मुंबई : देशभरात "एक तारीख एक तास” स्वच्छता मोहिम उत्साहात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुर्ला येथील वत्सलाताई नाईकनगर एसआरए वसाहतीला भेट दिली. यावेळी स्वच्छता ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात दिसली पाहिजे. मुंबईतील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची दिवसातून पाच वेळा सफाई झाली पाहिजे, असे म्हणत प्रशासनाला धारेवर धरले.
तसेच, आपला परिसर स्वच्छ असेल तर रोगराई पसरणार नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे सुंदर आणि निरोगी भारताचे उद्दिष्ट आहे ते साध्य होऊ शकेल. मुंबई महानगरपालिका आयुक्तांना एका महिन्याचा वेळ देत या परिसरातील स्वच्छता, डागडुजी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
दरम्यान, मुख्य रस्ते, चौक, समुद्र किनारे यांची स्वच्छता करण्याबरोबरच गल्लीबोळातील रस्त्यांची, झोपडपट्टीतील परिसर, शौचालये, गटारे यांची साफसफाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी कुर्ल्याच्या एसआरए वसाहतीला अचानक भेट देत सार्वजनिक शौचालयांची दिवसातून पाच वेळा सफाई झाली पाहिजे, असे सांगत अधिकारी आणि कंत्राटदारला फैलावर घेतले. यावेळी आमदार मंगेश कुडाळकर, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.