नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एनआयए) इसिसशी संबंधित मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहनवाज उर्फ शफी यास दक्षिण पूर्व दिल्लीतून अटक केली आहे. शाहनवाज हा पुणे इसिस प्रकरणात प्रमुख आरोपी होता.
दिल्ली पोलिसांनी प्रमाणावर शोध मोहिमेनंतर इसिसशी संबंधित असलेल्या एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे.
शाहनवाज असे संशयिताचे नाव आहे. एनआयए काही काळापासून त्याचा शोध घेत होती आणि त्याच्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आयएस दहशतवादी शाहनवाजसह मोहम्मद अर्शद वारसी आणि रिझवान नावाच्या संशयितास अटक केली आहे. सोमवारी सकाळी त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले असता १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. इसिसच्या पुणे दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात आदिल नावाच्या अभियांत्रितीच्या विद्यार्थ्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. आदिल हा जामिया येथील रहिवासी आहे.
राजधानीत इसिसचे तीन दहशतवादी लपल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलीस सतर्कतेत आले आणि त्यांनी तिघांचा शोध सुरू केला. त्याने आयईडी बनवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्याकडे बॉम्ब बनवण्याची क्षमता आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिस आणि एनआयएच्या पथकांनीही दहशतवाद्यांच्या शोधात मध्य दिल्ली परिसरात छापे टाकले होते.