देश-विदेशातील हिंदू तीर्थस्थळे

    21-Oct-2023
Total Views | 146
Hindu pilgrimage in India and Abroad

आपल्या संस्कृतीच्या जगभर पसरलेल्या पाऊलखुणा वाचणे, ही एक आनंदाची पर्वणी! ही संस्कृती बहरली ती तिला लोकांनी आपलीशी केली, शाश्वत (time tested) होती म्हणून. जिथे-जिथे भारतीयांनी प्रवास केला, तिथे-तिथे तिनेही प्रवास केला आणि तेथील लोकांनी ती आत्मसात केली. म्हणूनच तिच्या पाऊलखुणा आजही जगभरात सर्वत्र दिसतात. या पाऊलखुणा विध्वंसक नाहीत, तर जगाच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या, रचनात्मक आहेत. त्या जीवनातील सृजनशीलतेला, आयुष्याच्या रसरशीतपणाला वाढवणार्‍या आणि त्या सर्वेश्वर जगतव्यापी, परमोच्च शक्तीबरोबर सर्वांना एकरूप करणार्‍या आहेत. संस्कृतीच्या चहुदिशांना पसरलेल्या या पाऊलखुणांचा मागोवा घेण्याचं खूप मोठं काम लेखिका दीपाली पाटवदकरने ‘देश-विदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे’ या तिच्या नव्या पुस्तकाद्वारे केलं आहे. विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाने प्रकाशित केलेले, हे पुस्तक अतिशय महत्त्वाच्या विषयावरचे आहे.

सुमारे ३१ देशांत आजही भारतीय संस्कृती आढळून येते. लेखिकेने पुस्तकात केवळ स्थापत्य किंवा सापडलेल्या मूर्तींबद्दल लिहिलेले नाही, तर त्यामध्ये इतिहास आहे, खाद्य संस्कृती आहे, गणित आणि खगोल शास्त्रे आहेत, विविध कला आहेत आणि तत्त्वज्ञानही आहे. छोट्या-छोट्या कथाही आहेत. हे पुस्तक वाचणे आपला वारसा किती अनमोल आहे, याची जाणीव करून देणारे, मानसिक शांती आणि समाधान देणारे तसेच आपली समजूत कैकपटींनी वाढवणार आहे. पुस्तकाचा आवाका बघितला की, लेखिकेचा अभ्यास आणि मेहनत दिसून येते.

भारताला ‘हप्त’, ‘हिंदू’, ’इंडिया’, ‘हिंदुस्तान’ असे बाहेरच्यांनी म्हंटले आहे. या तिन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. म्हणूनच ‘हिंदू संस्कृती’ आणि ‘इंडिक कल्चर’ ही एकच संज्ञा आहे. तसेच ‘हिंदू’ या शब्दात हिंदू, जैन, बौद्ध, शीख, वनवासी, गिरीवासी इत्यादी सर्व भारतीय पंथ व मते येतात. सहजच देश-विदेशातील हिंदू तीर्थस्थळांमध्ये बौद्ध स्तूप आणि विहार, जैन मंदिरे, हिंदू मंदिरे आणि शीख गुरुद्वारा अशा सर्वांचा समावेश होतो. स्वस्तिचिन्हांचे पुस्तक आपल्याला भारताच्या बाहेरील तीर्थस्थळांची यात्रा घडवून आणते. या पुस्तकातून केवळ मंदिरे, मूर्ती, गुंफा यांचा आढावा घेतला नाहीये, तर शिलालेख, नाणी आणि अमूर्त चिन्हे जसे भाषा, अंक, यज्ञ परंपरा, गणित आणि विज्ञान परंपरा, तंत्रज्ञान, कॅलेंडर, उपासना आणि उत्सव असा सर्वांचा आढावा घेतला आहे.
भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, न्याय, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पद्धती इत्यादी आईसलंडपासून व्हिएतनामपर्यंत पोहोचले होते. भारतात परकीय सत्ता आल्यानंतर भारताचे बाहेरील देशांशी प्रस्थापित असलेले संबंध संपुष्टात आले. काळाच्या ओघात या संबंधांच्या स्मृतीसुद्धा राहिल्या नाहीत. १९व्या शतकातसुद्धा अफगाणिस्तानपासून व्हिएतनामपर्यंतच्या मोठ्या भूभागाला (Greater India) किंवा ‘बृहत्तर भारत’ असे म्हटले गेले. भारतीय संस्कृतीच्या स्वस्तिचिन्हांची यात्रा सात भागांत केली आहे-

