धर्मांतर हेच 'लव्ह जिहाद' चे वास्तव

    30-Jan-2023   
Total Views |
 
श्रद्धा वालकर या तरुणीच्या अमानुष हत्येमुळे ‘लव्ह जिहाद’ च्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या मुद्द्याने गंभीर वळण घेतले. श्रद्धाच्या हत्येमुळे समाजात संतापाची लाट उसळली. असे विवाह का होत आहेत , तरुणी आणि कुटुंबीय यांच्यातील संवाद का हरवू लागला आहे अशा वेगवेगळया पैलूंबाबत धार्मिक , कायदेशीर तसेच समाजशास्त्रीय दृष्टीनेही विविध माध्यमांतून व्यापक चर्चा , विचारमंथन झाले.

Keshav Upadhyay 
 

काही दिवसांपासून या मुद्द्यावर महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रचंड मोर्चे निघू लागले आहेत. जनमानसात या विषयावरून असलेली खदखद, संताप , भीती या मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागली आहे. 'लव्ह जिहाद' विरोधात कायदा करा , अशी मागणी या मोर्चांतून केली जात आहे. 'लव्ह जिहाद' चे धर्म , राजकारण , कायदा या पलीकडचे वास्तव आता तरी लक्षात घेतले जाईल एवढी अपेक्षा समाजाचे बुद्धीशील नेतृत्व करणाऱ्या वर्गाकडून ठेवण्यास हरकत नाही. रवीश कुमार , बरखा दत्त , राजदीप सरदेसाई, स्वरा भास्कर , जावेद अख्तर, कन्हैय्या कुमार अशी मानवतावादी विचारांचा झेंडा मिरवणारी मंडळी 'लव्ह जिहाद' च्या विषयाची दाहकता लक्षात आली नसल्याने काही बौद्धिक राग आळवण्यासाठी अजून तयार नसावेत.
 
 उत्तर प्रदेशात ७ वर्षांपूर्वी अखलाक मोहम्मद या इसमाची गो मांस बाळगल्याच्या संशयावरून एका जमावाने हत्या केल्यानंतर वर उल्लेख केलेली विचारवंतांची मांदियाळी धाय मोकलून आकांत करत होती. श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते भल्या मोठ्या फ्रीज मध्ये ठेवण्याचा प्रकार रवीश , स्वरा भास्कर, राजदीप या प्रभावळीला क्रूर वाटलाच नसल्याची शक्यता अधिक आहे. बळी पडलेल्याचा धर्म, जात पाहून निषेध वगैरे करायचा की नाही याचा निर्णय घेण्याची सवय अलीकडे बुद्धिजीवी मंडळींच्या अंगी रुजली आहे. असो. मुद्दा आहे तो श्रद्धा वालकर सारख्या तरुणींच्या झालेल्या निर्दयी, अमानुष वगैरे शब्द ही थिटे पडतील अशा हत्यांच्या घटनांवर आपण जबाबदार, संवेदनशील भारतीय नागरिक म्हणून व्यक्त होणार की नाही याचा.
 
श्रद्धा सारख्या तरुणी आधी प्रेम पुढे विवाह, लिव्ह इन वगैरेंच्या जाळयात का सापडतात या प्रश्नाला अनेक सामाजिक, कुटुंब व्यवस्थेचे पदर आहेत. त्याचा विचार समाजशास्त्र, कुटुंब संकल्पना, आचार विचार स्वातंत्र्य, संस्कार अशा अनेक अंगांनी व्हायला हवा, तसा तो चालूही झाला आहे. एकीकडे विज्ञान, तंत्रज्ञानाची अनेक शिखरे पादक्रांत होत असतानाच्या युगात श्रद्धा सारख्या तरुणींच्या हत्येतून प्रकट होणारी अश्म युगीन मानसिकता तयार करण्याचे पद्धतशीर प्रयत्न होत आहेत. ही मानसिकता तयार करण्यासाठी पडद्यामागे राहून कार्यरत असणाऱ्या शक्तींना अटकाव करायचा की नाही, की हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवून निष्क्रिय बसायचे हा सध्याच्या घडीचा कळीचा मुद्दा बनला आहे. या शक्ती कोणत्या धर्माचे आचरण करतात वगैरे मुद्दा गौण आहे. श्रद्धा हत्येसारख्या घटनांचा एका ओळीत, एका शब्दांत निषेध करणे स्वरा भास्कर, रवीश , राजदीप पंथीयांना सोयीस्कर वाटतही असेल. त्यातून या पंथाच्या दुटप्पी चेहऱ्याचे नेहमीचे दर्शन होत आहे. त्याहीपेक्षा धोकादायक आणि धक्कादायक बाब म्हणजे प्रसार माध्यमांकडून अशा घटनांतील आरोपीचा धर्म लपविण्याचा होत असलेला प्रयत्न.
 
हा मुद्दा धार्मिक नाही असं आपण क्षणभर मानून चालू. मात्र मागील वर्षांत घडलेल्या या प्रकारच्या १५३ घटनांचे पोलीस तपास झाल्यानंतरच्या माहितीचे विश्लेषण केल्यावर प्रकाशझोतात आलेले वास्तव दाहक आहे. ९९ घटनांमध्ये आरोपी तरुणांनी तरुणी / महिलांपासून आपला धर्म लपवून ठेवत आपण हिंदूच आहोत असे भासवले होते, त्याच बरोबर ६ जणांनी आपण अगोदरच विवाहित आहोत ही गोष्ट लपवून ठेवली होती. हिंदू तरुणीने लग्न केल्यानंतर तिला बळजबरीने मुस्लिम धर्म स्वीकारण्याची सक्ती सर्वच घटनांत झाल्याचे दिसते. हिजाब घालण्याची सक्ती करणे, तिला गोमांस खाण्याची सक्ती करणे , हिंदू देवदेवतांच्या मूर्तीची तोडफोड करणे , हिंदू धर्म सोडण्यास तरुणीने / महिलेने नकार दिल्यास तिला मारहाण करणे, तिच्यावर बलात्कार करणे, लिव्ह इन मध्ये राहून तरुणीचा यथेच्छ उपभोग घेतल्यानंतर तिला निकाह साठी सक्ती करणे, निकाहला नकार दिल्यास हत्या करणे हा समान धागा या घटनांतून समोर येतो.
 
'लव्ह जिहाद' च्या अनेक घटनां मध्ये धर्मांध युवक ‘स्पेशल मॅरेज ॲक्ट’ऐवजी शरिया कायद्यानुसारच लग्न करण्यासाठी मुलीवर दबाव टाकतात, असेही आढळले आहे. जर मुलीने ‘शरिया कायद्या’नुसार स्वेच्छेने लग्न केले, तर ती तिच्या सध्याच्या सर्व अधिकारांना वंचित होते. श्रद्धा वालकर ची घटना एकमेव नाही. निधी गुप्ता, अंकिता सिंह, निकिता तोमर, काजल, मानसी दीक्षित, खुशी परिहार, वर्षा चौहान, हिना तलरेजा आदी अनेक हिंदु तरुणींबरोबर अशाच पद्धतीची प्रकारची क्रूरता झाली आहे. अनेक मुलींचे मृतदेह बंद सुटकेसमध्ये मिळाले आहेत. या घटनांतून माणुसकीला काळीमा फासणारे क्रौर्य , अमानुषता संविधानाने निर्माण केलेल्या राज्यात खपवून घ्यायची का याचा विचार सर्वांनी गांभीर्याने करण्याची आवश्यकता आहे .याहून अनेक नावे ही बंद दरवाज्याआडच राहिली. हिंमत करत कुणी पुढे येण्याचे धारिष्ट्य दाखवले नाही हे दुर्दैव.
 
या घटनांमागे हिंदू तरुणींचे/महिलांचे धर्मांतर करणे हाच प्रमुख उद्देश असल्याचे पीडित तरुणींच्या , आरोपींच्या जाबजबाबातून स्पष्ट झाले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०२२ मध्ये अशा घटनेतील विवाहासंदर्भात निकाल देताना केलेले मतप्रदर्शन 'लव्ह जिहाद' मधील आरोपींची मोडस ऑपरेंडी ( कृत्यामागचा हेतू , कार्यपद्धती ) धर्मांतरणाचीच होती हे स्पष्ट करणारे आहे. सज्ञान असलेल्या हिंदू तरुणीला आपला धर्म बदलून मुस्लिम मुलाशी विवाह करण्याचा अधिकार आहे, हे अलाहाबाद उच्च न्यायालयाने मान्य केले. मात्र दोन भिन्नधर्मीय व्यक्ती जेव्हा विवाह करतात, तेव्हा केवळ त्या विवाहासाठी एका व्यक्तीला आपला धर्म सोडायला सांगणं, त्या व्यक्तीवर आपला धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारण्यासाठी सक्ती करणे ही चिंतेची बाब आहे, असे मत या प्रकरणात न्यायालयाने व्यक्त केले आहे.
 
