मुंबई : हिंदुत्वाच्या विचारापेक्षा समाजवादी विचार अधिक महत्वाचे असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. यावरुन भाजप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी आता पॉप्युलर प्रिंट ऑफ इंडिया, आयसीस, रझा अकादमी आणि एमआयएमसोबतही युती करावी. असं नितेश राणे म्हणाले आहेत. तर, सामनाच्या अग्रलेखातून समृद्धी महामार्गावर केलेल्या टीकेला राणेंनी प्रत्त्युत्तर दिले आहे. संजय राऊतांनी आपल्या मालकाच्या भाच्याला विचारावं, समृद्धी वरच्या फूड प्लाझाचं काम मलाच हवं, ब्लॅकमेलिंग कोण करत होतं? असा गंभीर आरोप यावेळी केला आहे.
नितेश राणे म्हणाले, "उद्धव ठाकरे आता तुम्ही समाजवादी विचार स्विकारलाच आहात. संजय राऊतांनी भाषणात सांगून टाकल आहे. हिंदुत्वाच्या विचारांपेक्षा समाजवादी विचार हे जास्त प्रभावी आहेत. मग उद्धव ठाकरेंनी आता पॉप्युलर प्रिंट ऑफ इंडियाशी बोलावं, आयसीसशी बोलावं, रझा अकादमी आणि एमआयएमसोबतही बोलावं आणि त्यांच्यासोबतही युती करुन टाका, त्यांना कशाला सोडताय. तसंही देशाच्या आणि राष्ट्राच्या जेजे विरोधात आहेत, त्या सगळ्यांच्या विरोधात युती करण्याचा चंगच उद्धव ठाकरेंनी बांधला आहे. आणि वैयक्तिक संबंध म्हटलं तर, तुमच्या मुलाचे आणि इम्तियाज जलिल यांच्या मुलाची चांगली मैत्री आहे, असं आम्ही ऐकून आहोत, मग एमआयएमशी युती करण्यास काहीच हरकत नाही."
"समाजवादी विचाराच्या विरोधात बाळासाहेब ठाकरेंनी संपूर्ण आपला राजकीय प्रवास आणि इतिहास मुंबई, महाराष्ट्रात घडवला आणि मराठी माणसाला मान सन्मान मिळवून दिला. त्याच समाजवादी विचारसरणीच्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही बसणार असाल, तर तुमच्यासारखा मुलगा आणि सुपुत्र या इतिहासात होऊ शकत नाही हे मी सांगतो. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्गावर टीका टिपणी करणारा अग्रलेख सामनात अग्रलेख लिहिला आहे. संजय राजाराम राऊत यांना आठवण करून देईल, जरा आपल्या मालकाच्या सरदेसाई नावाच्या भाच्याला विचार, हा समृद्धी महामार्ग बनत असताना त्यावरील फूड प्लाझा तयार होणार आहेत, त्याचं कंत्राट मलाच हवं आहे, असं ब्लॅकमेलिंग कोण करत होतं? मग तेव्हाचे मंत्री एकनाथ शिंदे या मुद्द्यावर कदाचित यावर जास्त प्रकाश टाकू शकतील." असा खळबळजनक दावा नितेश राणेंनी केला आहे.