१. वायव्यशल्य - पाकिस्तान, अफगाणिस्तान
२. उत्तरकुरू - उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, शिनजियांग
३. ईशान्यसूत्र - चीन, मंगोलिया, कोरिया, जपान
४. पूर्वमित्र - तिबेट, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार
५. आग्नेयपुराण - थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया
६. दक्षिणद्वीप - अंदमान- निकोबार, श्रीलंका, लक्षद्वीप, मालदीव
७. पश्चिमगाथा - इराण, इराक, इजिप्त, ग्रीस, रोम, युरोप, अमेरिका आणि आफ्रिका

भारताच्या वायव्येला असलेला प्रांत म्हणजे आजचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा प्रांत. या प्रांतात कित्येक तीर्थस्थळे आहेत, ज्यांचा उल्लेख वेदात, इतिहासात आणि पुराणात आला आहे. ऋग्वेदात येथील नद्यांची वर्णने आली आहेत. रामायणातील रामाला वनवासात पाठवणारी कैकयीसुद्धा याच प्रांतातली. कैकयीच्या मनात विष कालावणारी मंथरा इथलीच. महाभारताच्या युद्धात कौरवांच्या बाजूने लढणारा शल्य राजा या प्रांतातला. दुर्योधनाला कूमार्गाला लावणारा शकुनी याच प्रांतातला. निःशस्त्र अभिमन्यूच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला जयद्रथ पण याच प्रांतातला. पुराणातून विष्णूशी वैर करणारे हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू बंधूदेखील याच प्रांतातले.

अर्थात, या प्रांताला दुसरी चमकणारी बाजू पण आहे. हिरण्यकश्यपूच्या विरोधाला न जुमानता विष्णूची भक्ती करणारा प्रल्हाद इथला. तक्षशिला नगरी वसवणारा रामाचा भ्रातृज तक्ष इथला. सूर्योपासना करणार्‍या कृष्णाच्या मुलाची सांबची ही कर्मभूमी. सिकंदरचा सामना करणारा राजा पुरू पण इथला आणि दाहीर, आनंदापाल, भीमपाल यांसारखे इस्लामी आक्रमणाचा प्रतिकार करणारे राजे पण इथलेच!

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन्ही राष्ट्र तसे पहिले तर नवीन आहेत. १८व्या शतकापर्यंत भारत आणि पर्शिया एकमेकांचे शेजारी होते. पर्शियाचा पूर्वेचा भाग आणि भारताचा वायव्य भाग पोखरून, १८व्या शतकात अफगाणिस्तानचा जन्म झाला, तर २०व्या शतकात भारताच्या विभाजनातून पाकिस्तानची निर्मिती झाली.

अफगाणिस्तानमध्ये अनेक देवतांच्या मूर्तींचे अवशेष मिळाले आहेत-शिव, पार्वती, दुर्गा, गणपती, कार्तिकेय, सूर्य, गंगा माता इत्यादी. तसेच बुद्धाच्या कित्येक मूर्ती मिळाल्या आहेत. बामियानच्या प्रसिद्ध महाकाय मूर्ती २१वे शतक उजाडताना तालिबानने फोडल्या. अलीकडे पाकिस्तानात तर पावलोपावली हिंदू तीर्थस्थळे आहेत. शिवाचे कटासराज नावाचे तीर्थस्थळ, देवीची दोन शक्तिपीठे, सूर्याची वैभवशाली मंदिरे, वरुणाचे मंदिर, प्रल्हादाने बांधलेले नरसिंहाचे मंदिर, राम-कृष्णाची मंदिरे, लव-कुशाचे मंदिर, गीतेची मंदिरे, वाल्मिकींचे मंदिर सिंधू नदी, सिंधू नदीतील साधूंचे बेट, सरस्वती नदीचे कोरडे पात्र, तिच्या काठावर पूर्वी असलेले ब्रह्माचे मंदिर. गुरुनानकांचे जन्मस्थान, पंजासाहिब गुरुद्वार, बौद्ध विहार, जैन मंदिरे. अर्थात हे सगळे अवशेष आहेत. पडून गेलेली, पाडलेली, दुर्लक्ष केली गेलेली स्थळे आहेत.

