मुंबई : येत्या दोन महिन्यात मुंबईत १९९३ सारखा स्फोट होणार असा फोन पोलीस कंट्रोलला करणार्या नबी याहया खान उर्फ के. जी. एन. लाला यास ‘एटीएस’ने अटक केली. आरोपीविरूद्ध या पूर्वी मुंबईमध्ये जबरी चोरी, विनयभंग व अतिक्रमण असे १२ गुन्हे दाखल असून २०२१ मध्ये त्याला मालाड पोलीस ठाणे मार्फत तडीपार केले होते.
शनिवार, दि. ७ जानेवारी रोजी रात्री ७.३० च्या सुमारास वाजता एका इसमाने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षातील १०० नंबर हेल्पलाईनवर कॉल करून, १९९३ला जसा बॉम्बस्फोट झाला तसा बॉम्बस्फोट दोन महिन्यांनंतर मुंबईमध्ये माहिम, भेंडीबाजार, नागपाडा, मदनपुरा येथे होणार असल्याचे सांगितले.
मुंबईमध्ये १९९३ सारख्या दंगली होणार आहेत. यासाठी बाहेरच्या राज्यातून लोकांना बॉम्बस्फोट व दंगली करण्यासाठी बोलविले आहे, असा संदेश पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून दहशतवादविरोधी पथकाच्या नियंत्रण कक्षास प्राप्त झाला. त्या आधारे दहशतवाद विरोधी पथकाची (एटीएस) दोन पथके तयार करून चौकशीसाठी रवाना झाली होती. नियंत्रण कक्षास आलेल्या कॉलच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण करून नियंत्रण कक्षास कॉल करणारा नबी याहया खान उर्फ के. जी. एन. लाला, वय ५५ वर्षे, यास मालाड रेल्वे स्थानक परिसरातून शोधून काढले. हा आरोपी मालाडमधील रहिवासी आहे. त्याने केलेल्या कॉलच्या आधारे ‘एटीएस’ अधिक तपास करत आहे.