संघर्षाला मिळणारे युरोपमधील बळच संपूर्ण जगाला तिसर्‍या महायुद्धात लोटणारे ठरणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

'या'देशातील मुस्लिमांना हजयात्रा करता येणार नाही, भारतासोबत १४ देशातील नागरिकांच्या व्हिसांवर बंदी

Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही...

कंपनीतील कर्मचार्‍यांना कुत्र्याप्रमाणे रांगायला, जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडलं; काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

कंपनीतील कर्मचार्‍यांना कुत्र्याप्रमाणे रांगायला, जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडलं; काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

Kerala Firm Viral Video : एका खाजगी कंपनीतील बॅासने कर्मचाऱ्यांसोबत अमानुष वागणूक केल्याचा संतापजनक प्रकार केरळमधून समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दोरीने बांधलेल्या गळ्यात पट्टा लावलेल्या कुत्र्यांप्रमाणे रांगायला लावल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असून संबंधित बॉसवर कडक कारवाईची मागणी होत आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कामगार मंत्रालयाने याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता हा कथित व्हिडिओ ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121