महिला सक्षमीकरणासाठी शुभदा देशमुखांचा संघर्ष

    17-Oct-2023
Total Views | 77

Shubhada Deshmukh


आदिवासींना मुख्य प्रवाहात आणून प्रगतिपथावर नेण्याचे काम तसेही जिकिरीचेच. मात्र, हेच काम शुभदा देशमुख या डॉ. सतीश गोगुलवारांच्या सहचर्याने गेल्या अनेक वर्षांपासून नेटाने करीत आहेत. त्यांच्या कार्याचा लेखाजोखा...
 
महाविद्यालयीन काळात इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सतीशभाऊ आणि शुभदाताई हे दोघेही जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाने भारावलेले होते. जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखालील ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’ने आयोजिलेल्या आंदोलनात त्या युवापिढीसोबत सहभागी झाल्या. मात्र, आंदोलन विघटित होत गेल्यानंतर शुभदाताईंनी नव्या दिशा शोधण्यास सुरुवात केली. डॉ. सतीश गोगुलवारांसोबत त्यांनी त्यांचे कार्यक्षेत्र म्हणून गडचिरोली जिल्ह्याची निवड केली. याच काळात उभयतांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे शुभदाताईंनी लग्नानंतरही आपल्या नावात बदल न करता आपली ओळख कायम ठेवली.
 
गडचिरोलीत डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख हे ध्येयवादी दाम्पत्य आदिवासी आणि गोर-गरिबांच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न गेल्या 35 वर्षांपासून सातत्याने करत आहेत. यासाठीच कुरखेडा (जि. गडचिरोली) या मुख्यालयी 1984 मध्ये स्थापन केलेल्या ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेच्या माध्यमातून शेती, आरोग्य, उपजीविका, दिव्यांग, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांद्वारे आदिवासींचे सक्षमीकरण साधत आहेत.
 
ज्या काळात या दाम्पत्याने आपलं काम सुरू केलं त्यावेळी गडचिरोली हा भाग अतिशय दुर्गम आणि नक्षलवादी होता. सुरुवातीचे दिवस त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे बांधकाम लाकूड कामगार संघटना या रोजगार हमी मजूर संघटनेसोबत घालवले. त्यावेळी गडचिरोली हा नवीन जिल्हा होता. त्या काळात खेड्यापाड्यात वीज नसणे, दळणवळणाच्या सोईसुविधा कमी असणे इत्यादी समस्या होत्या. महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण अतिशय कमी असून त्यावेळी जेमतेम शिक्षणाची सुरुवात झालेली होती, अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या कामाचा शुभारंभ केला. यादरम्यान त्यांनी आरोग्य आणि महिला सशक्तीकरणावर अनेक काम केलीत. सर्वसाधारण आजार तसेच स्त्रियांबद्दलचे आजार, मासिक पाळीबद्दलची माहिती, त्याबद्दल असणारे गैरसमज, त्याविषयीची काळजी यावर त्यांनी महिलांसोबत काम केले. दारूबंदी केली, तर महिलांचं अर्ध युद्ध बंद होईल, या हेतूने त्यांनी शासनाकडे दारूबंदीची मागणीही केली. डॉ. अभय बंग, राणी बंग, मोहन हिराबाई हिरालाल तसेच इतर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी गडचिरोलीचे लोकआंदोलन व दारूमुक्ती आंदोलन उभे केले. साधारणतः 1989 ते 1993 पर्यंत हा लढा शासनाशी सुरू राहिला. संपूर्ण जिल्ह्यातील 350 महिला मंडळे आणि युवक मंडळे या लढ्यासाठी उभे झालेले होते.
 
दरम्यानच्या काळात त्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून सहायक ट्रस्ट मुबंईतर्फे महिलांमधील हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यासाठी विविध उपक्रम घेतले. त्यासाठी त्यांनी महिलांना परसबाग लागवडीचे प्रशिक्षण देत अंबाडी तसेच पालेभाज्यांचे महत्त्व सांगितले. संस्थेने गावामध्ये जीवनशाळा सुरू करून तिथे मुलांना जीवनशिक्षण देण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य महिलांना आत्मसन्मानाने उभे करण्यासाठी त्यांना स्वयंसहाय्यता बचत गटाची गरज लक्षात आली. त्यांनतर जवळपास प्रत्येक गावातील लोकसंख्येनुसार दोन किंवा तीन गट पुढे येऊ लागले. या सर्व गटांशी सुलभ आणि एकाचवेळी संवाद व्हावा म्हणून या बचतगटांची संघटनबांधणी केली.
 
शुभदाताईंनी काही वर्ष मोठ्या प्रमाणात किशोरी प्रशिक्षण घेतले आणि गरज पडल्यास आजही घेत आहेत. आर्थिक स्वातंत्र्याकरिता बचतगटाच्या पलीकडे जाऊन महिला विचार करण्याकरिता कशा तयार होतील. महिलांमध्ये नेतृत्वगुण कसे तयार होतील आणि वेगवेगळे कायद्यांचा लाभ घेऊन महिला कशा सक्षम होतील, यासाठीच या रणरागिणीचे पुढील कार्य सुरू आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
               
                                                                                                                                                       अवंती भोयर 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121