मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बुधवार, दि. ४ जानेवारी रोजी ‘ईडी’कडून जप्त करण्यात आली आहे. दापोलीतील ’साई रिसॉर्ट प्रकरणी ’ईडी’कडून ही कारवाई झाली आहे. या कारवाईमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.
‘ईडी’ने जप्त केलेल्या मालमत्तेचे मूल्य १० कोटी, २० लाख रुपये इतके आहे. या मालमत्तेमध्ये रत्नागिरीतील ४२ गुंठे जमीन आणि तिथे बांधलेल्या ‘साई रिसॉर्ट’चा समावेश आहे. याप्रकरणी ‘ईडी’कडून ‘मनी लॉण्ड्रिंग’चा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
‘ईडी’ने यासंदर्भात जाहीर केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, अनिल परब यांनी ‘साई रिसॉर्ट’शी संबंधित परवानग्या मिळवताना स्वतःची मालक म्हणून ओळख लपवली. विभास साठे नावाच्या व्यक्तीच्या नावाने सर्व परवानग्या अनिल परब यांनी मिळवल्या असल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे.
अनिल परब यांचे सदानंद कदम यांच्याशी सामंजस्य आहे. त्यातूनच कदम यांना स्थानिक ‘एसडीओ’ कार्यालयातून बेकायदा परवानगी मिळाली. त्यानुसार शेतजमिनीचे बिगरशेत जमिनीत रुपांतर करण्यात आले. त्यानंतर त्या ठिकाणी ‘सीआरझेड’च्या नियमांचे उल्लंघन करत रिसॉर्टचे बांधकाम झाले. ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र सरकारची फसवणूक करून परवानग्या मिळवल्या गेल्या. त्यामुळेच ‘ईडी’ने मुरुड दापोली मधील ४२ गुंठे जमीन आणि ‘साई रिसॉर्ट’ची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती ‘ईडी’ने दिली आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दि. ३१ डिसेंबर रोजीच ट्विट करत ठाकरे गटाचे नेते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची यादी जाहीर केली होती. या नेत्यांवर नव्या वर्षात मोठी कारवाई होणार, असेही त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आता अनिल परब यांच्यावर पहिली कारवाई झाली आहे.