नवी दिल्ली : पाकिस्तानातील पेशावर शहरातील पोलीस लाईन्समध्ये बांधलेल्या मशिदीमध्ये दि.३० जानेवारी रोजी स्फोट झाला आहे. याला आत्मघातकी हल्ला म्हटले जात आहे. आतापर्यत या हल्ल्यात ३२ पोलीसांचा मृत्यू झाला आहे. तर १५८ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील ६६ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे ही सांगण्यात येत आहे.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, नमाजच्या वेळी मशिदीत सुमारे ५५० लोक उपस्थित होते. आत्मघातकी हल्ला करणारा हल्लेखोर मधल्या रांगेत बसला होता. मशिदीत प्रवेश करण्यासाठी गेट पास दाखवावा लागत असल्याने तो पोलिस लाइन्समध्ये कसा पोहोचला हे समजू शकले नाही. पोलिसांनी सांगितले की मशिदीचा मोठा भाग कोसळला आहे आणि अनेक लोक त्याच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने परिसराला वेढा घातला आहे. त्याच्या जवळच लष्कराच्या तुकडीचे कार्यालयही आहे. पोलिस लाइन्समध्ये उपस्थित लोकांचे म्हणणे आहे की हा स्फोट खूप शक्तिशाली होता आणि त्याचा आवाज २ किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला.तहरीक-ए-तालिबान (टीटीपी) पाकिस्तानचा या भागात बराच प्रभाव असून यापूर्वी या संघटनेने येथे हल्ल्याची धमकीही दिली होती. या घटनेनंतरचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत.