मुंबई : 'हिंदू धर्माशिवाय कोणत्याही धर्मात निसर्गाची पूजा केली जात नाही. तरीही टुकडे टुकडे गॅंगकडून निसर्गपूजेचा संदर्भ देत नेमक्या कुठल्या समाजाविषयी बोलत आहे असा सवाल उपस्थित झाला आहे. गोर बंजारा हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक असून धर्मांतरण आणि हिंदू धर्मविरोधी कारवाया करणाऱ्यांच्या निशाण्यावर आता बंजारा समाज आहे,' असा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.
'हिंदूंशिवाय कुठलाही धर्म निसर्ग पूजा करत नाही. सूर्य, चंद्र, वृक्ष, पर्वत, नद्या या सर्व घटकांची हिंदू धर्मात पूजा केली जाते. असे असताना तुकडे तुकडे गँगने अप्रत्यक्षरीत्या नेमक्या कोणत्या निसर्गाविषयी बोलत टिप्पणी करायला सुरुवात केली आहे हे स्पष्ट झालेले नाही. गोर बंजारा हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग होता आणि आहे. आदिवासी समाजाला भारताच्या विरोधात उभे करण्यासाठीचे हे जागतिक षडयंत्र असून मूलनिवासी आणि त्याचा सिद्धांत हे त्याचेच एक रूप आहे. इंग्रजांनी धर्मांतरणाच्या बाबतीत आखलेले दूरदर्शी धोरण स्वातंत्र्यानंतर डाव्यांनी आणि ख्रिश्चनांनी कायम ठेवले असून आता या समाजविघातक घटकांच्या निशाण्यावर बंजारा समाज आहे,' असा असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथे सध्या अ.भा. हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ'चे आयोजन करण्यात आले आहे. या कुंभात बोलताना बंजारा समाजातील महाराज आणि संतांनी समाजावर होणाऱ्या धार्मिक आक्रमण आणि धर्मांतरण मोहिमेवर चिंता व्यक्त करत समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे.
३००० तांड्यांवर धर्मांतरणाचा डाव यशस्वी - बाबुसिंह महाराज
यावेळी बोलताना बाबूसिंह महाराज यांनी देशात सुरु असलेल्या बंजारा धर्मांतरणाची धक्कादायक आकडेवारी देत समाजाला इशारा दिला आहे. 'आठ राज्यातील ११ हजार तांड्यांपैकी ८ राज्यातील ३ हजार तांड्यांवरील बंजारा समाजाचे मिशनर्यांकडून धर्मांतरण करण्यात आले आहे. मिशनरींनी थेट संपर्क मोहीम राबवित हे केले आहे. हिंदू गोर बंजारा आणि लबाना नायकडा समाजामध्ये जागृती आणण्यासाठी आणि समाजाला दिशा देण्यासाठी या कुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे धर्मांतरित झालेल्या सर्वांना परत आणले जाईल बंजारा धर्मांतरणाची सुरु असलेली ही मोहीम थांबविली जाईल,' असा इशारा बाबुसिंह महाराज यांनी दिला आहे.