पुणे : विश्वचषक २०२३ अंतर्गत पुण्यात सामने खेळविण्यात येत आहेत. परंतु, पुणे येथील गहुंजे स्टेडियमवर खेळविण्यात येणाऱ्या सामन्यांचे तिकीट लोकांना मिळत नसल्याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, पुणे येथील गहूंजे स्टेडियमवर बऱ्याच कालावधीनंतर विश्वचषकाचे सामने खेळविण्यात येत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी या सगळ्याप्रकारावर भाष्य केले असून ते म्हणाले, पुण्यात होणाऱ्या विश्वचषकातील क्रिकेट सामन्यांच्या तिकिटासंदर्भात अनेकजण विचारणा करतायेत. ऑनलाईन तिकिट मिळताना काही अडचणी येत आहेत, हे खरं आहे, मात्र तिकीट विक्री ही एमसीएच्या अखत्यारीत येत नाही तर सर्व नियंत्रण हे आयसीसीकडे आहे. त्यामुळं तिकीटासंदर्भात तुम्हाला येणाऱ्या अडचणींबाबतचा मेसेज योग्य ठिकाणी पोचवला जाईल, असे रोहित पवारांनी 'X' पोस्टच्याद्वारे सांगितले.
तसेच, विश्वचषक २०२३ अंतर्गत पुण्यात १९, ३० ऑक्टोबर, १, ८ आणि ११ नोव्हेंबर रोजी सामने होणार आहे. या सामन्याच्या तिकिटांसाठी बुकींग सुरु झाली आहे. परंतु अनेकांना तिकीट मिळत नाही. सोशल मीडियावर यासंदर्भात प्रतिक्रिया उमटत आहे.
दरम्यान, तब्बल २७ वर्षांनंतर पुण्यात वर्ल्डकपचा सामन्याचं तिकीट मिळवण्यासाठी पुणेकर एकच गर्दी करताना दिसून आले आहेत. क्रिकेट फॅन्सची तिकीट मिळवण्याची धडपड सुरू असताना, आमदार रोहित पवार यांनी, इंस्टाग्राम सेलिब्रिटींना मोफत तिकीट दिलं जाईल अशी घोषणा केली आहे. मात्र हे तिकीट मिळवण्यासाठी रोहित पवार यांनी एक अट ठेवली आहे.
तर या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'जर तुमच्या इंस्टाग्राम रिलला २० लाखांहुन अधिक व्ह्यूज असतील तर तिकीट द्यायची जबाबदारी आमची.' हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
पुणे येथील गहुंजे स्टेडियमवरील पुढील सामने
अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका - ३० ऑक्टोबर, २०२३
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका- १ नोव्हेंबर, २०२३
इंग्लंड विरुद्ध नेदरलँड- ८ नोव्हेंबर, २०२३
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश- १२ नोव्हेंबर,२०२३