ठाणे : कंत्राटी भरतीचा अध्यादेश रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे सरकारी नोकरीतही युवा वर्गावरील कंत्राटी नोकरीचे `जोखड' दूर होईल, अशी प्रतिक्रिया कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज येथे व्यक्त केली.
राज्यातील तरुणांवर कंत्राटी भरती लादण्याचे कारस्थान कोणी केले होते, याचे सज्जड पुरावे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केले. त्यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगारांच्या भविष्यावर कोण कुऱ्हाड चालवित होते, ते उघड झाले आहे. कंत्राटी नोकरीची पद्धत संपुष्टात आणून महायुती सरकारने पवित्र नवरात्रोत्सवात राज्यातील तरुण-तरुणींना दिलेली ही भेट आहे. या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभारी आहोत, असे आमदार डावखरे यांनी म्हटले आहे.
मुंबई पोलिस दलातील तीन हजार पोलिस व शिक्षकभरतीसाठी उत्सूक असलेल्या बेरोजगारांचा आत्मसन्मान व आत्मविश्वास दृढ करणारा हा निर्णय आहे. या निर्णयामुळे नोकरी मिळालेले तरुण नोकरीच्या पहिल्या दिवसापासून निवृत्तीपर्यंत देश व महाराष्ट्राप्रती समर्पित भावनेने कार्य करू शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विश्वमित्र योजना व राज्यात प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून पाच लाखांहून अधिक तरुणांमध्ये अंगभूत कौशल्याचा विकास केला जाणार आहे. या उपक्रमाची काल सुरूवात झाली असताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेऊन कुशल तरुणांना सरकारी कायम नोकरीची नवी संधी निर्माण केली आहे, याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारी आहोत, असे आमदार डावखरे यांनी म्हटले आहे.