इस्रायल - ‘हमास’ युद्धाचे वैश्विक परिणाम

    17-Oct-2023   
Total Views | 100
Israel-Gaza Conflict Could Impact Fuel Prices

पाश्चिमात्य देशांमध्ये पश्चिम आशियाबद्दलचे अज्ञान आणि पॅलेस्टाईनच्या लोकांबाबत असलेल्या सहानुभूतीला खतपाणी घालणे, तसेच तेथे मोठ्या संख्येने स्थायिक झालेल्या मुस्लीम लोकांना रस्त्यावर उतरवून आंदोलन करायला उद्युक्त करणे, हा ‘हमास’च्या योजनेचा भाग आहे.

इस्रायलचे सैन्य गाझा पट्टीत चढाई करण्यासाठी सज्ज झाले आहे. ‘हमास’च्या हल्ल्याला एक आठवडा पूर्ण होत असताना इस्रायलने गाझा पट्टीच्या उत्तरेकडील गाझा सिटी तसेच बेट हनुन, बेट लाहिया आणि जाबालिया शरणार्थी वसाहतींतील रहिवाशांना दक्षिणेकडे स्थलांतरित होण्यास सांगितले. गाझाची निम्मी म्हणजे सुमारे ११ लाख लोकसंख्या प्रदेशाच्या या भागात राहते. याच भागातील दाटीवाटीने वसलेल्या इमारतींमध्ये आणि जमिनीखाली तयार केलेल्या असंख्य भुयारांतून ‘हमास’ शस्त्रास्त्रांची निर्मिती तसेच इस्रायलविरूद्ध रॉकेट हल्ले करते. ‘हमास’चा धोका कायमसाठी संपवायचा असेल, तर या भागात सैन्य पाठवून तेथील दहशतवाद्यांचे सर्व ठावठिकाणे उद्ध्वस्त करण्यास पर्याय नाही. असे करायचे तर दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी होऊ शकते. आतापर्यंत गाझाच्या उत्तर भागातील बहुतांशी लोकांनी स्थलांतर केले असले, तरी ‘हमास’कडून रस्त्यांमध्ये अडथळे उभारून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. इस्रायलने गाझा पट्टीला करण्यात येणारा वीज आणि इंधन पुरवठा थांबवला आहे. ‘हमास’ने संयुक्त राष्ट्रांच्या शरणार्थी कल्याण संस्थेला गाझातील निक्षारीकरण प्रकल्प चालवण्यासाठी पुरवण्यात आलेले इंधन चोरून युद्धासाठी वळवले आहे. यामुळे गाझातील रहिवाशांना पाणी पुरवता आले नाही, तरी त्याचा दोष ‘हमास’कडून इस्रायलवर टाकण्यात येणार आहे.

या युद्धात आतापर्यंत चार हजारांहून अधिक माणसे मारली गेली असून, त्यात सुमारे १ हजार, ४०० इस्रायली आणि २ हजार, ७०० पॅलेस्टिनी नागरिकांचा समावेश आहे. ‘हमास’ने १९९ इस्रायली आणि अन्य देशांच्या लोकांना बंधक बनवले असून त्यांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायलकडून प्रचंड किंमत उकळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. इस्रायलचे जीवनमान अजूनही मूळपदावर आले नसून सातत्याने सायरन वाजणे, तसेच लेबेनॉनमधील ‘हिजबुल्ला’ किंवा सीरियाकडून उत्तर भागात आणखी एक आघाडी उघडली जाण्याची भीती आहे. हा धोका टाळण्यासाठी अमेरिका पुढे सरसावली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अ‍ॅन्थोनी ब्लिंकन यांनी नुकताच सात देशांचा धावता दौरा केला. त्यात इस्रायल, इजिप्त, जॉर्डन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बहारीन आणि कतारचा समावेश होता. हा दौरा पूर्ण करून ब्लिंकन पुन्हा एकदा इस्रायलला गेले. अमेरिकेचे अध्यक्ष या आठवड्यात इस्रायलला भेट देत आहेत. या कठीण प्रसंगात अमेरिका इस्रायलच्या पाठी खंबीरपणाने उभी आहे, हे दाखवण्याचा त्यांचा उद्देश आहे. अमेरिकेने आपल्या दोन विमानवाहू युद्धनौका त्यांच्या ताफ्यासह भूमध्य समुद्रात आणल्या असून त्यांवर १२ हजार नौसैनिक आहेत. अमेरिकेने लेबेनॉनमधील ‘हिजबुल्ला’ या दहशतवादी संघटनेला तसेच सीरिया आणि इराणला या युद्धात न शिरण्याचा इशारा दिला आहे.