पलीकडे उत्तर दिशेच्या यात्रेत - बाह्मिक, काम्बोज, उत्तर कुरू या प्रांताची यात्रा. आज हे देश उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिझस्तान आणि चीनचा विघूर प्रदेश हे आहेत. येथील चतुर्भुजा देवीच्या मूर्ती, शिव-पार्वतीची चित्रे, बुद्धाच्या भव्य मूर्ती, मोठमोठे बौद्ध विहार, प्राचीन बौद्ध स्तूप मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. सातव्या शतकात आलेला चिनी प्रवासी शुआन झांग या मार्गाने भारतात आला होता. त्याने लिहिले आहे की, पामीर पर्वत ओलांडून ताजिकिस्तानमध्ये आलो, तिथपासूनच भारताचा सुगंध दरवळू लागला. जणू भारताने मला आलिंगन देण्यासाठी दोन्ही बाहू पसरले होते!

ईशान्य यात्रेत चीन, मंगोलिया, कोरिया आणि जपान या देशांची यात्रा केली आहे. या देशांमध्ये गांधार व काश्मीरमधील श्रमणांनी बौद्ध धर्माचा प्रसार केला. येथे पोहोचलेल्या बौद्ध धर्मावर पौराणिक धर्माची छाप होती. त्यामुळे इथे गणपती, दुर्गा, सरस्वती यांसह अवलोकितेश्वर, मंजुश्री, तारा आदी देवता दिसतात.

गौतम बुद्धाने मगधच्या बोली भाषेत प्रवचने केली. तोच धडा गिरवत, त्याच्या अनुयायांनी बुद्धाची शिकवण त्या-त्या ठिकाणच्या बोली भाषेत लिहिली. या देशांमध्ये बुद्धाची शेकडो सूक्त/सूत्रे भाषांतरित केली गेली. सुवर्णप्रभाससूत्र किंवा (The Sutra of The Golden Light) हे कदाचित सर्वात लोकप्रिय असावे. या सूत्रात लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा यांची स्तुतिस्तोत्रेसुद्धा आहेत. हे सूत्र राष्ट्राच्या रक्षणासाठी, राजाच्या रक्षणासाठी राजदरबारात गायले जात असे. चीन, कोरिया व जपानमध्ये शेकडो वर्षं सुवर्णप्रभास सूत्राचे गायन केले गेले.

पूर्वेला नेपाळ, बांगलादेश व म्यानमार या देशांची यात्रा. नेपाळ तर आपला जुळा भाऊ आहे. या देशांमधील शक्तिपीठे, पाकिस्तानमधील दोन शक्तिपीठे, बांगलादेशमधील सहा शक्तिपीठे, श्रीलंकेतील दोन शक्तिपीठे ही तीर्थस्थळे भारताच्या धार्मिक सीमा दर्शवतात. आग्नेय दिशेच्या यात्रेत अर्थात आग्नेय आशियाई देशात फार पूर्वी भारतीयांनी हिंदू संस्कृतीचा वटवृक्ष तिथे लावला आणि त्याला खतपाणी घालून वाढवला. या प्रांतात भारतीयांनी आपली संस्कृती प्रेमाने रुजवली. कम्बोडियाचा राजपुत्र नॉरडोम सिहनौक (Prince Norodom Sihanouk) यांनी म्हटले की, “दोन हजार वर्षांपूर्वी भारतीयांनी आमच्या वाडवडिलांना देव दिले, विज्ञान आणि तंत्रज्ञान दिले आणि विविध संस्था दिल्या. ज्याप्रमाणे पाश्चिमात्य देशांना ग्रीक संस्कृतीने घडवले, तसे आग्नेय आशियाई देशांना भारताने घडवले.”

या देशांमधील प्रसिद्ध हिंदू तीर्थस्थळ आहे-कम्बोडियाचे अंकोर वाटचे विष्णू मंदिर. तसेच व्हिएतनाममधील कित्येक मंदिरे, लाओसमधील मंदिरे, थायलंडमधील हजारो मंदिरे, इंडोनेशियामधील शेकडो मंदिरे, म्यानमार आणि मलेशियामधील मंदिरे आणि तिथे वाहणारी मां गंगा अर्थात मेकोंग नदी! दक्षिणेला असलेल्या द्वीपांमध्ये-इंद्रद्वीप (अंदमान) आणि नागद्वीप (निकोबार), लक्षद्वीप, ताम्रपर्णी (श्रीलंका), मालाद्वीप (मालदीव) आदी बेटांवर असलेली अनेक तीर्थस्थळे. जसे श्रीलंकेतील अनेक मंदिरे, रामायणातील अशोक वाटिकादी स्थळे, विहार आहेत. मालदीव येथे काही मंदिरे, विहार केवळ अवशेष रुपात आहेत आणि पूज्य मूर्ती वस्तुसंग्रहालयात शोभेच्या वस्तू म्हणून ठेवलेल्या आहेत.

