नवी दिल्ली : मोदी सरकारने केंद्र सरकारी कर्मचारी निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केली आहे. या निर्णयामुळे सुमारे ४८ लाख कर्मचारी आणि ६८ लाख निवृत्ती वेतनधारकांना लाभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकारपरिषदेत दिली. यावेळी केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचे केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी सांगितले.
या वाढीव भत्त्यानंतर महागाई भत्ता ४२ वरून ४६ टक्के झाला आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता नोव्हेंबर महिन्यापासून वाढीव वेतन मिळणार आहे. यात जुलै ते ऑक्टोबर या कालावधीतील थकबाकीचाही समावेश असेल. या निर्णयाचा लाभ ४८.६७ लाख कर्मचारी आणि ६७.९५ लाख निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे. त्याचप्रमाणे या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर १२ हजार ८५७ कोटी रुपयांचा भार पडणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने बिगरराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचे वेतन उत्पादकता आधारित बोनस म्हणून मंजुर केले आहे. या निर्णयाचा लाभ ११ लाख ७ हजार ३४६ कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यामध्ये ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्तर, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ हेल्पर, पॉइंट्समन, मंत्रालयीन कर्मचारी यांचा समावेश आहे.
रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ
देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने विविध निर्णय घेतले असून स्वामीनाथन समितीचा अहवाल लागू करणे हा प्रमुख निर्णय असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, तेलबियांच्या दरात २०० रूपये प्रतिक्विंटल, मसुरच्या दरात ४२५ रूपये, गहू १५० रूपये, बार्ली ११५ रूपये, चणा १०५ तर सूर्यफुलाच्या दरात १५० रुपये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय मंत्रिमंडळाने लडाखमधील १३ गिगावॅट क्षमतेच्या अक्षय ऊर्जा प्रकल्पातून वीज पारेषणासाठी २० हजार ७७३ कोटी कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.