देऊळ म्हणजे श्रद्धास्थान. त्यात देवीचे मंदिर म्हणजे ती केवळ भाविकांना आश्वस्त करत नाही, केवळ संरक्षण हे तिचं कर्तव्य नाही. ती शक्ती प्रदान करते. ऊर्जा देते, प्रेरणा देते. सर्व भाविकांवर आपली मधाळ मायाळू नजर नियमित राहावी म्हणून ती उंच डोंगरावर वसलेली असते. नवदुर्गांच्या मालिकेतील आजची चौथी देवी श्री वज्रेश्वरी माता. विरार पूर्वेला वज्रेश्वरी या गावात तिचे मंदिर आहे. मंदिर पुरातन आहे. गावाचे नाव तिला न मिळता, तिच्या नावाने गाव वसवले गेले. यावरूनच तिच्या प्राचीनतेची साक्ष मिळते. तिच्या हातात वज्र असल्याने तिला वज्रेश्वरी म्हणत असावेत, असे सांगण्यात येते.
ही देवी नवासासायासास प्रसन्न होणारी आहे, असे कळल्यावर चिमणाजी आपा पेशवे त्यांच्या निवडक सहकार्यांना घेऊन देवदर्शनाला आले आणि देवीला नवस केला. धर्मावर आलेले संकट टाळण्यासाठी आणि पोर्तुगीज ख्रिस्ती फिरंग्यांकडून सक्तीचे धर्मांतर स्थानिकांवर बळजबरीने लादले जात आहे. स्थानिकांवर होणारा हा छळवाद मोडून काढण्यासाठी देवी यश दे. तुझे मंदिर मी किल्ल्यातील बालेकिल्ल्याजवळच बांधीन. आपल्या सर्वांना माहितीच आहे, ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या तावडीतून स्थानिक जनतेला सोडवण्यासाठी चिमाजी अप्पांनी नऊ वेळा वसईवर स्वारी केली. देवीला नवस बोलल्यानंतर वसई ताब्यात आली. त्यानंतर आपले वचन लक्षात ठेवून त्यांनी देवीचे प्रशस्त मंदिर किल्ल्यात बांधून घेतले.
स्थानिकांचे हे कुलदैवत आहे. उत्तर कोकणच्या किनारी भागात मोठ्या प्रमाणावर राहणार्या पाचकळशी समाजाची ही कुलस्वामिनी आहे. यावरून या देवीचे मंदिर हे १२ व्या शतकातील असावे, असा कयास बांधता येतो. या देवीची लहानमोठी बरीच मंदिरे अपरान्तात म्हणजेच उत्तर कोकणात आढळतात. वज्रेश्वरी स्थानापासून अलिबागपर्यंत या देवीची लहान लहान मंदिरे स्थानिकांनी बांधली आहेत.