नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये लपलेला भारताचा आणखी एक मोस्ट वाँटेड दहशतवादी मारला गेला आहे. या दहशतवाद्याचे नाव दाऊद मलिक असल्याचे सांगितले जात असून तो 'जैश-ए-मोहम्मद' या जागतिक दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचा जवळचा आहे. 'जैश-ए-मोहम्मद' व्यतिरिक्त दाऊद मलिक हा लष्कर-ए-जब्बारचा संस्थापकही होता. त्याचा लष्कर-ए-झांगवीशीही संबंध होता.पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या भारताच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांना ठार मारण्याची प्रक्रिया गेल्या काही काळापासून सुरू आहे. अलीकडेच शाहिद लतीफ नावाचा दहशतवादी मारला गेला. लतीफ हा पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड मानला जातो. तर दुसरा दहशतवादी आयएसआय एजंट मुल्ला बहूर उर्फ होर्मुझ आहे. त्याच्यावरही अज्ञातांनी गोळ्या झाडल्या होत्या.
खरे तर भारतात दहशतवादी कारवायांसाठी हवे असलेले अनेक दहशतवादी पाकिस्तान, कॅनडा आणि इतर देशांमध्ये लपून बसले आहेत. काही काळापासून पाकिस्तानातच नव्हे तर कॅनडा आणि ब्रिटनमध्येही लपून बसलेले दहशतवादी कोणत्या ना कोणत्या कारणाने मारले जात आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामधील संबंधही बिघडले आहेत.पाकिस्तानातील उत्तर वझिरीस्तानमध्ये दाऊद मलिकची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर वझिरीस्तानच्या मिराली भागात दाऊद मलिक एका क्लिनिकमध्ये गेला असताना काही मुखवटाधारी बंदूकधाऱ्यांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केली. मुखवटा घातलेले माणसे तिथे आधीच त्याची वाट पाहत होते.
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानातील बालाकोटवर हवाई हल्ला केला तेव्हा दाऊद मलिक तेथे उपस्थित होता, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. हे सर्व दहशतवादी पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था आयएसआयच्या संरक्षणात राहतात. असे असूनही ते लक्ष्य बनत आहेत.यापूर्वी मारला गेलेला दहशतवादी शाहिद लतीफ हा पाकिस्तानातील गुजरांवाला येथील रहिवासी होता. अज्ञात हल्लेखोरांनी जवळून गोळ्या झाडल्या. २०१६ च्या पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफ याने ISI कडून विशेष प्रशिक्षण घेतले होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने लतीफला सियालकोट सेक्टरच्या प्रमुखाची जबाबदारी दिली होती.
मारला गेलेला दुसरा दहशतवादी मुल्ला बहूर उर्फ होर्मुझ आहे. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या बलुच लोकांचा प्रदेश बलुचिस्तानमध्ये त्याला गोळ्या घालण्यात आल्या. बहौरने कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण करून त्यांना आयएसआयच्या ताब्यात दिल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय नौदलातून निवृत्त झालेले कुलभूषण जाधव सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत.त्याआधी गेल्या महिन्यात 'लष्कर-ए-तैयबा'चा प्रमुख हाफिज सईदचा जवळचा अबू कासिम याला रावळकोटमध्ये गोळ्या घालण्यात आल्या होत्या. खलिस्तान कमांडो फोर्सचा दहशतवादी आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड परमजीत सिंग पंजवाड याचीही पाकिस्तानात अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.जैशचा दहशतवादी जहूर मिस्त्रीही मारला गेला. कंदहार विमान अपहरण प्रकरणात जहूर मिस्त्री सहभागी होता. त्याचवेळी रावळपिंडीत दहशतवादी बशीर अहमद मीर उर्फ इम्तियाज आलम याला गोळ्या घालण्यात आल्या. हिजबुल मुजाहिद्दीनकडे लॉन्च पॅड हाताळण्याची जबाबदारी होती आणि तो पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करत असे.