पुस्तकांची ‘माय’ : भीमाबाई जोंधळे

    27-Jan-2023   
Total Views |
bhimabai jondhale


जेमतेम पाचवी शिकून ‘पुस्तकांचे हॉटेल’ सुरू करून वाचन चळवळीला वाहून घेतलेल्या पुस्तकप्रेमी आजी भीमाबाई संपतराव जोंधळे यांच्याविषयी...


'ग्रंथ माझे गुरू, ग्रंथ कल्पतरू, सुखाचे सागरू, ग्रंथ माझे!’ अशा संतवचनापासून ते ‘वाचाल तरच वाचाल!’ इथपर्यंत वाचनाचे महत्त्व सांगणारे उपदेश आपण नेहमीच ऐकतो. पण, जेमतेम पाचवी इयत्ता शिकून वाचन चळवळीला वाहून घेतलेल्या नाशिकच्या ७३ वर्षीय भीमाबाईंनी चक्क ’पुस्तकांचे हॉटेल’ सुरू करून एक आगळा आदर्श नवीन पिढीसमोर ठेवला आहे. या हॉटेलमध्ये खवय्यांच्या पोटाची भूक भागवण्यासोबतच त्यांच्या ज्ञानाचीही भूक त्या भागवतात. नाशिकच्या ओझरजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या त्यांच्या या अनोख्या हॉटेलची सध्या देशभरात चर्चा आहे.


भीमाबाई जोंधळे यांचे बालपण खतवड येथील चौधरी कुटुंबात गेले. लहान वयातच शिक्षणाचे धडे सोडून त्यांनी कष्टाचे पाढे म्हटले. तत्कालीन रूढींप्रमाणे लहान वयातच लग्न झाले. नवर्‍याच्या व्यसनामुळे भाऊबंदकीच्या संघर्षाचे वाण वाट्याला आले तरी, विनातक्रार पदरात जे पडले त्याला ’आव्हान’ मानून हिमतीने शेती केली. पोटच्या मुलांना दुसर्‍याकडे ठेवून त्या स्वतः माल विकायला जात. ’महिला शेतकरी’ म्हणून जबाबदारी पेलून गरिबीला कष्टाने हरवण्याची जिद्द ठेवून व्यावसायिक होण्याचे बीज त्यांनी रोवले.


भीमाबाई यांनी त्या काळातही ‘एक मुलगा, एक मुलगी’ अशा आदर्श कुटुंबाची परिभाषा अंगीकारून मुलांना संस्कारी आणि शिक्षित बनवले. मुलीला शिकवून मुलीचा विवाह करून देत आईपणाची जबाबदारी पेलली. पुढे अनेक संकटामुळे दहा एकराची शेती दोन एकरावर आली. कष्ट करता-करता अपघाताने दोन हात आणि एक पायही फॅक्चर झाले असतानाही त्या डगमगल्या नाहीत. उरलेल्या दोन एकर शेतीच्या बाजूलाच केमिकल कंपनी आल्याने शेतीही नापीक झाली. त्या कंपनीच्या विरोधात भीमाबाईंनी लढा उभारला. मात्र, गावगुंड व धनशक्तीपुढे त्या हरल्या. अर्धे आयुष्य जेथे गेले ती शेती व घर विकावे लागले. पण, भीमाबाईंनी हार मानली नाही.


दहावीनंतर मुलगा प्रवीण याने पेपरलाईन टाकून शिक्षण पूर्ण करून प्रकाशन संस्था सुरू केली, त्याने तब्बल पाऊणशे पुस्तके प्रकाशित केल्याचे त्या सांगतात. शेती गेली तरी कष्ट करायची वृत्ती शांत बसू देईना. तेव्हा, वृत्तपत्र व्यवसायासोबत २००५ साली चहाची टपरी सुरू केली. पुढे हळूहळू नाश्ता आणि जेवण सुरू करून टपरीचे रूपांतर शुद्ध शाकाहारी ’हॉटेल रिलॅक्स कॉर्नर’मध्ये केले. हॉटेलमध्ये येणारे ग्राहक जेवणाची ‘ऑर्डर’ येईपर्यंत मोबाईलमध्ये गुंग असायचे. नवीन पिढी मोबाईलमुळे बिघडत चालल्याची खंत त्यांना वाटायची. त्यामुळे मोबाईल पाहणार्‍यांना विरोध करण्याऐवजी त्यांनी आपल्या मुलाला हॉटेलमध्ये पुस्तके ठेवण्यास सांगितले. त्यामुळे हॉटेलमधील प्रत्येक टेबलावर व इतर ठिकाणी पुस्तके ठेवण्यात आली.


