नवी दिल्ली : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता कार्यवाहीचे वेळापत्रक ३० ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना आमदार अपात्रता कार्यवाहीचे वेळापत्रक १७ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्याविषयी मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्षांनी सादर केलेल्या वेळापत्रक असमाधान व्यक्त केले.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांतर्फे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी अध्यक्षांतर्फे सादर करण्यात आलेल्या वेळापत्रक योग्य असल्याचा युक्तीवाद केला. मात्र, न्यायालयाने हे वेळापत्रक स्विकारण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी नवे वेळापत्रक येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत सादर करावे, असे न्यायालयाने सांगितले आहे. अध्यक्षांनी दसऱ्याच्या सुटीदरम्यान नवे वेळापत्रक सादर करावे, अन्यथा न्यायालयास आदेश द्यावा लागेल; असेही न्यायालयाने यावेळी म्हटले आहे.