पूजा या मुलीच्या निकाहाबाबतीत हा खटला होता. जन्माने हिंदू असलेल्या या मुलीने धर्मांतर करून मुस्लीम धर्मात प्रवेश केला आणि नंतर मुस्लीम व्यक्तीशी विवाह केला. तिचा मुस्लीम धर्मातील प्रवेश तिच्या मर्जीने झाला का, हा या प्रकरणातला प्रमुख मुद्दा होता. तेव्हा उच्च न्यायालयाने पूर्वाश्रमीची पूजा ऊर्फ झोयाला काही प्रश्न विचारले आणि त्यातून असे दिसून आले की ती सज्ञान/प्रौढ असून तिला नवऱ्याबरोबर म्हणजेच शाहवेजबरोबर राहाण्याची इच्छा आहे. तेव्हा न्यायालयाने हा खटला निकाली काढला. ती प्रौढ असल्यामुळे तिने जो निर्णय घेतला, तो घेण्यास ती पूर्ण स्वतंत्र आहे, असे त्यांचे मत होते. परंतु न्यायालयाने असेही म्हटले, की ‘आपल्या संविधानामध्ये कोणत्याही नागरिकाला कोणत्याही धर्माचे पालन करण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. पण दोन भिन्नधर्मीय व्यक्ती जेव्हा विवाह करतात तेव्हा केवळ त्यासाठी एकाला आपला धर्म सोडावा लागावा, ही चिंतेची बाब आहे.’
 
पुणे जिल्ह्यातल्या दौंड या रेल्वे जंक्शनमुळे प्रसिद्ध झालेल्या गावात मुस्लीम धर्मात प्रवेश करण्यासाठी धाकदपटशा, पैशाचे प्रलोभन याचा यथेच्छ वापर कसा होतोय याचे वृत्तांकन अलीकडेच टाईम्स नाऊ या वृत्त वाहिनीने केले होते. दौंड मध्ये या पद्धतीने सुमारे २०० हिंदू तरुणी तसेच विवाहित हिंदू पुरुषांचे धर्मांतर झाल्याचे वृत्त या वाहिनीने दिले होते. 'लव्ह जिहाद' हे दाहक वास्तव दुर्लक्षून चालणार नाही. एका मुस्लिम महिलेशी विवाह केलेल्या हिंदू इसमाची जबरद्स्तीने सुंता करून त्या व्यक्तीला मुस्लिम धर्मात प्रवेश कसा घ्यावयास लावण्यात आला याचे वृत्तांकन या वाहिनीने केले होते. पुण्यातही मुस्लिम तरुणीशी प्रेम विवाह केलेल्या हिंदू तरुणांना जबरदस्तीने मुस्लिम धर्मात प्रवेश करण्यास भाग पाडण्याच्या घटना घडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने १४ नोव्हेंबर रोजी एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान जबरदस्तीच्या धर्मांतराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करून या घटना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहेत, असे मतप्रदर्शन केले होते. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांनी लव्ह जिहाद च्या घटना लक्षात घेऊन त्याविरोधात कायदे केले आहेत. केरळ उच्च न्यायालयाने धर्मांतर करून एका तरुणीने केलेला विवाह रद्दबातल ठरवला होता. या खटल्याच्या निकालात केरळ उच्च न्यायालयाने 'लव्ह जिहाद' विषयी चिंता प्रकट केली होती. राज्यभर निघत असलेल्या 'लव्ह जिहाद' विरोधी मोर्चांमधून धर्मांतराचे प्रयत्न, तरुणींच्या क्रूर हत्येच्या घटनांमुळे अस्वस्थ झालेले जनमत व्यक्त होऊ लागले आहे. याची दखल घ्यावीच लागणार आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

केशव उपाध्ये

केशव उपाध्ये हे भाजप महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रवक्ते आहेत.