‘हमास’चा पुळका, काश्मिरी हिंदूंचे काय?

    16-Oct-2023
Total Views | 140
Hindus and Sikhs pasted on houses in Poonch in Jammu & Kashmir

‘हमास’ने इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातील धर्मांध अतिरेकी संघटनांना बळ मिळाले. काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यातील हिंदू आणि शीख बांधवांच्या घरावर ‘घर सोडून चालते व्हा, अन्यथा परिणामांना सामोरे जा’ असा धमकीवजा इशारा कट्टरतावाद्यांनी दिला. त्यामुळे सध्या इस्रायलचा कडाडून निषेध करणारे, रस्त्यावर उतरणारे राजकीय पक्ष आणि संघटना यांना ‘हमास’चा हमखास पुळका, पण काश्मिरी हिंदूंच्या वेदनांची पुसटशी जाणीवही नाही, हेच वास्तव!

'हमास’ या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर जो क्रूर, अमानवी असा दहशतवादी हल्ला केला, त्यात हजारो इस्रायली ठार झाले. त्यांचा नृशंस, नरसंहार करण्यात आला. संपूर्ण जगातून त्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच, दहशतवादी मानसिकतेला मात्र या हल्ल्यामुळे बळ मिळालेले दिसून येते. म्हणूनच कट्टरतावाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये जोर आला असून, खोर्‍यात अशांतता निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात हिंदू तसेच शीख कुटुंबांना त्यांची घरे सोडण्यासाठी उर्दूममध्ये भित्तीपत्रके लावून नुकतेच धमकावण्यात आले. ‘मालमत्ता रिकाम्या करा; अन्यथा परिणामांना सामोरे जा,’ अशा आशयाची ही पत्रके. त्यामुळे स्वाभाविकपणे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ‘पीपल्स अ‍ॅण्टी फॅसिस्ट फ्रंट’ (पीएफएफ) या दहशतवादी गटाने यापूर्वी समाजमाध्यमांच्या माध्यमातून एप्रिलमध्ये मोठ्या हल्ल्याची धमकी दिली होती.

जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात राहण्यास जे इच्छुक आहेत, त्यांना ‘बाहेरचे’ असे संबोधत रक्तपात करण्याची धमकी, या दहशतवादी संघटनेने दिली होती. मोहम्मद मसूद अझहरच्या ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने ‘पीएफएफ’ला पाठिंबा दिला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर ही संघटना ‘जैश’च्यावतीने येथे उभी राहिली असून, सरकार तसेच लष्कराच्या विरोधात ती भूमिका घेत आहे.काश्मिरी पंडितांना लक्ष्य करण्यासाठी तसेच त्यांना खोर्‍यातून बाहेर काढण्यासाठी ‘रालिव, गालिव, चालिव’ ही मोहीम अतिरेक्यांनी ८०च्या उत्तराधार्तात तसेच ९०च्या प्रारंभी राबवली होती. त्याचा अर्थ होतो, धर्मांतरण करा, काश्मीर सोडा किंवा मरा. काश्मिरी पंडितांना त्यावेळी इस्लाम धर्म स्वीकारण्यास अतिरेक्यांनी भाग पाडले. जम्मू-काश्मीर सोडण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेला; तसेच त्यांची हत्या केली गेली. हजारो काश्मिरी पंडितांना त्यांची राहती घरे सोडून रातोरात खोर्‍यातून पलायन करावे लागले.

