मुंबई : मुंबईला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी भांडुप आणि तुळशी तलाव येथील जलप्रक्रिया केंद्रावर देखरेखीसाठी ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा लावण्यात येणार आहे. मुंबई महापालिका त्याकरिता सुमारे पाच कोटी रुपये खर्च करणार आहे. भांडुप संकुल येथील नवीन जलप्रक्रिया केंद्रातून मुंबईला दरदिवशी ९०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो.
बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात असल्याने हे जलप्रक्रिया केंद्र अविरत पाणीपुरवठ्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील आहे. याठिकाणी उदंचन केंद्र, विद्युत उपकेंद्र, पूर्व प्रक्रिया केंद्र, गाळ पुनर्भिसरण यंत्रणा असे विविध विभाग आहेत. त्यामुळे जलप्रक्रिया केंद्राची सुरक्षितता अत्यंत गरजेची आहे. या केंद्राची नुकतीच मुलुंड येथील पोलिसांनी मुंबई महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेसोबत जाऊन पाहणी केली होती. त्यावेळी या परिसरात ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा बसवणे गरजेचे असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले होते.
तसेच, भांडुप जलप्रक्रिया केंद्रापासून ४.५ किमी अंतरावर तुळशी जलप्रक्रिया केंद्र आहे. याठिकाणी संदेशवहनाचे आदानप्रदान दूरध्वनी व बिनतारी संदेश वहन प्रणालीमार्फत होते. त्यामुळे या परिसरातही इलेक्ट्रॉनिक टेहळणी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यामुळे तुळशी तलाव व तुळशी जलप्रक्रिया केंद्र येथील हालचाली भांडुप जलप्रक्रिया केंद्रातील सर्व्हर खोलीमध्ये अहोरात्र दिसतील. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि मुंबई पोलीस यांनी दिलेल्या सुरक्षा विषयक अहवालानुसार, ही यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. त्यासाठी ४ कोटी, ७९ हजार रुपये खर्च येणार असून सर्व करांसह हा खर्च ४ कोटी, ९८ लाखांवर जाणार आहे.