जगभर ‘प्रेमाचे शहर’ म्हणून ओळख असलेल्या पॅरिसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे कामगारांनी पेन्शन सुधारणा योजनांच्या विरोधात देशव्यापी संप पुकारला आणि यामुळे फ्रान्स ठप्प झाले. जवळ जवळ सगळ्या रेल्वे युनियन या चळवळीत सहभागी झाल्या आणि कोणतीही लोकल किंवा प्रादेशिक ट्रेन सोडण्यात आली नाही. यामुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्या वाढली आणि विचित्र परिस्थिती निर्माण झाली. परंतु, पॅरिसच्या प्रवाशांनी सार्वजनिक वाहतूक व्यत्यय टाळण्यासाठी शहरातील ‘सायकल लेन’च्या नव्याने विस्तारलेल्या नेटवर्कचा वापर करण्यास सुरुवात केली. या संपामुळे शहरातील विख्यात ‘लूव्र म्युझियम’च्या पुढे जाणार्या ‘रुए डी रिव्होलीवर’ या मार्गावर सायकलस्वारांची गर्दी झाली होती.
पॅरिस ही फ्रान्स देशाची राजधानी व देशातील सगळ्यात मोठे शहर आहे. राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, कला व क्रीडा या सर्व क्षेत्रात फ्रान्समध्ये अग्रेसर असणारे पॅरिस हे एक महत्त्वाचे जागतिक शहर मानले जाते. येथे युनेस्को, आर्थिक सहयोग व विकास संघटना इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची मुख्यालये आहेत. युरोपमध्ये अलीकडच्या काही महिन्यांत अनेक सरकारांना वाढत्या महागाईवर तीव्र निषेध आणि संपांचा सामना करावा लागला आहे. युक्रेन-रशियाच्या युद्धामुळे ऊर्जा आणि अन्नपदार्थांच्या किमती वाढल्या आहेत म्हणून महागाईच्या बरोबरीने वेतन मिळावे यासाठी रेल्वे कर्मचारी आणि इतरांनी नोकरी सोडली आहे. अलीकडील संपादरम्यान सायकलसाठी विशेष ‘बाईक लेन’वरील वर्दळ वाढली आहे. शेवटच्या पॅरिस ’मेट्रो स्ट्राइक’ने महिन्याच्या सरासरी दैनंदिन वापराच्या तुलनेत ‘बाईक लेन’चा वापर ८० टक्क्यांनी वाढला.
वाहतुकीचे पर्यायी मार्ग शोधत असलेल्या पॅरिसच्या रहिवाशांनी शहराच्या ‘सार्वजनिक सायकल शेअरिंग सिस्टीम’ ‘व्हेलीब’चा अवलंब केला. संपादरम्यान पॅरिसमध्ये सर्वत्र उभ्या असलेल्या ‘मॅन्युअल’ आणि ‘इलेक्ट्रिक’ या सायकलींनी सर्वांत कार्यक्षम पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला. या संपामुळे सायकल चालवणार्यांच्या संख्येत वाढ झाली. परंतु, पॅरिसला ’सायकल चालवणारे शहर’ बनवण्याच्या आणि कार्बन तटस्थतेकडे नेण्याचा प्रयत्न यापूर्वीपासून करण्यात येत होते. महापौर न हिडाल्गो यांनी अलीकडच्या काही वर्षांत नवीन बाईक पायाभूत सुविधांमध्ये १५० युरो दशलक्षपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. २०१९ मध्ये माजी पंतप्रधान एडवर्ड फिलिप यांनी जाहीर केलेल्या व्यापक योजनेअंतर्गत देशभरात सायकलिंगला चालना देण्यात येत आहे. पॅरिस कराराच्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने, पॅरिसने २०५० पर्यंत संपूर्ण शून्य उत्सर्जन गाठण्याची योजना आखली आहे.
‘कोविड-१९’ काळात पॅरिस सिटी हॉलने ८० किलोमीटर नवीन सायकल लेन तयार केल्या आहेत. पुढील तीन वर्षांत आणखी १०० किमी बांधण्याची योजना आहे. सायकल चालवणार्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी फ्रान्सने लोकांना चार हजार युरोपर्यंतचे प्रोत्साहन देऊ केले आहे. त्याचबरोबर अधिक सुरक्षित सायकल पार्किंग सुविधादेखील सुरू केल्या आहेत. तसेच चोर्या रोखण्यासाठी सायकलींवर ओळख कोरणे अनिवार्य केले आहे. ‘युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेन्मार्क’च्या २०२२च्या अभ्यासात असा अंदाज आहे की, जर हा पॅटर्न जगभरात लागू केला गेला, तर वार्षिक जागतिक कार्बन उत्सर्जन ६८६ दशलक्ष टन कमी होईल.
खासगी मालकीच्या सायकलींसोबतच ‘बाईक शेअरिंग सिस्टीम’ ही शहरी वाहतुकीची सुलभता वाढवण्यासाठीचे एक प्रभावी माध्यम असू शकते, असे यातून समोर आले आहे. पॅरिसच्या रहिवांशानी सायकल चालवून संपाच्या गोंधळावर तर मात केलीच आणि त्याचबरोबर आरोग्य आणि पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम निर्माण केला. तंदुरूस्त आणि निरोगी राहण्यासाठी सायकलिंग हा एक उत्तम मार्ग आहे. जागतिक इंधन-संबंधित हरितगृह वायू उत्सर्जनाचा एक चतुर्थांश भाग हा सार्वजनिक वाहतुकीमुळे होणार्या उत्सर्जनामुळे आहे, तर अर्धा भाग हा खासगी वाहनांमुळे आहे. रेल्वे कामगारांनी केलेल्या संपामुळे पॅरिसकरांना चांगले वळण लागले आहे. कामावर जाण्यासाठी किंवा इतर कामांसाठी सायकल वापरल्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य तर राखले जात आहेच, सोबत कार्बन उत्सर्जन कमी करण्यास देखील मदत होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील संपकर्यांचे प्रश्न अत्यंत गंभीर असले तरी या संपांमुळे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे हा संप पर्यावरणास अनुकूल ठरला आहे.