क्रिकेटलाही जागतिक वलय

    16-Oct-2023   
Total Views |
article on Cricket

आपल्या देशात क्रिकेट अगदी सर्वदूर पोहोचलेला खेळ. या खेळामध्ये पुढे करिअर करावे, अशी अनेक तरुणांची इच्छा असते. सामान्यतः क्रिकेट हा दहा देशांना अवगत आणि त्यांच्यामध्येच खेळला जाणारा खेळ. या खेळाची चर्चा मात्र सर्वदूर होत असते. भारतात क्रिकेटला राजकीय, सामाजिक आणि अनेक वादविवादाची किनार लाभते. याच क्रिकेटचा समावेश आता खेळाचा महाकुंभ असलेल्या ‘ऑलिम्पिक’मध्ये करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे, १९०० नंतर प्रथमच क्रिकेटचा ‘ऑलिम्पिक’मध्ये समावेश करण्यात आला आहे. २०२८च्या ‘लॉस एंजेलिस ऑलिम्पिक’मध्ये क्रिकेटसोबतच पाच खेळांचा समावेश करण्यात आला आहे. ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’ने केलेल्या घोषणेनुसार, क्रिकेट व्यतिरिक्त ध्वज फुटबॉल, बेसबॉल, सॉफ्टबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅशचा आदी खेळांचा समावेश ’ऑलिम्पिक’मध्ये करण्यात आला आहे. क्रिकेट ‘ऑलिम्पिक’मध्ये समाविष्ट केल्यामुळे क्रिकेटकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलेल. ‘ऑलिम्पिक’ खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करून, ‘आयओसी’ला भारतीय प्रसारण हक्कांमधून १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर जास्त कमाईची अपेक्षा आहे. ‘ऑलिम्पिक’ स्पर्धेत पुरूष आणि महिलांचे सहा संघ सहभागी होतील. ‘ऑलिम्पिक’मधील सर्व सामने टी-२० स्वरुपाचे असणार आहे. क्रिकेट खेळ भले लोकप्रिय असला तरीही ‘विश्वचषक’ आणि ‘आयपीएल’ सोडले तर त्याला फारसे वलय नाही. तेच ते संघ आणि तीच ती स्पर्धा. क्रिकेटचा बर्‍याच अंशी व्यावसायिकदृष्ट्याच विचार केला जातो. मात्र, अन्य खेळांचे तसे नाही. भालाफेकीत निरज चोप्रा असो वा, बॅडमिंटनमधील पी. व्ही. सिंधू यांनी पदक जिंकल्यानंतर देशाने त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले. जागतिक अर्थसत्ता अमेरिका, चीन आणि रशिया यांसारखे देश क्रिकेटमध्ये रस दाखवत नाही. त्यामुळे भारताने क्रिकेटमध्ये विजय मिळवला, तरीही त्याचे जागतिक स्तरावर पडसाद उमटत नाही. ‘ऑलिम्पिक’मध्ये पदकांची शंभरी अमेरिका सहज गाठतो. त्याउलट भारताला एका पदकासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागते. क्रिकेटच्या समावेशाने भारताचे ‘ऑलिम्पिक’मध्ये एक पदक निश्चित तर होईलच. परंतु, जगभरात क्रिकेटचा प्रचारप्रसार होण्यास मदत होईल. तसेही भारताने २०३६च्या ‘ऑलिम्पिक’ आयोजनाचे यजमानपद मिळवण्यात यश मिळवले आहेच.

तेजप्रतापचे दिव्य प्रताप


सत्तेसाठी लागलीच राष्ट्रीय जनता पक्षाला जवळ करणार्‍या नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील सदस्याला न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे चांगलाच झटका बसला आहे. बिहार सरकारचे मंत्री आणि राजदचे अध्यक्ष लालू यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या यांच्याशी संबंधित खटल्यात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. लालू यादव यांच्या सुनेसोबत म्हणजेच ऐश्वर्यासोबत घरगुती हिंसाचार झाल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे, अशा स्थितीत लालू कुटुंबीयांनी ऐश्वर्याच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. त्यामुळे यादव कुटुंबाची उरलीसुरली इज्जतही धुळीस मिळाली. विशेष बाब म्हणजे, पाटणाच्या कौटुंबिक न्यायालयाने दि. २७ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान हे आदेश दिले. मात्र, हा आदेश नुकताच समोर आला. याप्रकरणाची पुढील सुनावणी दि. ३१ ऑक्टोबरला होणार आहे. दरम्यान, तेजप्रताप आणि ऐश्वर्याचे लग्न दि. १२ मे २०१८ रोजी झाले होते. लग्नानंतर सहा महिन्यांतच तेजप्रताप यादव यांनी घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. ऐश्वर्याने पती तेजप्रताप यादव यांच्यावर लग्नापासून मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ केल्याचा आरोप केला. इतकेच नाही तर ऐश्वर्याने तिची सासू आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि वहिनी आणि आरजेडी खासदार मीसा भारती यांच्यावरही मारहाणीचा आरोप केला होता. इकडे घटस्फोटाचा अर्ज दाखल करताना तेजप्रताप यांनी हे लग्न त्याच्या इच्छेविरुद्ध झाल्याचे सांगत दोन राजकीय घराण्यातील नात्यातील, ते एक मोहरा असल्याचे सांगितले. तेजप्रतापला राबडी देवीसारख्या सुविधा असलेले घरही द्यावे लागणार आहे. तेजप्रताप यादव यांना या घराचे भाडे, वीज आणि इतर देयकांचा भार उचलावा लागेल. आई एका मोठ्या राज्याची माजी मुख्यमंत्री, वडील माजी केंद्रीय मंत्री, भाऊ उपमुख्यमंत्री अशी घराणेशाही असताना सध्या मंत्री असलेल्या तेजप्रतापवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहे. त्यामुळे नितीश कुणाच्या मांडीला मांडी लावून बसले आहे, हे स्पष्ट होते. ज्या घराण्याची सून सुरक्षित नाही, तिला संरक्षण द्या असे न्यायालयाने बजावले आहे, त्यावर बिहारमध्ये सामान्य लेकीबाळी किती सुरक्षित असतील, याची कल्पनाही करवत नाही.





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.