कल्याण डोंबिवलीतील सफाई कामगारांचे सामूहिक सुट्टी आंदोलन

वेतन मिळेपर्यंत काम न करण्याचा निर्णय

    11-Oct-2023
Total Views | 50

kdmc

कल्याण :
कल्याण डोंबिवलीतील घन कचरा विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कामगारांना वेतन वेळेत मिळत नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कडोंमपा प्रशासनाने लेखी आश्वासन देऊनही वेळेत वेतन मिळत नसल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी बुधवारी काम बंद केले आहे. त्यामध्ये कल्याण डोंबिवलीतील सुमारे १ हजाराच्या आसपास कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. या कंत्राटी कामगारांनी बुधवारी सामूहिक सुट्टी टाकली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कल्याण डोंबिवलीत कचरा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कल्याण डोंबिवली शहरातील कचरा खासगी कंत्राटदारांमार्फत उचलला जातो . मात्र या कामगारांना वेळेत पगार मिळत नसल्याने मनसेने काही दिवसांपूर्वीच कडोंमपा कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चा दरम्यान दर महिन्याच्या १० तारखेला या कामगारांना वेतन मिळेल असे लेखी आश्वासन कडोंमपा घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिल्याची माहिती मनसे कामगार सेनेच्या उल्हास भोईर यांनी दिली.

कामगारांच्या वेतना संदर्भात संघटनेमार्फत वारंवार पाठपुरावा केला जात आहे. परंतु महापालिका उपायुक्त अतुल पाटील हे कोणाताही विषय गांभीर्याने घेत नाही. तसेच या कामगारांना गेल्या २-३ महिन्यापासून वेतन देण्यात आलेले नाही. गेल्या महिन्यात गणेशोत्सव झाल्यानंतर या कामगारांना वेतन देण्यात आले होते. तर ऑक्टोबर महिन्यापासून प्रत्येक १० तारखेला वेतन दिले जाईल असे लेखी देऊनही ११ तारीख आली तरी अद्याप वेतन मिळाली नसल्याची माहिती उल्हास भोईर यांनी दिली आहे.

कडोंमपा उपायुक्त अतुल पाटील यांच्या या वागणुकीविरोधात कर्मचाऱ्यांनी सामूहिक सुट्टी आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आमच्या कामगारांना वेतन मिळत नाही तोपर्यंत हे सामूहिक सुट्टी आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचेही भोईर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळल्यास ऐन सणासुदीच्या दिवसांत कल्याण डोंबिवलीत कचऱ्याची समस्या अधिक बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान याबाबत उपायुक्त अतुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121