युक्रेन विरुध्दच्या युध्दात रशिया खरोखरच अण्वस्त्रांचा वापर करु शकेल का, याबाबत पाश्चिमात्य देशांमध्ये दुमत आहे. रशियाने बेकायदेशीररित्या बळकावलेली भूमी परत मिळवणे हे आत्मरक्षण असल्याने त्यासाठी युक्रेनला रणगाडे पुरवल्यास तो मर्यादा रेषेचा भंग होत नाही, असा निष्कर्ष अमेरिका आणि जर्मनीने काढला.
युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाला ११ महिने पूर्ण झाले आहेत. वसंत ऋतूला सुरुवात होण्यासाठी अजून किमान दोन महिने असले, तरी सगळ्यांना त्याची चाहूल लागली आहे. वसंत ऋतूमध्ये जशी युद्धाची तीव्रता वाढणार आहे, त्याचप्रमाणे रणनीतीमध्येही मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेंक्सी यांनी दि. २५ जानेवारी रोजी वयाची ४५ वर्षं पूर्ण केली. याच दिवशी त्यांना बहुप्रतीक्षित ४५ रणगाड्यांची भेट मिळाली. प्रथम जर्मनीने युक्रेनला १४ लेपर्ड दोन रणगाडे पुरवण्याचा निर्णय घोषित केला, तर त्याच दिवशी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी जगातील सगळ्यात अत्याधुनिक म्हणून ओळखले जाणारे ३१ ‘एम १ अब्राम्स’ रणगाडे युक्रेनला पुरवण्याचा निर्णय घोषित केला.
‘अब्राम्स’ रणगाड्यांच्या युक्रेनमधील युद्धमैदानातील उपयुक्ततेविषयी शंका उपस्थित केली जात होती. ’अब्राम्स’ रणगाडे एक हजार किमीचा टप्पा गाठू शकत असले, तरी ते इंधन म्हणून ते नैसर्गिक वायूचा वापर करत असल्यामुळे युद्धभूमीवर इंधन भरणे अवघड असते. हे रणगाडे अतिशय गुंतागुंतीचे असून त्यांच्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ, शेकडो तासांचा सराव तसेच दुरुस्ती आणि देखभालीसाठी मोठी व्यवस्था लागते. आजच्या घडीला युक्रेनला ही व्यवस्था पुरवणे अमेरिकेसाठी अवघड आहे. याउलट लेपर्ड दोन रणगाडे डिझेलवर चालतात. ते ५०० किमीपर्यंतच जाऊ शकत असले, तरी वापरण्यास सोप्पे असतात. युरोपमध्ये अनेक देशांकडे हे रणगाडे असून पोलंड आणि फिनलंडने हे रणगाडे युक्रेनला पुरवण्याची तयारीही दाखवली आहे. पण जोपर्यंत अमेरिका युक्रेनला रणगाडे पुरवत नाही, तोपर्यंत जर्मनीने स्वतः रणगाडे देण्यास किंवा अन्य देशांकडून लेपर्ड रणगाडे युक्रेनला पुरवण्यास मनाई केली होती.
रशिया पहिल्यापासूनच धमकी देत आहे की, जर पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला मदत करताना धोक्याची रेषा ओलांडून युक्रेनच्या आक्रमणास मदत केली, तर रशियाला महासंहारक अस्त्रांचा वापर करावा लागेल. रशिया खरोखरच अण्वस्त्रांचा वापर करु शकेल का, याबाबत पाश्चिमात्य देशांमध्ये दुमत आहे. त्यासोबतच युक्रेनने आक्रमण करणे म्हणजे काय याबाबतही मतभेद आहेत. रशियाने बेकायदेशीररित्या बळकावलेली भूमी परत मिळवणे हे आत्मरक्षण असल्याने त्यासाठी युक्रेनला रणगाडे पुरवल्यास तो मर्यादारेषेचा भंग होत नाही, असा निष्कर्ष अमेरिका आणि जर्मनीने काढला.
या युद्धात दोन्ही बाजू थकून गेल्या असल्या, तरी युद्धाचा अंत दृष्टिपथात आलेला नाही. युद्धाच्या पहिल्या टप्प्यात रशियाने युक्रेनमध्ये चहुबाजूंनी जोरदार मुसंडी मारली. दुसर्या टप्यात युक्रेनने ’ड्रोन’ तसेच तोफखान्याच्या कौशल्यपूर्ण वापराद्वारे रशियाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आणि त्यांचे आक्रमण डिनिप्रो नदीच्या पूर्व तटापर्यंत रोखले. नोव्हेंबर २०२२ मध्ये रशियाने डिनिप्रो नदीच्या पश्चिमेला असलेल्या खर्शोन या महत्त्वाच्या शहरातून माघार घेतली. त्यानंतर रशियाने बचावात्मक पवित्रा घेत युक्रेनच्या तळांवर ’ड्रोन’ आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले सुरु ठेवले. तसेच हवाईहल्यांद्वारे युक्रेनमधील पायाभूत सुविधा उध्वस्त करण्यास सुरुवात केली. याच काळात युक्रेनने आपला गमावलेला भाग परत मिळवण्याचा चंग बांधला.
