पेशाने शास्त्रज्ञ, जैवविविधतेचा एक उत्तम निरीक्षक, पर्यावरण अभ्यासक, निसर्गप्रेमी आणि एवढं कमी म्हणून की काय साहित्याचीदेखील आवड असलेल्या वनस्पतीशास्त्रज्ञ, शिक्षक, लेखक डॉ. मंदार दातार यांच्याविषयी...
वनस्पतीशास्त्राच्या क्षेत्रात गेली दोन दशके मनापासून कार्यरत पुण्यातील ‘आघारकर संस्थे’तील संशोधक आणि एक हाडाचे वैज्ञानिक म्हणजे डॉ. मंदार निळकंठ दातार. मंदार यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा गावातला. त्यांचं बालपण तिथेच गेलं. चौथीपर्यंतचं शिक्षण गावातल्याच एक शिक्षकी छोट्याशा शाळेत घेतलेल्या मंदार यांना पाचवीपासून पुढील शिक्षणासाठी डोंगर ओलांडत रोजची पायपीट करावी लागली. शाळेत जाण्याच्या या प्रवासातूनच वनस्पती आणि निसर्गाबद्दल कुतूहल निर्माण होत मंदार यांची त्या परिसंस्थेशी नाळ जोडली गेली. त्यातच वडील शेतकरी असल्यामुळे लहान वयातच त्यांना निसर्गाचे धडे मिळाले.
दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये त्यांनी अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले आणि पुढील शिक्षणासाठी गरवारे महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयातच त्यांना डॉ. हेमा साने, प्र. के. घाणेकर, विजय रानडे यांच्यासारखे वनस्पतीशास्त्राला वाहून घेतलेले शिक्षक मिळाले आणि तेव्हाच मंदार यांच्यातला शास्त्रज्ञ मूळ धरू लागला. बीएससी करीत असतानाच त्यांनी ‘वनस्पती वर्गीकरणशास्त्रा’त शिक्षण घेऊन काम करायचे ठरविले होते. त्यामुळे ‘प्लांट टॅक्सोनॉमी’ म्हणजेच ‘वनस्पती वर्गीकरणशास्त्रा’मध्ये पदवी घेतली. पुणे विद्यापीठातून एमएससी पूर्ण केल्यानंतर ‘भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थे’मध्ये डॉ. लक्ष्मी नरसिंहन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी २००७ मध्ये पीएचडीही पूर्ण केली.
पीएचडी करीत असताना गोव्यातील दुधसागर धबधब्याभोवती असलेल्या भगवान महावीर अभयारण्यामधील वनस्पती विविधता अभ्यासण्याची सुवर्णसंधी त्यांना मिळाली. या अभयारण्यातील संपूर्ण वनस्पती प्रजातींच्या नोंदी आणि वर्गीकरणाचं काम त्यांनी केलं. तिथे जाऊन राहणं, वेगवेगळ्या वनस्पतींचे नमुने गोळा करून आणणं, हे त्यांच्या विलक्षण आवडीचं काम.नमुने गोळा करून पुण्यात संशोधन आणि अभ्यास करणे, असे करीत त्यांची पीएचडी पूर्ण झाली. २००७ मध्ये पीएचडी पूर्ण झाल्यानंतर २००८-०९ असे दोन वर्षं त्यांनी प्रा. माधव गाडगीळ यांच्याबरोबर ‘महाराष्ट्र जनुक कोश’ या प्रकल्पासाठी काम केले. ‘राजीव गांधी सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी कमिशन’ या संस्थेच्या या प्रकल्पाच्या नियोजनाच्या टप्प्यात त्यांनी काम केले.
पुढे २०१० साली केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ‘आघारकर संशोधन संस्थे’मध्ये त्यांनी वैज्ञानिक म्हणून पूर्ण वेळ काम सुरू केले. मंदार यांनी त्यांच्या कारकिर्दीत गवताळ कुरणांचाही सखोल अभ्यास केला. ‘ऑर्किड्स’ या विषयावरील त्यांची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. प्रदेशनिष्ठ आणि दुर्मीळ वनस्पती हा त्यांचा आवडता विषय. सहकार्यांबरोबर आजवर सह्याद्रीचा विशेष अभ्यास करून फक्त याच भागात १८१ वनस्पती प्रदेशनिष्ठ आहेत, असे त्यांनी दाखवून दिले. यासोबत सहा नव्या वनस्पती प्रजाती त्यांनी शोधल्या असून, त्यांच्या अभ्यासाची नोंद म्हणून ‘स्टारोनिस दातारी’ या शेवाळाच्या प्रजातीला त्यांचे नाव देण्यात आले आहे. ‘गेंद’ किंवा ‘धनगरी गेंद’ या प्रजातीतील दोन वनस्पती, ‘नथनी गवत’ या गवताच्या प्रकारातील तीन प्रजाती त्याचबरोबर बांबूची एक प्रजात, अशा या सहा नवीन वनस्पतींच्या नोंदी मंदार यांनी केल्या आहेत. सपुष्प वनस्पतींमध्ये काम केलेल्या मंदार यांचे ६७ शोधनिबंध प्रकाशित झाले असून, त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.
अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. नुकताच त्यांनी ठाणे जिल्ह्यातील नव्या प्रकाराच्या पठाराचाही शोध लावला असून, वनस्पती अभ्यासासाठी त्यांनी भारतभर प्रवास केला आहे. महाराष्ट्रातील सह्याद्रीची पर्वतरांग आणि जैवविविधतेने नटलेला प्रदेश त्यांच्या विशेष आवडीचा. डॉ. मंदार यांच्याकडे चार विद्यार्थी पीएचडी करत असून, त्यापैकी एका विद्यार्थिनीने पीएचडी पूर्णही केली आहे. सडे, कडे आणि प्रदेशनिष्ठ वनस्पतींचा हा अभ्यास सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ते सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्नही अनेक माध्यमांतून करीत असतात. विशेष बाब म्हणजे, वनस्पती आणि प्रदेशनिष्ठ प्रजातींवर अभ्यास असलेल्या या हाडाच्या शास्त्रज्ञाचे साहित्यप्रेमही तितकेच वाखाणण्याजोगे. लेखन-वाचनाच्या आवडीतूनच विज्ञान सोप्या भाषेतून अनेकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशातून त्यांनी अनेक विज्ञानकथा लिहिल्या असून त्या विविध मासिके, साप्ताहिकातून प्रकाशितही झाल्या आहेत.
‘प्लांट्स, पीपल अॅण्ड पोएट्री’ अशा नावाचा त्यांचा स्वतःचा युट्यूब चॅनलही आहे. निसर्गाविषयी काव्यलेखन आणि सादरीकरण त्यांच्या चॅनेलवर पाहायला मिळतं.विविध भागांतील वनस्पती, तेथील पाण्याचं, मातीचं परीक्षण करून त्या भागात आढळणार्या वनस्पती प्रजातींचाही अभ्यास मंदार यांनी केला आहे. वनस्पतीशास्त्रातील भरीव संशोधन पाहता, २०१६ साली सर्वोत्कृष्ट शोधनिबंधासाठी ‘के. एल. मेहरा स्मृती पुरस्कार २०२३’ने, तर नाशिक येथील ‘किर्लोस्कर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त ‘किर्लोस्कर वसुंधरा सन्माना’ने त्यांना गौरविण्यात आले आहे. वनस्पतीशास्त्रातील या शास्त्रज्ञाला, अभ्यासकाला आणि कलाकाराला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या अनेकानेक शुभेच्छा!