नवी दिल्ली : देशांमधील हवाई संरक्षण सहकार्याला चालना देण्यासाठी भारत आणि जपानच्या वायुसेनेतर्फे जपानमध्ये 'वीर गार्डियन-2023' या संयुक्त हवाईसरावाचे आयोजन केले आहे.
जपानमधील हायाकुरी या हवाईतळावर 'वीर गार्डियन-2023' हवाईसराव १२ ते २६ जानेवारी या कालावधीत होणार आहे. या सरावामध्ये सहभागी होणाया भारताच्या तुकडीमध्ये ४ सुखोई ३० एमकेआय, दोन सी – १७ आणि १ आयएल – ७८ हे विमान सहभागी होणार आहे. त्याचप्रमाणे जपानी वायुसेनेतर्फे प्रत्येकी ४ एफ – २ आणि एफ – १५ विमाने सहभागी होणार आहे.
टोकियो येथे ८ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या दुसर्या 2+2 परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रिस्तरीय बैठकीत भारत आणि जपानने द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वाढवण्यास आणि पहिल्या संयुक्त लढाऊ जेट कवायतींसह अधिक लष्करी सरावांमध्ये सहभागी होण्याचे मान्य केले होते. हा सराव दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंध आणि घनिष्ठ संरक्षण सहकार्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.
संयुक्त सरावामध्ये दोन्ही हवाई दलांमधील विविध हवाई लढाऊ कवायतींचा समावेश असेल. कठीण वातावरणात मल्टी-डोमेन एअर कॉम्बॅट मिशनवर काम करणे आणि आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यावर दोन्ही वायुसेनेतर्फे माहितीची देवाणघेवाण करतील. 'वीर गार्डियन' या सरावामुळे दोन्ही देशातील मैत्री अधिक घट्ट होऊन दोन्ही हवाई दलांमधील संरक्षण सहकार्य वाढीस लागणार आहे.