पश्चिम दिशेच्या यात्रेत इराण, इराक, तुर्कस्तान, इजिप्त, ग्रीस, रोम, युरोप आणि अमेरिका येथे मिळणारी ‘भारतीय संस्कृतीची अमूर्त स्वस्तिचिन्हे’ पुस्तकातून दिली आहेत. या भागात भारतीय देवांनी, लोकांनी, गुरांनी, प्राण्यांनी, भाषांनी, कथांनी, वस्त्रांनी, मसाल्यांनी, विज्ञानांनी, गणिताने आणि खगोलशास्त्राने केलेला प्रवास पाहायला मिळतो. भारतातून पूर्वेला जसे चीन, मंगोलिया, जपान व आग्नेय आशियातील देशात बौद्ध भिक्षू धर्म प्रचारार्थ गेले, तसे ते पश्चिमेला इराण, इराक, ग्रीसमध्ये पण गेले. येशू ख्रिस्ताच्या कैक शतके आधी त्या भागात बौद्ध धर्म पोहोचला होता व त्याचे अनुसरण करणारे लोक तिथे होते.

बौद्ध विचारांचा, पूजापद्धतींचा छाप ख्रिस्ती धर्मावर पडलेला दिसतो, तो या कारणास्तव. या पुस्तकातून भारतीय माणसाने, साहित्याने, विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने हिमालयाच्या आणि समुद्राच्या सीमा ओलांडून अनेक देशांत केलेला प्रवास मांडला आहे. अनेक ब्राह्मण, श्रमण, राजे, राजपुत्र, राजकन्या, व्यापारी, कारागीर, कामगार, शेतकरी, गोपालक, मेंढीपालक भारताबाहेर गेले. त्यांच्या बरोबर भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, न्याय, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पद्धती यांचे ज्ञान युरोपपासून व्हिएतनामपर्यंत पोहोचवले. मध्य युगात इस्लाम व युरोपियन आक्रमणाच्या काळात भारतीयांचा बाहेरील देशांवरील प्रभाव कमी झाला. महाराष्ट्रात तर समुद्रापार जाणार्‍याने प्रायश्चित्त घ्यावे, असे सांगितले गेले. इतर देशांशी असलेले आपले संबंध संपुष्टात आले आणि यथावकाश या उज्ज्वल स्मृतीसुद्धा विरून गेल्या.

हे पुस्तक वाचून बृहत्तर भारताच्या अवाढव्य पसार्‍याची कल्पना येते. सांस्कृतिक भारताच्या व्याप्तीची कल्पना येते. यातून इतिहासाचा अनेकपदरी पट उलगडून दाखवला असल्याने आपले पूर्वज कोण होते व त्यांचे कर्तृत्व काय होते, ते कळते. आपल्यावर ‘भारतीय’पणाच्या विषयी लादल्या गेलेल्या न्यूनगंडाचे खोटे आवरण फाटून जाऊन आपले स्वरूप कळते. या पुस्तकाला विनय सहस्रबुद्धे यांची प्रस्तावना लाभली आहे. पुस्तकाची व्याप्ती मोठी असली तरी, ते पुस्तक किचकट, क्लिष्ट नाही. दीपाली पाटवदकर यांनी वाचकस्नेही शैलीत लिहिलेले पुस्तक लहान-मोठ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे असेच आहे.

पुस्तकाचे नाव : देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे
लेखिका : दीपाली पाटवदकर, संपर्क (९८२२४५५६५०) 
प्रकाशक : विवेकानंद केंद्र मराठी विभाग
पृष्ठसंख्या : २५२
मूल्य : ३०० रु.
विभावरी बिडवे
अग्रलेख
जरुर वाचा
न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळलं; सीमेन्स कंपनीच्या सीईओसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळलं; सीमेन्स कंपनीच्या सीईओसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

(Hudson River Helicopter Crash) अमेरिकेच्या न्यू यॉर्कमधील हडसन नदीत गुरुवार दि. १० एप्रिल रोजी प्रवासी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. न्यू यॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक पायलट आणि स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे. मृतांमध्ये सीमेन्स कंपनीचे स्पेनचे अध्यक्ष आणि आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुले यांचाही समावेश आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121