इस्रायलने १९६७ साली झालेल्या सहा दिवसांच्या युद्धात अरब राष्ट्रांवर मोठा विजय मिळवला. या युद्धातच इजिप्तकडे असलेली गाझा पट्टी आणि सिनाई वाळवंट इस्रायलच्या ताब्यात आले. १९७९ साली जेव्हा इजिप्त आणि इस्रायल यांच्यात शांतता करार होऊन इजिप्त हा इस्रायलला मान्यता देणारा पहिला अरब देश ठरला. तेव्हा, इस्रायलने आपल्या ताब्यातील इजिप्तचा सर्व प्रदेश त्यांना परत देऊ केला. इजिप्तने गाझा पट्टी घ्यायला नकार दिल्याने पुढची ३८ वर्षं ती इस्रायलच्या ताब्यात राहिली. १९८७ साली इस्रायलचा विनाश करून त्या भूमीत पॅलेस्टिनी इस्लामिक राष्ट्राची निर्मिती करण्याच्या उद्देशाने ‘हमास’ची निर्मिती करण्यात आली. शीतयुद्धाची अखेर होत असताना यासर अराफत यांच्या नेतृत्त्वाखाली फतह पक्षाने दहशतवादाचा मार्ग सोडून इस्रायलसोबत सहअस्तित्व मान्य केले. पण ‘हमास’से इस्रायली लोकांविरूद्ध आत्मघाती हल्ले सुरू ठेवले.

पॅलेस्टिनी प्राधिकरण प्रचंड भ्रष्ट असल्याने ‘हमास’ची लोकप्रियता वाढली. ज्यांनी विरोध केला त्यांना कठोरपणे संपवून ‘हमास’ने आपली दहशत निर्माण केली. २००५ साली इस्रायलने गाझा पट्टीतून माघार घेऊन तो प्रदेश पॅलेस्टिनी लोकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर अमेरिकेच्या पुढाकाराने पॅलेस्टिनी प्रदेशात घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये ‘हमास’ने विजय मिळवला. पण, इस्रायलचे अस्तित्व तसेच त्यांच्यासोबत सहअस्तित्व मान्य करायला नकार, दहशतवादाचा मार्ग सोडायला नकार आणि इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यात झालेल्या करारांना मान्य करण्यास नकार दिल्याने ‘हमास’ची सत्ता प्रस्थापित होऊ शकली नाही. २००७ साली ‘हमास’ने पॅलेस्टिनी ऑथोरिटीच्या लोकांना त्यांच्या कार्यालयांच्या इमारतींवरून फेकून देऊन गाझा पट्टीची सत्ता ताब्यात घेतली. इस्रायलने गाझा पट्टीची नाकेबंदी करून तिच्याशी मर्यादित संबंध ठेवले.

तेव्हापासून ‘हमास’ संयुक्त राष्ट्र आणि अन्य आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मानवीय दृष्टीने केल्या जाणार्‍या मदतीतील मोठा हिस्सा चोरून त्याचा वापर इस्रायलविरोधात दहशतवादी हल्ले करण्यासाठी करतो. इस्रायलने गाझा पट्टीच्या सीमेवर सुमारे एक अब्ज डॉलर खर्च करून अत्याधुनिक कुंपण उभारुन सीमेपार होणारी घुसखोरी जवळपास बंद केली. तेव्हा ‘हमास’ने जमिनीखाली अनेक किमी लांबीचे बोगदे खणून त्याद्वारे इस्रायलमध्ये हल्ले करण्यास सुरुवात केली. इस्रायलने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यातील अनेक बोगदे उद्ध्वस्त केले. ‘हमास’ने इराणकडून मिळालेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून इस्रायलवर डागण्यात येणार्‍या रॉकेटची कक्षा वाढवली. पूर्वी दोन किमीपर्यंत जाणारी रॉकेट ४० ते ५० किमीपर्यंत नेण्यात ‘हमास’ला यश मिळाले. तेव्हा इस्रायलने ‘आयर्न डोम’ यंत्रणा विकसित केली. या युद्धातही ‘हमास’ने डागलेल्या पाच हजारांहून अधिक रॉकेटपैकी तब्बल ९६ टक्के रॉकेट ‘आयर्न डोम’ने हवेतल्या हवेत उद्ध्वस्त केली. ‘हमास’कडून एकाच वेळेस अनेक आघाड्यांवर आणि एवढ्या मोठ्या संख्येने हल्ले होतील, हे ओळखण्यात इस्रायल कमी पडले.