आजी, मेनू कार्डसोबत पुस्तकेही ग्राहकांच्या हाती देऊ लागल्या. त्यामुळे हॉटेलमध्ये येणारा ग्राहक आपोआप आवडीने पुस्तके वाचू लागला. तसेच, हॉटेलमधील भिंतींवर महाराष्ट्रातील नामवंत कवींच्या कवितांचे पोस्टरही लावण्यात आले आहेत. तसेच, इतर माहितीही या ठिकाणी लावण्यात आली आहे. हॉटेलमध्ये हजारोंच्यावर पुस्तके ठेवली. येणारा प्रत्येक ग्राहक फोटो काढल्याशिवाय जात नाही. भिमाबाईंच्या मेहनतीतून आज ’हॉटेल रिलॅक्स कॉर्नर’मध्ये ग्राहकांचा राबता असतो. त्यामुळे आजींचे हे हॉटेल ‘पुस्तकांचे हॉटेल’ म्हणून प्रसिद्ध झाले आहे.


१५ ऑक्टोबर हा राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करताना आजी, हॉटेलमध्ये येणार्‍या प्रत्येकाला एक पुस्तक मोफत भेट देतात. त्याचप्रमाणे कोणाचा वाढदिवस असला तर आजी त्याला पुस्तक भेट देते. आजींनी अनेक वाचनालये, शाळा, आश्रमशाळा तसेच गरजूंना मोठ्या प्रमाणात पुस्तके भेट दिली आहेत. रुग्णांसाठी फळांऐवजी त्या पुस्तके पाठवतात. वाचन चळवळ खर्‍या अर्थाने साहित्यिकांच्या वर्तुळातून सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाण्याचं काम आजी करीत आहेत. विशेष म्हणजे, खाद्यसंस्कृतीत वाचनसंस्कृती रुजविण्याचे हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असावे.

पहाटे ४ पासून सुरू होणारा आजींचा दिवस वयाच्या ७३व्या वर्षीही निरंतर सुरू आहे. पहाटे उठून पेपरला पुरवण्या लावण्यापासून पेपर स्टॉल आणि हॉटेलचे व्यवस्थापन उत्तमरित्या सांभाळण्याचे काम त्या करतात. अर्थात, या सगळ्या मेहनतीला मुलगा प्रवीण आणि सुनबाई प्रीती हीची मोलाची मदत मिळत असल्याचे भीमाबाई नमूद करतात.


व्यवसायात व्यवहाराला सर्वोच्च न मानता त्यांनी सेवाभाव जपला. कुणाकडे पैसे नसले तरी त्याची भूक भागवली. नोटाबंदीच्या काळात तसेच कोरोना काळात अनेकांसाठी त्या ‘अन्नपूर्णा’ बनल्या. गावी निघालेल्या परराज्यातील बांधवांना त्यांनी मोफत अन्नपाणी पुरवले. त्यांच्या या उपक्रमाची दखल अनेकांनी घेतली. या वयातही त्या चश्म्याशिवाय पुस्तके आणि वर्तमानपत्र वाचतात. पांडुरंगाने अजून तरी हा देह डॉक्टरांच्या हातात ठेवला नसल्याचे, त्या अभिमानाने सांगतात. ‘नारीशक्ती अवॉर्ड’सह राष्ट्रीय तर दहा राज्यस्तरीय अशा तब्बल ११ पुरस्कारांच्या त्या धनी आहेत. ’यश प्रामाणिक कष्टानेच मिळते तेव्हा, पुस्तके वाचा!’ असा संदेश त्या युवापिढीला देतात.अशा या पुस्तकप्रेमी आजीला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.