विचार उमजणार्‍या प्रेक्षकांतून चित्रपट पुढे जाईल : गणेश मतकरी

    21-Oct-2023   
Total Views |
Talk With Film Critic Ganesh Matkari
 
चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, काही वेळेस ते समाजप्रबोधन, मूल्यशिक्षण तर काही वेळेस ते कलेचे अविष्कार असतात. चित्रपट हे एका अर्थाने नव्या काळातील साहित्यच! परंतु, ते कसे पाहावे, हे सांगणारा समीक्षक इथे महत्त्वाची भूमिका बजावतो आणि म्हणूनच ही एक प्रकारची मनस्वी आणि परखडपणे तसेच अभ्यासपूर्ण केलेली पत्रकारिता. असेच एक पेशाने स्थापत्यविशारद असले तरी ख्यातनाम चित्रपट समीक्षक म्हणजे गणेश मतकरी. त्यांच्या ‘चित्रपट प्रवाहांचा इतिहास : जागतिक आणि भारतीय’ या पुस्तकाच्या निमित्ताने गणेश मतकरी यांना ‘वसंत शंकर उपाध्ये स्मृति-सृजनशील पत्रकारिता पुरस्कारा’ने नुकतेच गौरविण्यात आले. त्यानिमित्त मतकरी यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला हा सिनेसंवाद...
 
तुमचं शिक्षण वास्तुविशारद (आर्किटेक्चर) क्षेत्रामधील आहे आणि तुम्ही त्याव्यतिरिक्त चित्रपट समीक्षा करता. परंतु, तुम्हाला पुरस्कार मिळाला, तो सृजनशील पत्रकारिता पुरस्कार. तेव्हा तुमच्या दृष्टिकोनातून पत्रकारिता म्हणजे नेमके काय?

- हा जरा कठीण प्रश्न आहे! पत्रकारितेची व्याख्या फक्त रोजच्या बातम्यांपुरती मर्यादित असू नये, तर तिचे अनेक पैलू आहेत, असं मी म्हणेन. विशिष्ट काळाशी जोडलेली कला, साहित्य, संस्कृती यांबद्दल निरीक्षण आणि विचार, हा त्याचा महत्त्वाचा भाग असायला हवा. आताच्या काळात तो तसा कितपत उरला आहे, याबद्दल मात्र मी साशंक आहे. माझ्या मते, कला-साहित्य आपल्या जीवनाशी जोडलेलं आहे, त्यामुळेच ‘समीक्षा’ हा पत्रकारितेतला एक आवश्यक भाग जरूर असू शकतो. एखाद्या कला प्रकाराबाबत बोलणं, त्यातून उपस्थित होणारे मुद्दे मांडणं, तिचा बदलत्या काळासंबंधातला विचार, त्याबद्दलची चर्चा हे सारंच त्यात आलं! मी वास्तुविशारद (आर्किटेक्ट) आहे आणि पूर्णवेळ लेखनाकडे वळण्याआधी बराच काळ प्रॅक्टिस आणि चित्रपट समीक्षा एकाच वेळी करत असे. पण, या दोन्ही गोष्टी करताना नाटक-चित्रपटांच्या ‘क्रिएटिव्ह’ बाजूशीही माझा संबंध येत गेला. लहानपणापासून नाट्यसंस्थेत काम, मालिका आणि नंतर चित्रपटाचं सहदिग्दर्शन, पटकथालेखन अशा गोष्टी केल्यामुळे कर्ते आणि आस्वादक, अशा दोन्ही बाजूंनी मी चित्रपटाकडे पाहू लागलो, ज्याचा मला समीक्षक म्हणूनही फायदा झाला. मी पाहिलयं, बरेचदा वृत्तसमीक्षा एकांगी पद्धतीने केली जाते. विशिष्ट कलाकृतीमागची सृजनात्मकता किंवा दिग्दर्शकाची अशा विशिष्ट मांडणी मागे काय भूमिका असेल, या गोष्टीचा विचार वृत्तपत्रीय समीक्षा लिहिताना केला जात नाही. त्यावेळी त्या क्षणी पाहणार्‍या व्यक्तीला ती कलाकृती आवडली आहे की नाही, एवढंच पाहिलं जातं. हे टाळता आलं पाहिजे. पडद्यावरची गोष्ट आपल्याला अमूकरितीने दाखवलेली आवडली असती, असा विचार न करता, ती जशी दाखवली आहे, तशी का दाखवली, हा विचार लिहिणार्‍याने केला तर चित्रपट त्याच्यापर्यंत अधिक पोहोचू शकेल. अशी समीक्षा करता येणं आणि ती करण्याचं स्वातंत्र्य असणं, हा कलाकेंद्रित पत्रकारितेचा आवश्यक भाग आहे.