‘हमास’च्या दहशतवादी यंत्रणेचा कायमस्वरुपी निकाल लावण्यासाठी इस्रायल सज्ज झाले आहे. त्यासाठी ३ लाख, ६० हजार राखीव सैनिकांना सेवेत रुजू करण्यात आले आहे. हा आकडा इस्रायलच्या लोकसंख्येच्या चार टक्के आहे. इस्रायलने आक्रमण करावे, अशी ‘हमास’चीही इच्छा आहे. गाझातील जनतेची ढाल करून लढायचे, इस्रायली सैन्यावर गनिमी काव्याने हल्ले करायचे आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये सामान्य लोक मारले गेल्यास त्याचे भांडवल करून अरब-मुस्लीम जगात लोकांना रस्त्यावर आणणे, हे त्यांचे उद्दिष्ट आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये पश्चिम आशियाबद्दलचे अज्ञान आणि पॅलेस्टाईनच्या लोकांबाबत असलेल्या सहानुभूतीला खतपाणी घालणे, तसेच तेथे मोठ्या संख्येने स्थायिक झालेल्या मुस्लीम लोकांना रस्त्यावर उतरवून आंदोलन करायला उद्युक्त करणे, हा या योजनेचा भाग आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली असून, या युद्धातील प्रचार तंत्रामध्ये त्यांचाही सढळहस्ते वापर होताना दिसत आहे. पश्चिम आशियाच्या बाहेरील देशांतील गुप्तचर यंत्रणाही या युद्धाबाबत फेरफार केलेल्या फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून लोकांच्यात अफवा आणि गैरसमज पसरवत असून, त्या त्या देशातील सामाजिक सौहार्द धोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आजकाल लोकांनाही सत्य समजून घेण्याऐवजी आपल्या दृष्टिकोन मांडणारा मजकूर वाचायला किंवा व्हिडिओ पाहायला आवडते. यामुळे खोट्या तसेच प्रचारी बातम्या देणार्‍यांना सुगीचे दिवस आले आहेत. या युद्धात विकसित केल्या जाणार्‍या तंत्रज्ञानाचा वापर आगामी काळातील निवडणुकांतही मोठ्या प्रमाणावर करण्यात येईल. त्यामुळे परराष्ट्र संबंधांच्या पलीकडे जाऊन इस्रायल आणि ‘हमास’मधील युद्धाची दखल घेण्याची आवश्यकता आहे.

अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा
भारताचा आर्थिक कायापालट : निर्णायक नेतृत्वाने घडवलेले नवे पर्व

भारताचा आर्थिक कायापालट : निर्णायक नेतृत्वाने घडवलेले नवे पर्व

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (खचऋ) एप्रिल 2025च्या ताज्या अहवालाने प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची आणि आत्मविश्वासाची एक नवी ज्योत प्रज्वलित केली आहे. या अहवालानुसार, भारताने 4.187 ट्रिलियन डॉलर्सच्या सकल राष्ट्रीय उत्पादनासह (ॠऊझ) जपानसारख्या विकसित अर्थव्यवस्थेला मागे टाकत, आज जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले नाव कोरले आहे. हे ऐतिहासिक यश म्हणजे, केवळ आकड्यांचा खेळ नसून, ते एका दूरदर्शी नेतृत्वाने, दृढ राजकीय इच्छाशक्तीने आणि सव्वाशे कोटी भारतीयांच्या एकत्रित प्रयत्नांनी गेल्या दशकात ..

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश

(CM Devendra Fadnavis Reviews Maharashtra Security Amid India-Pak Tensions)भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ९ मे रोजी राज्यातील एकूण सुरक्षा व्यवस्थेचा आणि आपत्कालीन तयारीचा सखोल आढावा घेतला. मुंबईतील वर्षा निवासस्थानी घेतलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत राज्याच्या गृह, आरोग्य, पोलिस, प्रशासन, आणि महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चा झाली. संभाव्य संकट परिस्थितीत नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा धोका कमी करणे आणि प्रशासन सज्ज ठेवणे यावर भर ..

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व मंत्री आशिष शेलारांच्या हस्ते आज नँन्सी डेपोच्या प्रवासी निवारा-नियंत्रण कक्षाचे उद्‌घाटन

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व मंत्री आशिष शेलारांच्या हस्ते आज नँन्सी डेपोच्या प्रवासी निवारा-नियंत्रण कक्षाचे उद्‌घाटन

भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या एस टी महामंडळाच्या बोरिवलीच्या पूर्व भागातील नँन्सी एसटी डेपोच्या प्रवासी निवारा व नियंत्रण कक्षाचे उद्‌घाटन उद्या शनिवार १० मे, २०२५ रोजी सायंकाळी ८.०० वाजता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व मुंबई उपनगरचे पालकमंत्री तसेच माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री आ. आशिष शेलार यांच्या शुभ हस्ते होणार असल्याची माहिती आ. प्रविण दरेकर यांनी दिली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121