अंबरनाथ : अंबरनाथ येथील शिलाहारकालीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरणाच्या कामाला आता प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. एक हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन संस्कृतीचा ठळक पुरावा असलेले, हे उत्कृष्ट वास्तुवैभव सुशोभीकरण प्रकल्पामुळे नव्याने उजळून निघणार आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी १३८.२१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामाचे कार्यादेश नुकतेच देण्यात आल्याने लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. अंबरनाथमधील शिवमंदिर शिलाहारकालीन स्थापत्य कलेचा अप्रतिम अविष्कार आहे. या प्राचीन वास्तूच्या माध्यमातून जागतिक पातळीवर अंबरनाथ शहराची ओळख व्हावी, याकरिता मंदिर परिसराचा विकास करण्याची संकल्पना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ नगरपालिकेच्या मदतीने आणि मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचा सविस्तर प्रस्तावही त्यांनी तयार केला होता.
असे होणार सुशोभीकरण
प्राचीन शिवमंदिर ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करून परिसरामध्ये, या प्राचीन शिल्पाच्या धर्तीवर कामे केली जाणार आहेत. सुशोभीकरणाचे संपूर्ण काम काळ्या पाषाणात केले जाणार आहे.