पत्रकारिता आणि राजकारणाचा खूप जवळचा संबंध. पण, खरंतर प्रत्येक क्षेत्रात हे ’कारण’ असतंच. म्हणजे कला क्षेत्रातील राजकारण, साहित्यकारण, रंगभूमीवरचं, तसं चित्रपट आणि समीक्षालेखन या तुमच्या क्षेत्रात असे काही मूकवाद आहेत का? त्याविषयी तुम्ही काय सांगाल?

चित्रपटातल्या राजकारणाचा तसा समीक्षेशी थेट संबंध नाही; पण काही कलाकार, दिग्दर्शक सकारात्मक समीक्षा छापून आणावी म्हणून समीक्षकांना काही ’फेव्हर’ करतात, असं ऐकलं जातं. पण, माझ्या अनुभवाप्रमाणे मराठी वृत्तसमीक्षेत तो प्रकार फारसा नाही. तरीही एक अडचण आहे. ती म्हणजे अनेकदा चित्रपटाविषयी लिहिणारी व्यक्ती अनेक जबाबदार्‍या पेलत असते. चित्रपटासंबंधातल्या बातम्या, मुलाखती घेणं, हे सारं करताना तिने त्याबरोबरच समीक्षा करणंही अपेक्षित असतं. अशावेळी चित्रपटाबद्दल मत प्रतिकूल झालं, तरी ते मांडणं अवघड होऊन बसतं. कारण, त्याने संबंध बिघडू शकतात. काही वेळा विशिष्ट वृत्तपत्रांचे हितसंबंध असू शकतात, जे जपावे लागतात. त्यांच्या वैचारिक, राजकीय धारणांचा मान ठेवावा लागतो. त्याबरोबरच अलीकडे ‘पेड प्रमोशन’ही अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. या सगळ्यांचा दबाव लिहिणार्‍यावर येऊ शकतो. मी म्हणेन की, समीक्षक आणि मनोरंजन बीट सांभाळणारा या दोन व्यक्ती वेगळ्या असल्या आणि वृत्तपत्राच्या व्यवस्थापनाचा समीक्षकाला पूर्ण पाठिंबा असला, तर असे प्रश्न उद्भवणार नाहीत.

भारतीय समाजघडणीत भारतीय चित्रपटाचे काय योगदान आहे, असं तुम्हाला वाटतं? तसंच भारतीय चित्रपटासमोर आजघडीला काय आव्हाने आहेत?

समाजाच्या घडणीवर चित्रपटाचा प्रभाव असण्यापेक्षा चित्रपटांच्या घडणीवरच समाजाचा अधिक प्रभाव असतो. म्हणजे बघ, चित्रपटांमध्ये आपण सज्जनच राजकीय नेते दाखवायचं ठरवलं, तर सर्वच नेते त्या प्रभावाने सज्जन होतील का? याउलट समाजामध्ये एखादी ठळक घटना घडली, तिचे पडसाद मोठ्या प्रमाणावर समाजात उमटले, तर चित्रपटात आपल्याला त्याचं प्रतिबिंब जरूर उमटलेलं दिसेल. मग ती घटना सकारात्मक असो वा नकारात्मक. आता दुसरा मुद्दा असा की, समाजात सरसकट आढळणार्‍या अनेक गोष्टीही आपल्याला चित्रपटात दिसलेल्या खपत नाहीत. त्याला ‘सेन्सॉर बोर्डा’ची हरकत असते. अगदी सिगारेट ओढणं, पात्रांच्या तोंडी असलेले अपशब्द, जे आपण सर्रास बाहेर ऐकतो. पण, चित्रपटात ते दिसले की, ‘डिस्क्लेमर’ लावावे लागतात, ऑडिओ कट द्यावे लागतात. हा काय प्रकार आहे? बरेचदा या गोष्टींचा वापर चित्रपटात व्यक्तिरेखांची प्रवृत्ती दाखवण्यासाठी, संघर्ष गडद करण्यासाठी केला जातो. पण, ही साधी गोष्टही आपण समजून घेऊ शकत नाही. पुन्हा असल्या उपायांचा फार उपयोग नाही, हे आपण ‘ओटीटी’ वा ‘इंटरनेट’च्या मुक्त वापरातून पाहतोच आहोत, तिथे यावर काहीच बंधनं नाहीत. माझ्या मते, आज सेन्सॅारशिप ही (रिडण्डन्ट) अनावश्यक आहे. पण, बंधन हवच असेल तर ते वयाचं हवं. एकदा का विशिष्ट वयापलीकडच्या लोकांना समज आली, असं आपण मानलं, तर त्यांना आपण जे पाहतो, त्याचा अर्थ कळेल, अशी अपेक्षा का करू नये? नंतर आणखी कात्री लावण्याची काय गरज आहे? विशिष्ट वयाला माणूस मत देण्याइतका, लग्न करण्याइतका ‘मॅच्युअर’ होत असेल, तर त्याला चित्रपट पाहण्याएवढी प्रगल्भता येणार नाही का? आव्हानांबद्दल म्हणशील तर मला वाटतं की, चित्रपट जास्तीत जास्त अर्थपूर्ण करणं, हे मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. तसंच दुसरं आणि महत्त्वाचं आव्हान आपल्यासमोर आहे, ते कला शिक्षणाचं. मुलांना आपण कलास्वाद शिकवतच नाही. त्यांना या विषयाचं महत्त्व कळेल इतका त्याचा अंतर्भाव आपल्या शिक्षण पद्धतीत असायला हवा. कला आणि साहित्याची ओळख शालेय वयातच मुलांना व्हायला हवी. त्यांना त्या क्षेत्रामध्ये काम करायचं नसलं, तरीसुद्धा कलेचा विकास होण्यासाठी चांगले आस्वादकही आवश्यक आहेतच. पूर्वीपासूनच आपल्याकडे चित्रपटाला ‘करमणूक’ हे लेबल लावलं गेलंय, ज्यामुळे चित्रपटही एक कला असू शकते, असा आपण विचारच करत नाही. चित्रपटातला आशय पोहोचतो, तो या कलात्मक विचारातूनच! आपला चित्रपट पुढे जाईल, तो हा विचार उमजणार्‍या प्रेक्षकांमधूनच!
 
काही चित्रपट म्हणावे तेवढे चित्रपटगृहात चालत नाहीत, ही अवस्था मुंबईत तर शहराबाहेरच्या लोकांचे काय, असा प्रश्न आहेच. हा प्रश्न जोवर आपण सोडवत नाही, तोवर त्याच्याकडे मनोरंजन म्हणून पाहिले गेले, तर चूक कुणाची, असा दुसरा प्रश्न उरतोच. तेव्हा प्रेक्षकांना हवा तेव्हा, हवा तो चित्रपट पाहता यावा, यासाठी काही प्रणाली असावी का?
 
मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाही, ही ओरड नवी नाही. मधल्या काळात गावोगावी एसटी स्टॅण्डच्या बाजूला चित्रपटगृह उभारण्याची योजनाही विचाराधीन होती. कोणत्याही विशेषतः मराठी चित्रपटाला सुरुवातीच्या काही दिवसांत जर ’फूटफॉल’ नाही मिळाला, तर तो चित्रपट पुढे चालत नाही. सगळा हिशेब पहिल्या विकेण्डचा आहे. इतर प्रांतांत त्यांच्या भाषेतल्या चित्रपटाला प्रेक्षकांची पहिली पसंती असते. बॉलीवूड वगैरे त्यानंतर येतं. पण, आपली गोष्ट उलटीच आहे. आपला प्रेक्षक म्हणतो, हिंदीत मनोरंजन अधिक, ग्लॅमर अधिक. शिवाय मुंबई हे मराठीप्रमाणे हिंदीचंही केंद्र आहे. आपल्याला ती भाषा नीट येते. त्यामुळे तो चित्रपट आपल्याला जवळचा वाटतो. हे चित्र बदलायचं, तर प्रेक्षकांनी तक्रारी न करता आपल्या भाषेतल्या चांगल्या, कौतुक होणार्‍या चित्रपटाला आवर्जून चित्रपटगृहात हजेरी लावण्यापासून सुरुवात व्हायला हवी. बदलाची ती सुरुवात असेल!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.