इस्रायल-‘हमास’च्या संघर्षात गाझा पट्टीचा उत्तर भाग जवळपास उद्ध्वस्त झाला. इमारतींचे भग्नावशेष आणि धुळीचे साम्राज्य असे सध्या गाझा पट्टीचे विदारक चित्र. त्यातच इस्रायलने सर्वार्थाने गाझाची कोंडी केल्याने अन्नपाण्यापासून ते इंधनापर्यंत गाझामध्ये सगळ्याच वस्तूंची भीषण टंचाई निर्माण झाली. पण, आता संयुक्त राष्ट्र, अमेरिकेसह इतरही देशांमधून गाझा पट्टीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचा ओघ सुरू झालेला दिसतो. गाझाच्या इजिप्तला लागून असलेल्या राफा सीमेनजीक सध्या अनेक जीवनावश्यक सामग्री असलेले ट्रक्स गाझामध्ये प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. पण, गाझासाठी ही मदत केवळ इस्लामिक देशांकडून आली, असे नाही.
एकट्या अमेरिकेनेच गाझासाठी १०० दशलक्ष डॉलर्सची मदतीची घोषणा केली. त्याचवेळेला हा मदतनिधी केवळ आणि केवळ गाझामधील निर्वासितांच्या मदतीसाठी, पुनर्वसनासाठी वापरला जावा, अशी तंबीही अमेरिकेने दिली. कारण, सद्यःस्थिती बघता, या निधीचा गाझावासीयांपेक्षा ‘हमास’च्या दहशतवाद्यांनी आणखीन दहशत पसरविण्यासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी वापर करण्याचाच धोका अधिक. आता गाझाला अमेरिकाही मदतीचा हात देत असेल, तर म्हणा मुस्लीम मानवतावादी कार्यकर्तेही कसे मागे राहतील? म्हणूनच ‘नोबेल’ पुरस्कार विजेती मलाला युसूफझाईनेही तीन संस्थांमार्फत तब्बल अडीच कोटी मदत गाझाला देण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. मलालाने तिच्या गाझातील मुस्लीम बंधू-भगिंनीसाठी उदार अंतःकरणाने घसघशीत मदत जाहीर केली, त्याचे कौतुकच. पण, यानिमित्ताने स्वतःला मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून मिरवणारे मलालासारखे कार्यकर्तेही धर्म-वंश बघूनच गरजूंना मदत करतात का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
जगात केवळ इस्रायल-‘हमास’ नव्हे, तर रशिया-युक्रेन आणि अन्य देशांतही युद्धजन्य, अंतर्गत गृहयुद्धाची परिस्थिती. आफ्रिकेतील पाच देशांमध्ये तर नुकतीच तेथील लष्कराने सत्ता काबीज केली. मग अशावेळी या देशांतील नागरिकांच्या मदतीसाठी मलालासारख्या जागतिक कीर्तिमान प्राप्त मानवाधिकार कार्यकर्त्यांनी खरोखरच धाव घेतली का? की मलालासारख्या मुस्लीम मानवाधिकार कार्यकर्त्यांना केवळ मुस्लीम मानवांच्या अधिकारांचाच तेवढा कळवळा, असे म्हणायचे, हाच खरा प्रश्न!
म्हणजे, एकीकडे गाझा पट्टीसाठी पाश्चिमात्य देशांनी मदत करावी, ही मुस्लीमजगताची अपेक्षा. त्यातही हे सगळे पाश्चिमात्य देश ख्रिश्चनबहुल. युरोपमधील याच पाश्चिमात्य देशांमध्ये मुस्लीम निर्वासितांनी मात्र वातावरण गढूळ केले. आपला धर्म, चालीरिती लादून तेथील शांतता भंग केली. प्रसंगी रक्तही सांडले. पण, जेव्हा जेव्हा हे मुस्लीम देश गृहसंकटात ओढले जातात, तेव्हा तेव्हा मदतीची अपेक्षा मात्र याच पाश्चिमात्य देशांकडून केली जाते. म्हणजे पाश्चिमात्यांची संस्कृती नको, त्यांचे शिक्षणही नको, ती माणसंच नको; पण आपल्या देशात संकटजन्य परिस्थिती ओढवली की, धाव घ्यायची ती याच पाश्चिमात्य देशांकडे. मदत, पैसा तो याच देशांकडून. असा हा सगळा दुटप्पीपणा.दुसरीकडे मुस्लीम देशांनीही गाझा पट्टीतील निर्वासितांना स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहेच. त्यामुळे मुस्लीम राष्ट्र असो, मुस्लीम मानवाधिकार कार्यकर्ते किंवा त्यांच्या संघटना, यांना इतर धर्मीयांशी देणेघेणे नाहीच आणि स्वतःच्या बांधवांप्रतीही केवळ रस्त्यावर उतरून आंदोलने करण्यापुरताच त्यांचा काय तो वास्तविकतेशी संबंध!
आता मलालाने गरजू गाझावासीयांना मदतीची घोषणा केली, त्याचे स्वागत. पण, मलालाच्या जगभरातील तिच्याच धर्मबांधवांनी तिला उलट खडे बोलही सुनावले. रशिया-युक्रेन युद्धात जसा रशियाचा विरोध मलालाने नोंदवला, तसा तिने यंदा इस्रायलचे थेट नाव घेत निषेध का नोंदवला नाही? रुग्णालयातील ५०० जणांच्या मृत्यूसाठी इस्रायलच जबाबदार आहे, हे मलालाने जाहीर करावे वगैरे मागणी सोशल मीडियावर केली गेली. पण, मागणी करणारे एक मात्र विसरले की, पाकिस्तानातील कट्टरतावादी मुस्लीम दहशतवादाचीच बळी ठरलेली मलाला आज इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातून ती शिक्षणाचे धडे घेते. त्यामुळे मलालाच्या घरापासून, शिक्षणापर्यंत आणि तिच्या समाजकार्यापर्यंत तिचा जवळचा संबंध हा मुख्यत्वे पाश्चिमात्य देशांशी. त्यामुळे साहजिकच मलाला असे धाडस करण्याची शक्यता तशी धुसरच!