जम्मू-काश्मीरच्या इतिहासातील हा सर्वात काळा अध्याय मानला जातो. विस्थापित काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करण्यासाठी भारत सरकारने अनेक पावले उचलली असून, अजूनही काश्मिरी पंडितांना निर्वासितांचे जीवन जगणे भाग पाडले. धर्मांध अतिरेक्यांनी राबवलेली ही मोहीम म्हणून आजही विस्थापितांच्या स्मरणात आहे.‘हमास’च्या हल्ल्यापासून प्रेरणा घेत पुन्हा एकदा काश्मीर हे मुस्लिमांचे असून, इतर धर्मीयांना येथे स्थान नाही, असे ठसविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सिद्ध होते. तसेच काश्मीरमध्ये परिस्थिती अजूनही सामान्य झालेली नसून, येथील हिंदूंना पलायन करण्यास आम्ही भाग पाडू, असा संदेश धर्मांधांना द्यायचा आहे का, हा प्रश्न. ज्या काश्मीरमध्ये १५ ऑगस्ट तसेच २६ जानेवारीला एकही तिरंगा फडकावता येत नव्हता, तिथे आता घराघरावर तिरंगा लावला जातोच; शिवाय तिरंगा यात्राही निघते. भारताच्या पाकिस्तानवरील विश्वचषक स्पर्धेतील विजयानंतर काश्मीरमध्ये फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. ‘कलम ३७०’ हटवल्यानंतर थांबलेली विकासगंगा पुन्हा एकदा काश्मीरमध्ये प्रवाहित झाली आहे. सरकारने प्रदेशातील पायाभूत सुविधा तसेच अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. नवीन रस्ते, पूल आणि रेल्वेसेवेचा विस्तार केला जात आहे. वीज आणि पाणीपुरवठा सुधारण्यासाठी सरकार कार्यरत आहे. नवीन औद्योगिक वसाहती उभारून तसेच पर्यटनाला चालना देत राज्याची अर्थव्यवस्था गतिमान झालेली दिसते.

विकास प्रक्रियेचा या भागातील जनतेवर सकारात्मक परिणाम झाला आहे. खोर्‍यातील विकास प्रक्रिया योग्य मार्गावर असून, प्रदेशाचा विकास आणि जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. मात्र, जगभरात कुठेही मुस्लिमांवर अत्याचार झाले आहेत, असे वृत्त आले की, अशा प्रकारचे वातावरण मुद्दाम तयार केले जाते.‘हमास’ या दहशतवादी संघटनेने जो क्रूर हल्ला केला, त्यानिमित्ताने पॅलेस्टिनींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. म्हणूनच देशातील अतिरेकी संघटनांनी देशात अस्थिरता आणण्याचा प्रयत्न चालवलेला दिसतो. मुंबईतील ‘रझा अकादमी’ही ‘हमास’च्या समर्थनार्थ प्रदर्शन करणार आहे. ही तीच ‘रझा अकादमी’, जिने म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांवरील अत्याचाराच्या नावाखाली आंदोलन छेडत मुंबईत जाळपोळ केली होती. महिला पोलिसांवर हात टाकण्याचे पाप केले होते. पुन्हा एकदा ‘रझा अकादमी’ आंदोलन करत देशातील मुस्लिमांची डोकी भडकविण्याचा प्रयत्न करणार, हे उघड आहेच. दहशतवादाला साथ देणार्‍या काँग्रेसने आपल्या कार्यकारिणी बैठकीत पॅलेस्टिनींना समर्थन देण्याचा ठराव करत, आपली मानसिकता स्पष्ट केलेली आहेच.

राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम तसेच केरळमधील धर्मांधांनीही ‘हमास’ तसेच पॅलेस्टिनी यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पण, यापैकी कुणीही पूँछमध्ये घडलेल्या या निंदाजनक प्रकारावर भाष्य केलेेले नाही. म्हणा, ८०-९०च्या दशकातही ही मंडळी काश्मिरी हिंदूंसाठी मुस्लीम मतपेढीच्या नाराजीच्या भीतीने उभी राहिली नाहीत. त्यामुळे ते आज काश्मिरी हिंदूंबद्दल काळजी वाहतील, असे मानण्याचे मुळी कारणच नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ आंदोलन केल्यास त्याविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा यापूर्वीच दिला आहे. तरीही ‘सेव्ह गाझा’ असे छातीवर मिरवणारे जितेंद्र आव्हाडसारखे यांना पाठीशी घालणारे राष्ट्रघाती नेते आहेतच. म्हणूनच वेळीच चाप लावण्याची गरज तीव्र होते.


अग्रलेख
जरुर वाचा
अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121