२०१४ साली रशियाने बळकावलेल्या क्रिमियास युक्रेनशी जोडणारा प्रदेश जिंकून रशियाची कोंडी करण्याचा युक्रेनचा प्रयत्न आहे. डोनबास भागात अनेक ठिकाणी युक्रेन आणि रशियात घनघोर लढाई सुरु आहे. युक्रेनने या युद्धाला सुरुवात झाल्यापासून गमावलेला बराच प्रदेश परत मिळवला असला, तरी आजही युक्रेनची दहा टक्क्यांहून जास्त भूमी रशियाच्या ताब्यात आहे. या काळात रशियाने आपल्या थकलेल्या सैन्याची पुनर्बांधणी करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. रशियाने प्रत्यक्ष लढाईसाठी ‘वॅगनर ग्रुप’चे खासगी सैन्य तैनात केले. असे म्हटले जाते की, ‘वॅगनर ग्रुप’ रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी संबंधित आहे. युद्धामध्ये खासगी सैन्याने मानवाधिकारांचे हनन केले किंवा त्याला पराभव पत्करावा लागला, तरी त्याचा वापर करणारा देश यापासून नामानिराळा राहू शकतो. युक्रेनच्या प्रशिक्षित सैन्याशी अशा खासगी सैन्याला लढवून रशिया आपले सर्वोत्तम सैनिक लढाईच्या पुढच्या फेरीसाठी तयार करत आहे.
या युद्धाच्या सुरुवातीपासून पाश्चिमात्य देशांनी रशियाविरुद्ध प्रचंड आर्थिक निर्बंध लादले. आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नाकेबंदी झाल्यामुळे रशियाला गुडघे टेकणे भाग पडेल, हा अंदाज चुकीचा ठरला. खनिज तेलाच्या किमती वाढल्यामुळे चीन आणि भारताने रशियाकडून आयात सुरुच ठेवल्यामुळे रशियाला आर्थिक चणचण जाणवली नाही. युद्ध सामुग्रीच्या बाबतीत इराण वगळता अन्य देश रशियाला मदत करत नसल्यामुळे रशियाला आक्रमण करुन युक्रेनला मागे रेटणे अवघड झाले आहे. मोठ्या संघर्षानंतर रशियाने बाखमत शहर युक्रेनकडून पुन्हा जिंकून घेतले असले, तरी त्यातून युद्धाचे पारडे काही फिरणार नाही.
गेले अनेक महिने युक्रेन पाश्चिमात्य देशांकडे रणगाड्यांची याचना करत आहे. रशियाने जिंकलेला प्रदेश परत मिळवण्यासाठी त्यांची नितांत आवश्यकता आहे. जर्मनी आणि अमेरिकेने ४५ रणगाडे पुरवण्याचा निर्णय घेतला असला, तरी अमेरिकेचे रणगाडे युक्रेनमध्ये येऊन युक्रेनच्या सैन्याला प्रशिक्षण देण्यास अनेक महिन्यांचा अवधी लागेल. तुलनेने जर्मन रणगाडे मोठया संख्येने युक्रेनमध्ये येऊ शकतात. पण आक्रमणासाठी रणगाड्यांच्या जोडीला अद्ययावत तोफखाना, ताज्या दमाचे सैन्य आणि शत्रूने हवाईहल्ले करु नयेत यासाठी स्वतःच्या हवाई दलाने लष्कराला हवाई कवच पुरवणे आवश्यक असते. रणगाडे पुरवल्यानंतर युक्रेनला लढाऊ विमानं पुरवण्याबाबत पाश्चिमात्य देशांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे.
अमेरिका आणि युरोप आणखी किती महिने युक्रेनला मदत करु शकणार याबाबतही शंका आहे. यावर्षीच्या अखेरीस अमेरिकेत २०२४ सालच्या अध्यक्षीय निवडणुकांची रणधुमाळी सुरु होईल. त्यानंतर सरकारला कोणतेही मोठे निर्णय घेणे अवघड होईल. अमेरिकेने आजवर युक्रेनला १०० अब्ज डॉलरहून जास्त मदत केली असून ही मदत अशीच सुरु ठेवणे अमेरिकेला अडचणीचे आहे. ब्रिटनमध्येही २०२४ साली संसदीय निवडणुका आहेत. रशियावरील निर्बंधांमुळे अनेक युरोपीय देशांना आर्थिक मंदी, प्रचंड महागाई आणि बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. आजवर युरोप एकसंध असला, तरी जसे हे युद्ध लांबत जाईल, तसा युरोपमधील विविध देशांमध्ये या युद्धाला असलेला विरोधही वाढेल. याच अपेक्षेने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन युद्ध लांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. या युद्धात युक्रेनचे प्रचंड नुकसान झाले आहे.
लाखो लोक युरोपीय देशांमध्ये शरणार्थी म्हणून गेले आहेत. रशिया शरण न आल्यास युक्रेनच्या पुनर्बांधणीसाठी लागणारी प्रचंड गुंतवणूक कोण करणार, हादेखील एक प्रश्न आहे. हे युद्ध फसत चाललेले पाहून पुतिन यांचे सहकारी आणि त्यांना आर्थिक रसद पुरवणारे उद्योजक लष्करी बंड करतील किंवा पुतिन स्वतःहून राजीनामा देतील ही अपेक्षाही पूर्ण होताना दिसत आहे. या युद्धात रशियाचे प्रचंड नुकसान झाले असले तरी पाश्चिमात्य देशांचे रशियापासून युक्रेन तोडण्याचे प्रयत्न हा तिथे आत्मसन्मानाचा विषय झाला आहे. अमेरिका आणि जर्मनीच्या रणगाड्यांमुळे युक्रेनच्या आक्रमणास किती धार येते आणि रशिया त्यांचा कसा प्रतिकार करते यावर वसंत ऋतूत या युद्धाचे पारडे कोणाकडे झुकते ते अवलंबून आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत. इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.