मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कर्तव्यपथावरून सादर केलेल्या १७ राज्यांच्या चित्ररथांपैकी महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. यावर्षीच्या चित्ररथातून महाराष्ट्रातील स्थित साडेतीन शक्तिपीठे तसेच नारीशक्तीचा सन्मान करणाऱ्या देवतांच्या प्रतिमा रथावर लावल्या होत्या.
दरम्यान, उत्तराखंडच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर उत्तर प्रदेशचा चित्ररथ तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथातून राज्याची लोककला दाखवण्याचा प्रयत्न झाला. संबळ हे लोकवाद्य घेऊन गोंधळी रथाच्या पुढे होते. आजूबाजूस गोंधळी, आराधी लोकवाद्ये घेऊन होते तसेच मागे पोतराज व हलगी वाजवणारी प्रतिकृती होती. तुळजाईचे गोंधळी चित्ररथातून तुळजापूर, कोल्हापूर, माहूर आणि वणी येथील शक्तिपीठांचा देखावा दाखवत कर्तव्यपथावरून चालत होते.
तुळजापूरची तुळजाभवानी, कोळजापूरची महालक्ष्मी, माहूर येथील रेणुकादेवी ही तीन पूर्ण शक्तिपीठे तसेच वणीचे सप्तशृंगीचे अर्धे शक्तीपीठ, ही सर्व मंदिरे नारीशक्तीची प्रतीके आहेत. गतवर्षी जैवविविधता व राज्य मानके या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम पारितोषिक मिळाले होते. यापूर्वी कर्तव्यपथावरून ४० वेळा महाराष्ट्राचा चित्ररथ सादर केला गेला. महाराष्ट्र ही संत, देवतांची भूमी आहे म्हणूनच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून हा विषय निवडला गेला होता.