ठाणे :मला काय मिळेल, अशा स्वार्थी वृत्तीच्या युगात गरजूंना यथाशक्ती मदत करण्याच्या भावनेने सुरू असलेला सेवा सहयोग फाऊंडेशनचा विद्यार्थी विकास योजना हा उपक्रम प्रेरणादायी आहे. भौतिक साधनांच्या उपभोगातून मिळणाऱ्या सुखापेक्षा यांसारख्या उपक्रमातील योगदानातून मिळणारे समाधान मोलाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी शनिवारी विद्यार्थी विकास योजनेच्या स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कोकण प्रांत सेवा विभाग प्रमुख विवेक भागवत यांनी त्यांच्या भाषणात स्वातंत्र्योत्तर काळातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेत, त्यातील सेवा कार्याचे महत्व अधोरेखीत केले. या योजनेचे प्रवर्तक रविंद्र कर्वे यांनी प्रास्तविकात, संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी काही विद्यार्थ्यांचा प्रातिनिधीकरित्या सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार मकरंद मुळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणाऱ्या विद्यार्थी विकास योजनेने यंदाच्या शैक्षणिक वर्षात १५ डिसेंबर २०२२ पर्यंत ६२९ मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी ३ कोटी ३१ लाख रूपयांची मदत दिली आहे. २००८-२००९ मध्ये पाच विद्यार्थ्यांना मदत करून या योजनेची सुरूवात झाली. गेल्या १३ वर्षात १ हजार ४६६ विद्यार्थ्यांना संस्थेने १८ कोटी सात लाख रूपयांची मदत केली. ठाणे जिल्ह्यात सुरू झालेली ही चळवळ आता हिंगोली, बुलढाणा, गोंदिया आणि गडचिरोली वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या सीमापार करून केरळ, ओरिसा, तेलंगणा, दिल्ली, बिहार, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, आंदमान-निकोबार आणि छत्तीसगढ या राज्यांमधील गरजू विद्यार्थ्यांनाही संस्थेने मदत केली आहे.
नोकरी लागलेल्या माजी विद्यार्थ्यांनी हा वारसा पुढे चालविण्याचा निश्चय करीत आतापर्यंत २७ लाख रूपये संस्थेला पुढील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिले आहेत. यंदा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पालकही मुलांच्या शिक्षणात यथाशक्ती खारीचा वाटा उचलत आहेत. यंदा कुटुंबियांनी दिलेले योगदान एकुण मदतीच्या सुमारे दहा टक्के म्हणजे ३३ लाख रूपये इतके आहे.अमेरिका, कॅनडा, जर्मनी, ब्रिटन, इटली, न्यूझिलंड या देशांमधील १२ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये विद्यार्थी विकास योजनेच्या आर्थिक सहकार्याने विद्यार्थी शिकत आहेत. भारतातील सर्व प्रमुख आयआयटी आणि देशभरातील सर्व नामांकित कॉलेजमध्ये विद्यार्थी विकास योजनेतील विद्यार्थी शिकत आहेत.
विद्यार्थी झाले रोजगार सक्षम
गेल्या १३ वर्षात संस्थेच्या मदतीने उच्च शिक्षण घेतलेल्या १५६ विद्यार्थ्यांना नोकऱ्या लागल्या आहेत. त्यापैकी ५२ टक्के विद्यार्थी बहुराष्ट्रीय कंपनीत, ४५ टक्के विद्यार्थी भारतीय कंपन्यांमध्ये तर तीन टक्के सरकारी सेवेत आहेत. त्यापैकी ९ टक्के विद्यार्थ्यांना वार्षिक १० ते २० लाख रूपयांचे पॅकेज मिळाले आहे. ३२ टक्के विद्यार्थ्यांना वार्षिक ६ ते १० लाख रूपयांचे पॅकेज मिळाले आहे. तर ५९ टक्के विद्यार्थ्यांना पाच लाखांपर्यंतचे पॅकेज मिळाले आहे.
पात्र गरजु विद्यार्थ्याना मदत
दहावीला किमान ९० टक्के, बारावीला ७० टक्के आणि विशिष्ट अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया उत्तीर्ण होऊन चांगल्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळविण्यास पात्र ठरलेल्या गरजू विद्यार्थ्यांना ही मदत मिळते. संस्थेचे प्रतिनिधी विद्यार्थ्याच्या घरी भेट देऊन कुटुंबाशी चर्चा करतात. त्यानंतरच विद्यार्थ्याला मदत देण्याचा निर्णय घेतला जातो. सर्व व्यवहार ऑनलाईन अथवा धनादेशाद्वारे होतात.