नवी दिल्ली : आपल्या ७०० नागरिकांच्या मृत्यूनंतर इस्रायलने हमासवर जोरदार हल्ल्याची तयारी केली आहे. इस्रायलने गाझा सीमेजवळ १ लाख सैनिक तैनात केले आहे. इस्रायली सैन्याचा गाझामध्ये प्रवेश करून हमासच्या दहशतवाद्यांची शिकार करण्याचा इरादा आहे. इस्रायलने आपल्या राखीव सैनिकांना हमाससोबतच्या युद्धासाठी आघाडीवर बोलावले आहे. भविष्यात कधीही हल्ला करण्याचा विचार करू नये म्हणून इस्रायलने हमासच्या लष्कराला पूर्णपणे नेस्तनाबूत करणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, हमासवर जमिनीवर कारवाई होण्याची भीती असताना लेबनॉनच्या हिजबुल्लाहने इस्रायलला धमकी दिली आहे.
इस्रायलच्या लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, हमाससोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या देशाने १ लाख राखीव सैनिकांची फौज तयार केली आहे. हे सैनिक नुकतेच दक्षिण इस्रायलमध्ये जमले आहेत. याशिवाय इस्रायलने रणगाडे आणि इतर घातक शस्त्रेही मोठ्या प्रमाणावर जमा केली आहेत. इस्रायली लष्कराने सांगितले की, या युद्धानंतर हमासकडे कोणतीही लष्करी क्षमता नाही, जेणेकरून ते इस्रायली नागरिकांना धोका देऊ शकत नाही, याची खात्री करणे आमचे काम असेल.
गाझामधून हमासला संपवण्याची तयारी
इस्रायली लष्कराने सांगितले की, गाझामधून हमासला संपवण्याची तयारी करण्यात येत आहे. इस्रायलमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांना इस्रायली लष्कर सध्या तटस्थ करत आहे. दरम्यान, इस्रायलचे सैन्य पॅलेस्टिनी भागात सातत्याने जोरदार बॉम्बफेक करत आहे. इस्रायलच्या हल्ल्यानंतर अनेक भाग स्मशानभूमीत बदलले आहेत. आपल्याला दीर्घ आणि कठीण युद्धासाठी तयार राहावे लागेल, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, हमासने दावा केला आहे की, इस्रायलच्या अल अक्सा मशीद आणि वेस्ट बँकमध्ये केलेल्या कारवाईचा बदला घेत आहे.
हा रक्तरंजित संघर्ष दीर्घकाळ चालणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. इफ्रेम इनबार या इस्रायली तज्ज्ञाने सांगितले की, इस्रायल आता गाझावर पूर्ण प्रमाणात हल्ला करू शकतो. यानंतर इस्रायली लष्कर गाझामधील हमासला सत्तेतून बेदखल करण्याचा प्रयत्न करणार आहे. पंतप्रधान नेतन्याहू यांनी त्यांच्या वक्तव्यात हे संकेत दिले आहेत. हवाई हल्ल्यात हमासचे नेतृत्व मोडून काढल्यानंतर इस्रायल जमिनीवर हल्ला करणार आहे. दरम्यान, इराणने इस्रायलला जमिनीवर हल्ले करण्याचा इशारा दिला आहे. इराणच्या जवळ असलेल्या हिजबुल्लाने लेबनीज सीमेवरून हल्ले सुरू केले आहेत.