नवी दिल्ली : दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय शांततेसाठी सर्वात गंभीर धोका असून कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाचा बिमोड करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी कझाकस्तानमध्ये भारत आणि मध्य आशियाई देशांच्या एनएसए परिषदेस संबोधित करताना केले आहे.
प्रादेशिक सुरक्षेस दहशतवादाचा सर्वांत मोठा धोका आहे. दहशतवाद आणि दहशतवादाशी संबंधित कोणतीही कृती, त्याची प्रेरणा काहीही असो त्याचा बिमोड करणे आवश्यक आहे.. या धोक्याचा सामना करण्यासाठी त्यांनी कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या बैठकीत सहभागी ५ देशांना पूर्ण अर्थसहाय्यित क्षमता निर्माण कार्यक्रम देऊ केले. डोवाल यांनी मध्य आशियाई शेजारी देशांना चाबहार बंदराचा सागरी व्यापारासाठी तसेच भारतीय कंपनीद्वारे संचालित शहीद बेहेश्ती टर्मिनल वापरण्यासाठी आमंत्रित केले. आयएनएसटीसीच्या चौकटीत चाबहार बंदराचा समावेश करण्यासाठी त्यांनी पाठिंबा देण्याची विनंती केली.
दळणवळण विकास करताना सर्व देशांच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करणे महत्त्वाचे आहे, असे डोवाल यांनी सांगितले. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हवरील (बीआरआय) वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर डोवाल म्हणाले की, मध्य आशिया आणि भारत यांच्यात थेट जमीनमार्ग नसणे ही विसंगती आहे. ही स्थिती एका विशिष्ट देशाच्या जाणीवपूर्वक नकारात्मक धोरणाचा परिणाम आहे, अशीही टिका डोवाल यांनी केली आहे.