ऑपरेशन अजय! इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांची होणार सुरक्षित वापसी
12-Oct-2023
Total Views | 39
मुंबई : इस्लामिक दहशतवादी संघटना हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत १२०० इस्रायली नागरिकांचा बळी गेला आहे. इस्रायलने पण हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत, हमासच्या १५०० दहशतवाद्यांना मारले आहे. दोन्ही बाजूने युद्धविरामाची कोणतीच चिन्ह दिसत नसल्यामुळे हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
हमास आणि इस्रायलच्या या युद्धा आतापर्यंत अनेक परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सर्वच देश आपआपल्या नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत सरकारने देखील इस्रायलमधील आपल्या नागरिकांना सुरक्षित मायदेशी वापस आणण्यासाठी 'ऑपरेशन अजय'ची सुरुवात केली आहे.
जगभरातील देशांप्रमाणे मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक कामानिमित्त आणि शिक्षणासाठी इस्त्रायलमध्ये राहतात. एका आकडेवारीनुसार इस्त्रायलमध्ये सध्या १८००० हजार भारतीय वास्तव्यास आहेत. यातील ज्या भारतीय नागरिकांना मायदेशी वापस यायचे आहे, त्यांना भारत सरकार सुरक्षितरित्या वापस आणणार आहे.
'ऑपरेशन अजय' अंतर्गत इस्रायलमधील भारतीय नागरिकांना विशेष चार्टर्ड विमानांनी भारतात आणले जाईल. आवश्यकता भासल्यास 'ऑपरेशन अजय'मध्ये भारतीय नौदलाची देखील मदत घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, ज्या भारतीयांना मायदेशात परत यायचे आहे. त्यांनाच परत आणले जाईल. यामध्ये सर्व भारतीयांना परत आणले जाणार नाही.
इस्त्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांचे इस्त्रायलसोबत भावनिक नाते जुळलेले आहे. त्यामुळे बहुतांश भारतीय नागरिक हे संकटकाळी इस्त्रायली नागरिकांना सोडून मायदेशी येण्यास उत्सुक नाहीत. इस्त्रायलमध्ये वास्तव्यास असणाऱ्या अनेक भारतीय नागरिकांनी गरज पडल्यास सैन्य सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे ऑपरेशन अजय या मोहिमेद्वारे काहीच भारतीय वापस येण्याची शक्यता आहे.