जळगाव : जिल्हयातील भुसावळ, सावदा परिसरात शुक्रवार, दि. २७ जानेवारी रोजी सकाळी १०.३५ वाजता ३.३ रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. याबाबत अधिकची माहिती घेण्याचे काम सुरु असून सदरच्या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवीत वा वित्तहानी झाल्याची बाब अजूनपर्यंत निदर्शनास आलेली नाही. त्यामुळे नागरीकांनी घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
याबाबत प्रशासन सतर्क असून नागरीकांना सर्वतोपरी मदत करणेस तयार आहे. असे अमन मित्तल, जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. भूकंपाविषयी कुठलीही माहिती द्यावयाची असल्यास अथवा मदत हवी असल्यास दुरध्वनी क्रमांक ०२५७- २२२३१८० व ०२५७- २२१७१९३ या क्रमांकावर नागरीकांनी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालकमंत्र्यांचे आवाहन
भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही अडचण असल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहेत.