नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय दलांना दहशतवादाचा सामना करणारे सर्वोत्कृष्ट दल बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी पोलिस तंत्रज्ञान मिशनची स्थापना करण्यात आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी केले.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी शनिवारी 'पोलीस स्मृती दिना'निमित्त देशाची राजधानी नवी दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस स्मारक येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दहशतवादाविरोधात ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण ठेवले आहे. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी मोदी सरकारने कठोर कायदे केले आहे. त्याचप्रमाणे भारतीय पोलिस दलाचे आधुनिकीकरण करण्यासाठी 'पोलीस तंत्रज्ञान अभियान' स्थापना करण्यात आली आहे. याद्वारे भारतीय पोलिस दलास जगातील सर्वोत्तम दहशतवादविरोधी दल बनण्याच्या दिशेने काम केले आहे, असे गृहमंत्री शाह म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार तीन नवे फौजदारी कायदे आणत असल्याचे गृहमंत्री शाह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, या नव्या कायद्यांद्वारे देशाच्या फौजदारी न्याय व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडणार आहे. हे नवे कायदे ब्रिटीश काळात बनवलेल्या जवळपास १५० वर्षे जुन्या कायद्यांची जागा घेणार असून ते आपल्या संविधानाच्या भावनेनुसार प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे संरक्षण करतील. पंतप्रधान मोदी यांनी न्यायालयांमधील प्रलंबित खटले बंद करण्यावर भर दिला आहे. पोलीस तंत्रज्ञान अभियान, ३ नवीन कायदे आणि आयसीजेएस द्वारे फौजदारी न्याय व्यवस्थेत पारदर्शकता आणि गती आणण्याचे आम्ही जे लक्ष्यदेखील साध्य होईल, असेही गृहमंत्री शाह यांनी यावेळी नमूद केले आहे.