सध्या बातम्यांमध्ये गाजणाऱ्या दोन घटना, एक दिल्ली मधल्या कंझावाला भागात अंजली सिंह नावाच्या मुलीचा ३१ डिसेम्बरच्या रात्री झालेला संशयास्पद अपघाती मृत्यू. न्यू ईयरची पार्टी करून मैत्रिणीसमवेत आपल्या स्कूटीवरून घरी परत जाताना अंजलीला एका बलेनो गाडीने ठोकर मारली. गाडीत पाच जण होते, ३१ ची रात्र म्हणजे बहुधा दारूच्या नशेत असावेत.
अपघात झाल्यानंतरही कार न थांबवता त्या गाडीतल्या हैवानांनी टायरमध्ये अडकलेल्या अंजलीला दहा-बारा किलोमीटर फरफटत नेलं. त्यातच तिचा मृत्यू झाला. अशी कसली नशा केली होती त्या नराधमांनी की आपण कुणाला तरी उडवलंय हे कळूनही त्यांना थांबावंसं वाटलं नाही. गाडीच्या टायरला एक डबा जरी अडकला तरी चालकाला कळतंच, इथे एक अख्खी व्यक्ती पुढच्या टायरला खाली अडकलेली असतांना ह्या लोकांनी यू टर्न घेतले, लेन बदलल्या, तरी त्यांना काहीच जाणवलं नसेल?
नंतर बातमी आली की अपघात घडला तेव्हा अंजली एकटी नव्हती. तिच्याबरोबर निधी नावाची तिची मैत्रीण होती. दोघीही घरी खोटं सांगून नववर्ष साजरे करायला एका हॉटेलमध्ये गेल्या होत्या, तिथे त्यांनी खोली बुक केली होती, खोलीत त्यांचे मित्रही होते आणि सर्वांनी दारू प्यायली होती असे हॉटेल मालकाचे म्हणणे आहे. रात्री एकच्या सुमारास जेव्हा ह्या दोघी मुली हॉटेलमधुन बाहेर पडल्या तेव्हा त्यांच्यात भांडण झालेलं सिसीटीव्ही मध्ये दिसतं. नंतर त्या स्कुटीवर बसून निघून जातात तेव्हा निधी दुचाकी चालवताना दिसते.
पण जेव्हा अपघात घडला तेव्हा ही निधी मैत्रिणीच्या मदतीला थांबली का नाही?
तिने कुणाला फोन का केला नाही? मैत्रीण टायरखाली फरफटत जात असताना तिने बघितलं तरी ती चुपचाप घरी गेली आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा अंजलीचा मृतदेह सापडला तेव्हाही ती पोलिसांकडे स्वतःहून का गेली नाही. आपल्या प्रत्येक टीव्ही इंटरव्यू मध्ये ती अंजलीचा उल्लेख तिचं नाव न घेता, ‘मेरी सहेली’ असं न म्हणता ‘वो लडकी’ असा त्रयस्थ उल्लेख का करते? अशी कशी ही ‘मैत्री’?
ह्या प्रकरणात खरं काय खोटं काय हे काही मला माहित नाही पण माणसं इतकी संवेदनाशून्य असू शकतात? स्वतःच्या गाडीखाली कुणीतरी फरफटतंय हे समजून उमजून देखील त्या गाडीतल्या कुणालाच गाडी थांबवावीशी वाटू नये? ती निधी नावाची मुलगी प्रत्येक चॅनेलवर नवी शाल गुंडाळून जातेय, म्हणतेय की ती घाबरली होती म्हणून तिने कुणाला काही सांगितलं नाही, पण तिच्या बोलण्यात तर शॉक किंवा शोक ह्यांच्यातलं काहीच दिसत नाही.
बरोबरची मैत्रीण टायरखाली फरफटत नेली जाताना डोळ्यांसमोर बघून ही मुलगी दोन दिवस गप्प राहिली? तिला कुणालाच काही सांगावंसं वाटलं नाही? इतकी माणुसकी गमावलीय आपण?
आता इथे ‘दिल्लीत असंच असतं, तिथे माणसं माणूसकी हरवून बसली आहेत’ वगैरे शेरेबाजी करणाऱ्या माणसांसाठी सांगतेय, अंजलीच्या अमानुष मृत्यूइतकाच हादरवून टाकणारा गुन्हा पुण्याजवळच्याच चऱ्होली खुर्द गावात नुकताच घडलाय. साठीच्या घरात असलेल्या एका थोरवे नावाच्या माणसाने त्याच्याच घेनंद नावाच्या मित्राचा खून केला, त्याचं शिर धडावेगळं केलं आणि स्वतःचे कपडे त्याच्या धडाला घालून त्याचा देह रोटाव्हेटर मशीनमध्ये घालून छिन्नविछिन्न केला आणि स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचला.
का तर त्याचं एका लग्न झालेल्या बाईशी लफडं होतं आणि त्याला तिच्याबरोबर पळून जायचं होतं म्हणून! थोरवेची बायको दोन वर्षांपूर्वी मेली होती पण मुलं ह्या अनैतिक संबंधांना मान्यता देणार नाहीत म्हणून त्याने हे सगळं घडवून आणलं. स्वतःच्या मित्राचा इतका निर्घृण खून केला.
मला ह्या दोन्ही घटनांनी खूप अस्वस्थ केलंय. माझा माणसांच्या मूलभूत चांगुलपणावर कुणी भाबडा म्हणेल इतका विश्वास आहे, पण अश्या घटना जेव्हा समाजात घडायला लागतात तेव्हा त्या विश्वासाच्या गाभ्यालाच हादरा बसतो. नीती-अनीती हया संकल्पनांपासून इतके दूर चाललोय का आपण एक समाज म्हणून?
मला मान्य आहे की कुठल्याही काळात सोशियोपॅथीक गुन्हेगारांचा एक वर्ग असतोच. निर्घृण खून, बलात्कार आधीही व्हायचे, आताही होतात आणि पुढेही होत राहतील पण ह्या आणि अश्या गुन्ह्यांमध्ये मला हे खटकतं की हे गुन्हे करणारी माणसं सर्वसामान्यात गणली जाणारी होती, त्यांना हिंसेची, गुन्ह्यांची काही पार्श्वभूमी नव्हती.
ह्या थोरवेसारखी, निधी सारखी, अंजलीला चिरडणारी ती गाडी चालवणाऱ्या त्या कुणा दीपक आणि मनोजसारखी माणसे रोज समाजात आपल्या अवतीभवती वावरत असतात. त्यांना इतकं आंधळं, स्वार्थी आणि क्रूर कोण बनवतं? परिस्थिती? क्षणिक मोह? चंगळवाद? माणसा-माणसांमधले, समाजातले, कुटुंबातले सैल झालेले बंध? आपण काहीही केलं तरी कायदा काही शिक्षा करू शकणार नाही हा बेदरकार माज? नक्की काय बदलतंय? माणसं? समाज? मूल्ये? खरंच समजत नाही. तुमची मते जरूर मांडा.