गुन्हेगारी, दंगली, महिला आणि दलितांवरील अत्याचारात राजस्थान अग्रस्थानी!
कन्हैयालाल यांची हत्या महापाप; पंतप्रधान नरेंद्र मोदींची गेहलोत यांच्यावर टीका
02-Oct-2023
Total Views | 40
जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानच्या चित्तोडगडच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी अनेक विकास योजनांचा पाया रचला. राजस्थानचा सर्वांगीण विकास फक्त भारतीय जनता पक्षच करू शकतो, असे ते म्हणाले. चित्तौडगडमध्ये एका विशाल जनसभेला संबोधित करताना त्यांनी अशोक गेहलोत यांच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी उदयपूरच्या घटनेला महापाप असल्याचे सांगतानाच महिला आरक्षणाबाबत काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवरही हल्लाबोल केला. राजस्थानमधील भ्रष्टाचारावरही त्यांनी गेहलोत यांच्यावर टीका केली.
चित्तौडगडमध्ये जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “इथे अशोक गेहलोत झोपेत मुख्यमंत्र्यांची खुर्ची वाचवण्यात व्यस्त होते आणि अर्धी काँग्रेस त्यांची खुर्ची पाडण्यात व्यस्त होती. जनतेला वेठीस धरुन हे लोक आपापसात भांडण्यात मग्न राहिले. काँग्रेसने राजस्थानला लुटण्यात कोणतीही कसर सोडली नाही."
ते पुढे म्हणाले, “५ वर्षात काँग्रेस सरकारने राजस्थानची विश्वासार्हता नष्ट केली आहे. मी अत्यंत दु:खी मनाने सांगतो की, गुन्हेगारी, दंगली, महिला आणि दलितांवरील अत्याचाराच्या बाबतीत राजस्थान अग्रस्थानी आहे. अत्यंत दुःखाने मी तुम्हाला विचारतो की, तुम्ही ५ वर्षांपूर्वी काँग्रेसला मतदान का केले होते?"
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कन्हैयालाल यांच्या हत्येची सुद्धा आठवण काढली ते म्हणाले की, "कपडे शिवण्याच्या बहाण्याने लोक येतात आणि न घाबरता टेलरचा गळा कापतात, या प्रकरणातही काँग्रेस मतपेढीचे राजकारण करते. उदयपूर हत्याकांडात काँग्रेस पक्षाने काय केले, व्होट बँकेचे राजकारण केले का?, असा सवाल त्यांनी काँग्रेसला केला."