डोंबिवलीतील गरबा उत्सवात किरीट सोमय्या यांनी गरब्याच्या तालावर धरला फेर
नमो रमो नवरात्र व रासरंग उत्सवात उपस्थिती
20-Oct-2023
Total Views |
डोंबिवली : सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या तर्फे नमो रमो नवरात्र उत्सव आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या रासरंग नवरात्र उत्सवात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी हजेरी लावत गरब्याच्या तालावर फेर धरला. डोंबिवलीतील संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलात नमो रमो नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा गरबा म्हणून या गरब्याची ओळख आहे. या उत्सवासाठी ६५ हजार स्क्वेअर फूटांचे भव्य डोम उभारण्यात आला असून तो पूर्णपणे वातानुकूलित आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक संजय धबडे निर्मित हेमाडपंथी मंदिराची भव्य कलाकृती साकारण्यात आली आहे. संपूर्ण परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तर सेल्फी पाईण्टस हे या उत्सवाचे खास आकर्षण आहे. यंदाच्या वर्षी फूड कोर्टची ही व्यवस्था केली आहे. या उत्सवाला गरबाप्रेमींनी गर्दी केली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून डोंबिवली येथील डी.एन.सी. शाळेच्या मैदानात डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ आयोजित भव्य दांडिया रासरंग - २०२३ उत्सवात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी हजेरी लावत गरब्याच्या आनंद घेतला.
या उत्सवाच्या पाचव्या माळेला गेली अनेक वर्षे समाजकार्य करत रुग्णसेवा करणाऱ्या मोहिनी जोशी आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या जयश्री रगडे यांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी भगवद्गीतेतील संपूर्ण श्लोक पाठांतर करत जगभरात नावलौकिक मिळवणाऱ्या ओम दाभाडकर याचा आणि त्याला हे उत्तम संस्कार देणाऱ्या त्याच्या आजी उज्ज्वला दाभाडकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.